गेल्या दोन महिन्यांपासून ज्या निवडणुकांची देशभर चर्चा सुरू होती, त्यासाठी अखेर आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. करोनाच्या पार्श्वभूमीवर करोनाच्या नियमावलीचं पालन करूनच या निवडणुका घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. तिसरी लाट आणि ओमायक्रॉनची भिती या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली गेली होती. मात्र, निवडणूक आयोगाने या निवडणुका होणार असल्याचं स्पष्ट केल्यानंतर आज त्यासंदर्भातला कार्यक्रम आयोगाकडून जाहीर करण्यात येत आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुका टप्प्यांमध्ये होणार असून मणिपूर आणि गोव्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं निवडणूक आयोगाने…

६९० मतदारसंघात निवडणुका होतील. यापैकी गोव्यातले ४०, मणिपूरमधील ६०, पंजाबमधील १७०, उत्तराखंडमधील ७० आणि उत्तर प्रदेशमधील ४०३ निवडणुकांचा समावेश आहे.

आमची तीन प्रमुख उद्दिष्टे आहेत. पहिलं कोविड सुरक्षित निवडणूक, दुसरं मतदारांना कोणत्याही अडचणीविना मतदानाचा अनुभव आणि तिसरं म्हणजे सर्वाधिक मतदानाची टक्केवारी.

एकूण १८.३ कोटी मतदार या निवडणुकीत सहभागी होतील. त्यापैकी ८.५५ कोटी महिला मतदार आहेत. सर्व पाच राज्यांमध्ये महिला मतदारांचं प्रमाण वाढलं आहे. सर्वाधिक २९ टक्के उत्तर प्रदेशात, गोव्यात २४ टक्के, मणिपूरमध्ये १९ टक्के, उत्तराखंड १८ टक्के तर पंजाबमध्ये १० टक्के महिला मतदारांचं प्रमाण वाढलं आहे. २४.९ लाख मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. त्यामध्ये ११.४ लाख महिला मतदार आहेत. एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त १२५० मतदार असतील. आता एकूण मतदान केंद्र २ लाख १५ हजार ३६८ आहेत. १६२० मतदान केंद्र हे पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांमार्फत सांभाळले जातील. काही मतदान केंद्र दिव्यांग व्यक्तींकडून हाताळले जातील. दिव्यांगांसाठी मतदान केंद्रांवर रॅम्प, व्हीलचेअर्स अशा आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. एकूण ९०० निरीक्षक निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवतील.

कशा होतील निवडणुका…

पहिला टप्पा – १० फेब्रुवारी

सर्व राज्यांमधल्या निवडणुका एकूण ७ टप्प्यांमध्ये घेतल्या जातील. उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यासाठी १४ जानेवारीला परिपत्रक काढलं जाईल. अर्ज भरण्याची तारीख २१ जानेवारी, मागे घेण्याची तारीख २७ जानेवारी असेल. तर मतदान १० फेब्रुवारीला होईल.

दुसरा टप्पा

या टप्प्यात ४ राज्यांमधे निवडणुका होतील. उत्तर प्रदेशचा दुसरा टप्पा, उत्तराखंड, पंजाब आणि गोव्याचा पहिला टप्पा. २१ जानेवारीला नोटिफिकेशन, अर्ज भरण्याची तारीख २८ जानेवारी, मागे घेण्याची मुदत ३१ जानेवारी तर मतदानाची तारीख १४ फेब्रुवारी असेल.

तिसरा टप्पा

या टप्प्यात फक्त उत्तर प्रदेशचा तिसरा टप्पा होईल. नोटिफिकेशन २५ जानेवारीला निघेल. अर्ज भरण्याची तारीख १ फेब्रुवारी, मागे घेण्याची मुदत ४ फेब्रुवारी तर मतदानाची तारीख २० फेब्रुवारी असेल.

चौथा टप्पा

या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या निवडणुका होतील. नोटिफिकेशन तारीख २७ जानेवारी, अर्ज भरण्याची तारीख ३ जानेवारी, मागे घेण्याची तारीख ७ फेब्रुवारी आणि मतदानाची तारीख २३ फेब्रुवारी असेल.

पाचवा टप्पा

यात उत्तर प्रदेशचा पाचवा आणि मणिपूरचा पहिला टप्पा यासाठी मतदान होईल. नोटिफिकेशन १ फेब्रुवारीला निघेल. अर्ज भरण्याची तारीख ८ फेब्रुवारी असेल. मागे घेण्याची तारीख ११ फेब्रुवारी तर मतदानाची तारीख २७ फेब्रुवारी असेल.

सहावा टप्पा

या टप्प्यात उत्तर प्रदेश सहावा आणि मणिपूर दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुका होतील. यात नोटिफिकेशन ४ फेब्रुवारी, अर्ज भरण्याची तारीख ११ फेब्रुवारी, मागे घेण्याची तारीख १६ फेब्रुवारी तर मतदानाची तारीख ३ मार्च असेल.

सातवा टप्पा

उत्तर प्रदेशच्या सातव्या टप्प्यासाठी नोटिफिकेशन १० फेब्रुवारीला निघेल. अर्ज भरण्याची तारीख १७ फेब्रुवारी, अर्ज मागे घेण्याची तारीख २१ फेब्रुवारी आणि मतदानाची तारीख ७ मार्च असेल.

मतमोजणीची तारीख १० मार्च असेल.

राज्यनिहाय निवडणूक कार्यक्रम

उत्तर प्रदेश – ७ टप्प्यांत मतदान

पहिला टप्पा – १० फेब्रुवारी
दुसरा टप्पा – १४ फेब्रुवारी
तिसरा टप्पा – २० फेब्रुवारी
चौथा टप्पा – २३ फेब्रुवारी
पाचवा टप्पा – २७ फेब्रुवारी
सहावा टप्पा – ३ मार्च
सातवा टप्पा – ७ मार्च

मतमोजणी – १० मार्च

पंजाब, गोवा, उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात मतदान

अर्ज भरण्याची तारीख – २८ जानेवारी
अर्ज मागे घेण्याची तारीख – ३१ जानेवारी
मतदानाची तारीख – १४ फेब्रुवारी

मतमोजणी – १० मार्च

मणिपूरमध्ये दोन टप्प्यांत मतदान

पहिला टप्पा – २७ फेब्रुवारी
दुसरा टप्पा – ३ मार्च

मतमोजणी – १० मार्च

उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. प्रत्येक मतदाराला उमेदवाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीविषयी माहिती मिळायला हवी. उमेदवारांना त्याची माहिती द्यावी लागेल. यासंदर्भात वर्तमानपत्र आणि टीव्ही वाहिन्यांवरून प्रचारादरम्यान तीन वेळा याविषयीची माहिती द्यावी लागेल. याशिवाय राजकीय पक्षांना त्यांच्या वेबसाईटवर होम पेजवर प्रत्येक उमेदवाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती द्यावी लागेल. तसेच, याच उमेदवाराला का निवडलं, याचं कारण पक्षाला द्यावं लागेल. उमेदवाराची निवड झाल्यानंतर पुढच्या ४८ तासांत ही माहिती द्यावी लागेल.

C-Vigil मोबाईल अॅप

नागरिकांसाठी सीव्हिजिल अॅपची घोषणा. या अॅपवर कोणत्याही नियमांच्या उल्लंघनाची माहिती अपलोड करता येईल. त्यावर फक्त फोटो घेऊन अपलोड करायचा आहे. पुढच्या १०० मिनिटांत त्यावर कारवाई केली जाईल.

आजपासूनच कोड ऑफ कंडक्ट अर्थात आचारसंहिता लागू होईल.

करोनासाठी कोणती काळजी?

सर्व निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्स मानलं जाईल. त्यांना बूस्टर डोस दिला जाईल. बूथवर सॅनिटायझर वगैरे सर्व व्यवस्था असेल. आम्ही मुख्य सचिवांना सांगितलं आहे की जास्तीत जास्त मतदारांना लसीकरण केलं जावं. ७ जानेवारीपर्यंत गोव्यात ९५ टक्के लोकांना दोन्ही डोस झाले आहेत. उत्तराखंडमध्ये ९९.६ टक्के पहिला तर ८३ टक्के लोकांना दुसरा डोस दिला आहे. उत्तर प्रदेशात ९० टक्के लोकांना पहिला तर ५२ टक्के लोकांना दुसरा डोस दिला आहे. पंजाबमध्ये ८२ टक्के पहिला तर ४६ टक्के लोकांना दुसरा डोस दिला आहे. मणिपूरमध्ये ५७ टक्के लोकांना पहिला तर ४३ टक्के लोकांना दुसरा डोस दिला आहे. या पाच राज्यांमधल्या एकूण १५ कोटी लोकांना पहिला तर ९ कोटी लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

मतदानाचा कालावधी सर्व पाच राज्यांमध्ये एका तासाने वाढवण्यात आला आहे. संपर्कविरहीत प्रचार व्हावा यासाठी दूरदर्शनवर सर्व पक्षांना मिळणारा कालावधी दुप्पट करण्याचा निर्णय करण्यात आला आहे. सर्वांनी करोनाच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी शक्य तेवढा प्रचार डिजिटल आणि ऑनलाईन पद्धतीने करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शक्यतो प्रत्यक्ष प्रचार टाळावा. यासंदर्भातली सविस्तर नियमावली नंतर जारी करण्यात येईल.

१५ जानेवारीपर्यंत रोड शो, पदयात्रा, रॅलीला मनाई

कोणत्याही प्रकारे रोड शो, पदयात्रा, बाईक रॅली वगैरेला १५ जानेवारीपर्यंत परवानगी दिली जाणार नाही. त्याचप्रकारे राजकीय पक्ष किंवा उमेदवार किंवा गटांना रॅली काढायला १५ जानेवारीपर्यंत परवानगी नसेल. रात्री ८ ते सकाळी ८ पर्यंत प्रचारावर बंदी असेल. सार्वजनिक रस्ते, चौकात कोणत्याही नुक्कड सभांना परवानगी दिली जाणार नाही. विजयानंतर रॅली काढता येणार नाही. तसेच, विजयाचं प्रमाणपत्र घेण्यासाठी फक्त दोन व्यक्तींना परवानगी असेल.

परिस्थितीचा अंदाज घेऊन रॅलीला परवानगी देण्यात आली, तर स्थानिक नियमावलीचं पालन करूनच त्या घेता येईल. लोकांना मास्क आणि सॅनिटायझर द्यावे लागतील. जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनेच या सभा घेता येतील. उमेदवारासह जास्तीत जास्त ५ लोकांना डोअर टू डोअर प्रचार करता येईल. यासंदर्भात प्रतिज्ञापत्र घेतली जातील.

नियमांचं उल्लंघन केल्यास डिझास्टर मॅनेजमेंट अॅक्ट, आयपीसीनुसार शिक्षा होऊ शकते.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh assembly elections date punjab uttarakhand goa manipur election commission press conference pmw
First published on: 08-01-2022 at 15:32 IST