चुकीच्या धोरणांमुळे तुमचा पराभव; अरुण जेटलींनी मायावतींना सुनावले

मतदान यंत्रात घोटाळा केल्याचा आरोप मायावतींनी केला होता.

अरुण जेटली (संग्रहित छायाचित्र)

मतदान यंत्रामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणा-या बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतींना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी प्रत्युत्तर दिले आहे. मायावती यांचा पराभव हा चुकीच्या धोरणांमुळे झाला असून त्यांनी पराभवाचा स्वीकार केला पाहिजे असे जेटली यांनी म्हटले आहे.

उत्तरप्रदेशमधील निवडणुकीत भाजपच्या झंझावातसमोर मायावती निष्प्रभ ठरल्या. निवडणुकीतील निकालानंतर पत्रकार परिषदेत मायावती यांनी भाजपवर आरोप केले होते. मतदान यंत्रातील कुठलेही बटण दाबले तरी ते मत भाजपच्या उमेदवाराला पडेल अशा रितीने या यंत्रांमध्ये घोटाळा करण्यात आला असा आरोप मायावतींनी केला होता. मायावतींच्या या आरोपावर अरुण जेटली यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अरुण जेटली म्हणाले, मायावतींनी असे आरोप करणे योग्य नाही. भारत हा लोकशाही असलेला सर्वात मोठा देश आहे. मायावतींचा पराभव हा त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे झाला असे सांगत जेटलींनी मायावतींनी केलेले आरोप फेटाळून लावले. नोटाबंदीचा निर्णय जनतेला पटला असून या निर्णयामुळे भाजपला फायदाच झाला असे त्यांनी आवर्जून सांगितले.

दरम्यान, उत्तरप्रदेशमधील मुस्लिमबहूल भागात भाजपला जास्त मतं कशी मिळाली असा प्रश्न उपस्थित करत हिंमत असेल तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी व्होटींग मशिनऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे असे खुले आव्हान मायावती यांनी निकालानंतर दिले होते. लोकशाहीला धोका निर्माण झाला असून याप्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे असे त्यांनी म्हटले होते. मायावतींच्या बसपला उत्तरप्रदेशात फक्त १९ जागांवर विजय मिळाला आहे. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत मायावतींच्या पक्षाला भोपळाही फोडता आला नाहीत. लागोपाठ दोन निवडणुकांमध्ये अपयश आल्याने मायावतींच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व उत्तर प्रदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Uttar pradesh election results 2017 mayawati lost because of wrong policies says arun jaitely