२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपला राक्षसी बहुमत मिळाल्याने अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. एकुणच निकालांवर नजर टाकल्यास पाहता भाजपने बांधलेले आडाखे शत-प्रतिशत अचूक ठरल्याचे दिसत आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा न देण्याची भाजपची रणनीती पुन्हा एकदा यशस्वी ठरली आहे. त्यामुळे भाजपला निवडणूक जिंकण्याचा पॅटर्न सापडलाय, अशा चर्चा आता रंगायला सुरूवात झाली आहे.

यापूर्वी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्याचा प्रयोग करून पाहिला होता. दिल्लीत भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी किरण बेदी यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र, या निवडणुकीत ‘आप’ने भाजपला धूळ चारली होती. त्यानंतरच्या बिहार निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित न करूनही भाजपचे पानिपत झाले होते. जदयूकडून नितीश कुमार यांना सुरूवातीपासूनच मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्यात आले होते. बिहारमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार न घोषित केल्याचा फटका भाजपला बसल्याचे म्हटले जात होते. या अनुभवांमुळे भाजपच्या गोटात मुख्यमंत्रिपदाच्या घोषणेच्या रणनीतीविषयी साशंकता होती. मात्र, मात्र, तरीदेखील उत्तर प्रदेशात भाजपने आपल्या रणनीतीवर ठाम राहत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्याचे टाळले. तरीदेखील आजच्या निकालांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा हा फॅक्टर तितकासा महत्त्वाचा नसल्याचे या निकालांनी सिद्ध केले आहे.  यापूर्वी हरियाणा, महाराष्ट्र, आसाम याठिकाणीही भाजपने केवळ मोदी फॅक्टर केंद्रस्थानी ठेवून निवडणुका लढवल्या होत्या.

उत्तर प्रदेशमधील आजच्या एकुणच निकालांवर नजर टाकल्यास याठिकाणी भाजपने सत्ताधाऱ्यांविरोधातील अँटी इन्कम्बन्सीचा पुरेपूर फायदा उठविल्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार न घोषित केल्याचा पक्षाला फारसा फटका बसलेला नाही. याशिवाय, प्रत्येक मतदारसंघात केलेले मायक्रो मॅनेजमेंटही भाजपसाठी फायदेशीर ठरले आहे.

दरम्यान, आता उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रपदी कोण विराजमान होणार, याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. याशिवाय, लखनऊनचे महापौर दिनेश शर्मा आणि रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा या शर्यतीमधील डार्क हॉर्स मानले जात आहेत. मात्र, राष्ट्रीय राजकारणातील उत्तर प्रदेशचे स्थान पाहता याठिकाणी भाजपला तोलामोलाचा चेहरा द्यावा लागणार आहे.