जातीच्या गणितातून बाकी शून्य

उत्तर प्रदेशातील राजकारण हे विकासाच्या मुद्दय़ांपेक्षा जातींच्या अस्मितेभोवती फिरणारे आहे.

मायावती, मुलायमसिंह यांच्या दलित-ओबीसींवरील मक्तेदारीला हादरा

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत जातींच्या समीकरणांबरोबरच चेहऱ्यांचीही लढाई झाली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाजी मारली. दलित-ओबीसींच्या जनाधारावर उत्तर प्रदेशाच्या राजकारणावर मक्तेदारी सांगणाऱ्या बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती, समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह आणि मावळते मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे नेतृत्व पराभूत झाले. भाजपने गेल्या वर्षां-दोन वर्षांपासून दलित व ओबीसींना आपलेसे करण्यास आखलेल्या रणनीतीला यश मिळाल्याचे निवडणूक निकालातून स्पष्ट झाले आहे.

उत्तर प्रदेशातील राजकारण हे विकासाच्या मुद्दय़ांपेक्षा जातींच्या अस्मितेभोवती फिरणारे आहे. त्यानुसार जातींच्या ध्रुवीकरणातून सत्ता हस्तगत करण्याचे राजकारण यशस्वी होते, असा आजवरचा इतिहास आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आज जाहीर झालेल्या निकालातूनही ते स्पष्ट झाले आहे. बसपचे संस्थापक कांशीराम यांनी उत्तर प्रदेशात फुले-शाहू-आंबेडकरांचा नारा देऊन बहुजनवादी राजकारणाची महूर्तमेढ रोवली. त्यामुळे आंबेडकरी चळवळीचा प्रभाव असलेल्या महाराष्ट्रातील दलित-ओबीसी नेत्यांचेही या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागले होते. मायावती व मुलायमसिंह किंवा अखिलेश यादव यांची जातीय समीकरणे विस्कटून ती नव्याने बांधून आपल्याकडे वळविण्यात भाजपची खेळी यशस्वी झाली, असे महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील व ओबीसी चळवळीतील नेत्यांचे विश्लेषण आहे.

भाजपला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विकासाचा अजेंडा राबविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने दलितांनी कौल दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

बसपच्या स्थापनेपासून कांशीराम व नंतर मायावती यांचे विश्वासू सहकारी मानले जाणारे, परंतु अलीकडे स्वतंत्र पक्ष स्थापन करून राजकारण करणारे डॉ. सुरेश माने यांनी जातीय समीकरणांची दिशा बदलल्यामुळे वेगळे निकाल लागल्याचे म्हटले आहे. दलितांमधील लहानातल्या लहान जातींना एकत्र करून कांशीराम यांनी बसपची उभारणी केली. दलितांची २१ टक्के लोकसंख्या आहे, परंतु मायावती यांना ती मतपेढी टिकविता आली नाही.

महाराष्ट्र प्रदेश बसपचे अध्यक्ष विलास गरुड यांनी मात्र मतदान यंत्रातील घोटाळ्यामुळे भाजपला यश मिळाले, असे मत व्यक्त केले. उत्तर प्रदेशात दलित-ओबीसींची ५१ टक्के लोकसंख्या आहे. दलित समाज हा बसपचा कट्टर मतदार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या नेत्यांच्या आरक्षणविरोधी वक्त्यामुळे दलित व ओबीसी समाज भाजपच्या विरोधात होता. दलित समाजाला आपलेसे करण्यासाठी भाजपने धम्म चेतना यात्रा काढली होती. तीही फसली होती. राममंदिर, मंडल अशी कसलीही लाट नाही. बसपनेही दलित, मुस्लीम, ठाकूर, ब्राह्मण उमेदवार दिले होते. असे असताना भाजपलाच एवढे मोठे यश कसे मिळाले, असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला आहे.

मंडल आयोग लागू केल्यानंतर ओबीसी किंवा बहुजन राजकारणाला धार आली. मंडल आयोगाच्या चळवळीतील एक नेते व विचारवंत प्रा. श्रावण देवरे यांनी मायावती व मुलायमसिंह यांच्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा ओबीसींना आश्वासक वाटला, त्यामुळे भाजपला मोठे यश मिळाले आहे, असा दावा केला. कोणत्याही क्षणी जेलमध्ये जाणारे नेते मतदारांना नको होते. निवडणूक निकालातून त्याची ही प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे. बिगरयादव ओबीसी समाज हा मोदींच्या बाजूने उभा राहिला. भाजपमध्ये ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर असा संघर्ष सुरू आहे. मोदी हे ब्राह्मणेत्तरांचे नेतृत्व करीत आहेत. मोदींचा ओबीसी चेहरा बहुजन समाजाने स्वीकारला. त्यामुळे भाजपला मोठे यश मिळाले. मंडलच्या पुढच्या यशस्वी राजकारणाची ही सुरुवात आहे, असे प्रा. देवरे यांचे म्हणणे आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व उत्तर प्रदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Assembly election 2017 narendra modi up election 2017 mulaymsing yadav mayawati

ताज्या बातम्या