पीटीआय, लखनऊ : विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेवर आल्यानंतर महिनाभरातच भाजपने विधान परिषद निवडणुकीतही मोठा विजय मिळवला आहे. मात्र वाराणसीत भाजपला धक्का बसला आहे. तिथे भाजप उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला. भाजपने जाहीर २७ जागांपैकी २२ ठिकाणी विजय मिळवला आहे, तर ९ जागा त्यांच्या यापूर्वीच बिनविरोध आल्या आहेत.
या विजयामुळे शंभर सदस्य असलेल्या उत्तर प्रदेश विधान परिषदेत भाजपने बहुमत मिळवले आहे. या निवडणुकीपूर्वी भाजपचे विधान परिषदेत ३४ सदस्य होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात भाजपचा धक्कादायक पराभव झाला आहे. तेथे पक्षाच्या उमेदवाराला केवळ १७० मते मिळाली. वाराणसीत अपक्ष अन्नपूर्णा सिंह यांनी विजय मिळवला आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. दोन अपक्ष तसेच जनसत्ता दल (लोकतांत्रिक) पक्षाला एक जागा मिळाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. काँग्रेस तसेच बहुजन समाज पक्षाने या निवडणुकीत उमेदवार उतरवले नव्हते. भाजप व समाजवादी पक्षात थेट लढत झाली होती.