प्रशांत किशोर, स्टीव्ह जार्डिग यांची प्रचारतंत्रे अपयशी

उत्तर प्रदेशातील निवडणुकीने दिलेल्या अनेक अपयशी चेहऱ्यांमध्ये आणखी दोन नावांचा समावेश करावा लागेल. तो म्हणजे भारतीय राजकारणातील चमत्कारपुरुष म्हणून आजवर ओळखले जात असलेले प्रशांत किशोर आणि अमेरिकेतील हार्वर्ड केनेडी स्कूलमधील प्रोफेसर स्टीव्ह जार्डिंग या प्रचार‘तांत्रिकां’चा.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील नरेंद्र मोदींचे यश आणि बिहारमधील नितीश कुमार यांचा विजय यांत मोठा वाटा होता तो प्रशांत किशोर यांचा. ते प्रचार-व्यूहरचनाकार. मोदी यांच्या प्रतिमानिर्मितीपासून ‘चाय पे चर्चा’पर्यंत विविध उपक्रम आखण्यात त्यांची भूमिका मोठी होती. बिहारमधील नितीश-लालू यांची युती झाली ती त्यांच्याच आग्रही आखणीनुसार असे सांगितले जाते. या युतीच्या राजकारणाने तेथे भाजपला पाणी पाजले. ते पाहून काँग्रेसने उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी त्यांना पाचारण केले. ते सांगतील त्याप्रमाणे तेथे राहुल गांधी यांनी निवडणूक धोरणे आणि प्रचार यांची आखणी केली. उत्तर प्रदेशात काँग्रेसने शीला दीक्षित हा ब्राह्मण चेहरा द्यावा किंवा प्रचारात शेतकरी हा प्रमुख मुद्दा असावा हा सल्ला त्यांचाच असल्याचे सांगितले जाते. काँग्रेस-सप यांच्या युतीचे तर ते एक शिल्पकार मानले जातात. मात्र या निवडणुकीत त्यांचे प्रचाराचे गणित साफ चुकल्याचे दिसते. प्रचारतंत्र कितीही प्रभावी असले, तरी अंतिमत: नेत्याचा चेहरा आणि वजन हेच महत्त्वाचे ठरते हेच यातून दिसले. हीच गोष्ट स्टीव्ह जार्डिग यांची.

हिलरी क्लिंटन, जॉन केरी यांचे प्रचारसल्लागार असलेले जार्डिग आणि त्यांचे माजी शिष्य अद्वैत विक्रमसिंह हे या निवडणुकीत अखिलेशसिंह यादव यांचा प्रचारविभाग सांभाळत होते. अखिलेश यादव यांची प्रतिमा-बदल हे त्यांच्यापुढील मोठे आव्हान होते. त्यात ते यशस्वी ठरले. अखिलेश यांना मुलायम यांच्या ‘छाये’तून बाहेर काढून त्यांची स्वच्छ आणि विकासाभिमुख नेत्याची छबी त्यांनी निर्माण केली. अखिलेश सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोचविण्यासाठी त्यांनी खेडोपाडी योजनाप्रमुख नेमले. त्यांच्या माध्यमातून त्यांनी अखिलेश यांचा अप्रत्यक्ष प्रचार करवून घेतला. सरकारबद्दलचे ‘पर्सेप्शन’ – लोकदृष्टिकोन – बदलण्यात त्याचा मोठा फायदा झाला, मात्र तो मतांमध्ये परावर्तित होऊ शकला नाही.