पंजाब विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश हे काँग्रेस पक्षाचा पुनर्जन्म आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी व्यक्त केली. ते शनिवारी पंजाबच्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. हा काँग्रेसचा पुनर्जन्म आहे. ही तर सुरूवात आहे. येथून पुढे काँग्रेसचा पुन्हा विस्तार होत जाईल, असे सिद्धू यांनी म्हटले. याशिवाय, पंजाबमधील या निकालांनी दृष्टांचा अहंकार तोडला असून हा धर्माचा विजय असल्याचेही सिद्धू यांनी म्हटले.

तर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनीदेखील पंजाब आणि गोव्यातील पराभव हे मोदींच्या नेतृत्त्वाचे अपयश असल्याचे म्हटले आहे. पंजाबमध्ये भाजपचा पराभव झाला असून गोव्यातही भाजपच्या मुख्यमंत्र्यांना पराभव स्विकारावा लागला आहे. हे मोदींच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे असल्याचे सुर्जेवाला यांनी म्हटले. जे लोक काँग्रेसमुक्त भारताची भाषा करतात त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. काँग्रेस या देशाचा आत्मा आहे, असे सुर्जेवाला यांनी म्हटले.

शिरोमणी अकाली दलाला सत्तेवरून खाली खेचत पंजाबमध्ये काँग्रेसने ऐतिहासिक यश संपादन केले. काँग्रेसने पंजाब विधानसभेच्या ११७ जागांपैकी ७४  जागांवर विजय मिळवला. पंजाब विधानसभेत बहुमतासाठी ५९ जागांची गरज होती. त्यामुळे आता पंजाबमध्ये काँग्रेस एकहाती सत्ता स्थापन करू शकणार आहे. देशपातळीवर सर्वत्रच पिछेहाट असलेल्या काँग्रेससाठी हे यश खूपच आशादायक ठरले आहे. तर दुसरीकडे निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहिलेल्या आम आदमी पक्षाला (आप) अपेक्षित यश मिळवता आले नाही. याठिकाणी काँग्रेस आणि आपमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळेल, असा अंदाज होता. मात्र, काँग्रेसने सुरूवातीपासूनच घेतलेली आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवली. त्यामुळे आपला केवळ २० जागांवर समाधान मानावे लागले.

दुसरीकडे गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या अकाली दल व भाजपला अपेक्षेप्रमाणे प्रस्थापितविरोधी लाटेचा (अँटी इन्कम्बन्सी) फटका बसला. मात्र, मतदानोत्तर चाचण्यांमधील अंदाजांप्रमाणे अकाली दल व भाजपचे पानिपत झाले नाही, हीच गोष्ट त्यांच्यादृष्टीने समाधानकारक ठरली. अकाली दल व भाजपला अनुक्रमे १५ आणि ३ जागांवर विजय मिळाला. तर लोक इन्साफ पार्टीला २ जागा मिळाल्या. मात्र, एकूणच निकाल पाहता काँग्रेसने पंजाबमध्ये निर्विवाद वर्चस्व मिळवले.  अकाली दलाला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले असले तरी बादल कुटुंबियांचे गड असलेल्या लंबी, जलालाबाद आणि मजिठा हे तिन्ही मतदारसंघ राखण्यात अनुक्रमे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल आणि बिक्रमजित सिंग माजिठिया यांना यश आले. याशिवाय, काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पतियाळा तर नवज्योत सिंग सिद्धू यांनी अमृतसर पूर्व मतदारसंघातून सहजपणे विजय प्राप्त केला. पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाला मिळालेले यश हा काँग्रेसचा पुनर्जन्म आहे, अशी प्रतिक्रिया विजयानंतर सिद्धू यांनी व्यक्त केली. येथून पुढे काँग्रेसचा देशात पुन्हा विस्तार होईल, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्याला पंजाबमधील पक्षाचा पराभव मान्य करत आम्ही या पराभवाचे आत्मपरीक्षण करु, असे सांगितले.