उत्तर प्रदेशसहीत पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आज म्हणजेच गुरुवारी लागणार आहे. मात्र या निकालाच्या एक दिवस आधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही लहान मुलांसोबत वेळ घालवला. योगी आदित्यनाथ यांनी नथमलपुरजवळच्या मुलांना भेटण्यासाठी गेले होते. लखनऊला परतताना योगींचं हेलिकॉप्टर एमपी पॉलीटेक्निक येथील हेलिपॅडवर थांबलं. त्यानंतर योगी तेथे वाट पाहणाऱ्या काही छोट्या मुलांना भेटले. त्यांनी मुलांसोबत गप्पा मारल्या आणि चॉकलेट्सच्या रुपात त्यांना काही भेटवस्तू दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुलांनी हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची इच्छा व्यक्त केली तर योगींनी ती इच्छा सुद्धा पूर्ण केली. हेलिकॉप्टर सुरु झाल्यानंतर त्याच्या आवाजानेच मुलं घाबरली. त्यामुळे हेलिकॉप्टर लगेच खाली उतरवण्यात आलं. या मुलांसोबत काही वेळ घालवण्यानंतर योगी पुन्हा लखनऊच्या दिशेने रवाना झाले.

समोर आलेल्या माहितीनुसार निवडणूक प्रचारानंतर योगी आदित्यनाथ चार दिवसांच्या गोरखपूर दौऱ्यावर होते. ते बुधवारी म्हणजेच निकालाच्या एक दिवस आधी लखनऊला पोहचले. त्यांनी साडेतीनच्या सुमारास महाराणा प्रताप पॉलीटेक्निक कॅम्पसला भेट दिली. यावेळी तेथे १८ ते २० छोटी मुलं, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले होते. हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर योगींनी या सर्वांची भेट घेतली. योगींनी त्यांना चॉकलेट्स वाटली. तर मुलांनीही गुलाबाचं फुल भेट देत त्यांचं स्वागत केलं. हे हसणं, हे प्रेम आणि हा प्रेमळ संवादच माझ्यासाठी ऊर्जा आहे, अशा कॅप्शनसहीत योगींनी या भेटीचा व्हिडीओ ट्विट केलाय.

दरम्यान, बहुतांश मतदानोत्तर अंदाजानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गोवा, उत्तराखंड व मणिपूर या तीनही राज्यांमध्ये काँग्रेस भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरण्यासाठी चढाओढ असेल.

मराठीतील सर्व उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogi indulges children at gorakhpur helipad scsg
First published on: 10-03-2022 at 07:21 IST