वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी उत्तरप्रदेशमधील जनादेश हा मुस्लिमविरोधी असल्याचे विधान केल्याने वाद निर्माण झाला आह. भारतात जर मुस्लिमांविरोधात एवढा राग असेल तर आम्हाला मतदानाचा हक्क का दिला असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

आझम खान यांनी ‘आजतक’ या हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी उत्तरप्रदेशमधील निकालावरुन भाजपवर टीका केली. उत्तरप्रदेशमधील निवडणूक लोकशाही मुल्यांवर झाली नाही. या निवडणुकीत ध्रुवीकरण झाले होते. कमळ हवे की कुराण, स्मशान हवे की कब्रस्तान या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली गेली असा आरोप त्यांनी केला. राज्यात यापूर्वीही सत्ताबदल झाला आहे. पण यंदा सत्ताबदल झाल्यावर मनात भीती निर्माण झाली आहे. राज्यातील कोट्यवधी जनतेच्या मनात हीच भीती असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या प्रचारात मोदी- मोदीच्या घोषणा द्या किंवा मग पाकिस्तानमध्ये जा अशा धमक्याच दिल्या जात होत्या. आता राज्यातील मुस्लिमांनी कुठे जायचे असा सवालच त्यांनी उपस्थित केला.

भाजपने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या १८० जणांना तिकिट दिले होते. यातील १४० जण निवडून आले. पण आमच्या नेत्यांनी गुन्हेगारांना तिकिट दिले नाही असे आझम खान यांनी निदर्शनास आणून दिले. निवडणुकींच्या निकालावर प्रश्न उपस्थित होत आहे. इतिहासात जे झाले नाही ते यंदा झाल्यानेच निवडणुकीवर प्रश्न उपस्थित होत आहे. ब-याच ठिकाणी एकूण मतदारांपेक्षा मताचे प्रमाण जास्त होते असा आरोप त्यांनी केला. बहुजन समाज पक्ष आणि आम आदमी पक्षाने याविरोधात लढाई सुरु केली असून त्यांना पाठिंबाही मिळत आहे. विदेशात ईव्हीएमद्वारे मतदान का होत नाही, जपानमध्ये ही पद्धत का नाही असा प्रश्न आता सोशल मीडियावर उपस्थित होत असल्याचे आझम खान म्हणालेत.

भाजपला मुस्लिम चांगले आहेत असं वाटत असेल तर त्यांनी एकही मुस्लिम उमेदवार का दिला नाही असा सवाल आझम खान यांनी भाजपला विचारला. मुस्लिमांमध्ये दहशतीचे वातावरण का आहे ? काही शहरांमध्ये विजयी मिरवणूक निघाली असताना मशिदींना का झाकले गेले, समाजात तेढ का निर्माण केली जात आहे असे प्रश्नच त्यांनी भाजपला विचारले आहेत. मोदी हे महान आहेत. पण ते आश्वासनं पूर्ण करत नाही. रमझान आणि दिवाळीच्या गप्पा मारताना मोदींनी त्यांची महानता का नाही दाखवली असा सवाल त्यांनी विचारला. भारतात जर मुस्लिमांविरोधात ऐवढा राग असेल तर आम्हाला मतदानाचा हक्क का दिला, आमच्याकडून हा हक्क हिरावून घ्या, म्हणजे आम्हीदेखील आनंदात राहू असे ते म्हणालेत.