उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला दिमाखदार विजय मिळाला आहे. भाजपच्या या विजयाचे श्रेय अमित शहा यांना दिले जात असले तरी सुनील बन्सल यांच्या चाणक्यनितीमुळेच भाजपला हे घवघवीत विजय मिळाले आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले. मोदींच्या विजयात उत्तरप्रदेशचे मोलाचे योगदान होते.८० पैकी ७२ जागांवर भाजपला विजय मिळाला होता. लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत व्हावी यासाठी भाजपने कंबर कसली होती. भाजपची धूरा सोपवण्यात आली होती ती सुनील बन्सल यांच्याकडे. अमित शहा यांचा उजवा हात म्हणून ओळखले जाणारे सुनील बन्सल हे उत्तरप्रदेशमध्ये सुनीलजी म्हणून परिचित आहेत.

सुनील बन्सल हे मूळचे राजस्थानमधील. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रीय असलेले ४७ वर्षीय बन्सल हे अमित शहा यांच्या मर्जीतले नेते झाले. लोकसभेतील विजयात सुनील बन्सल आणि अमित शहा यांच्या मेहनतीमुळेच भाजप – अपना दलला विजय मिळाले होते. याविजयामुळे शहा यांचा बन्सल यांच्यावरील विश्वास आणखी वाढला आणि बन्सल यांची उत्तरप्रदेशमधील महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.

विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी करतानाच सुनील बन्सल यांनी राज्यात भाजपच्या उणीवा हेरल्या आणि लागलीच त्यादृष्टीने कामाला सुरुवात केली. उत्तरप्रदेशमध्ये भाजपचा ग्रामीण भागात जनसंपर्क दांडगा नव्हता. बन्सल राज्यात सक्रीय होताच २०१५ मध्ये उत्तरप्रदेशमधील पंचायत समिती निवडणुकीत भाजप तीन हजारहून अधिक जागांवर लढला. यात भाजपला अवघ्या साडे तीनशे जागांवर विजय मिळाला होता. पण या निवडणुकीत भाजपला ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यात यश आले.

२०१६ पर्यंत बन्सल यांनी १.२८ लाख बूथपर्यंत पक्ष कार्यकर्त्यांची फौज तयारी केली. याशिवाय भाजप हा उच्चवर्णीयांचा पक्ष असल्याची प्रतिमा होती. पण बन्सल यांनी प्रतिमा बदलताना बूथ लेव्हलवर कार्यकर्त्यांशी संवाद वाढवला. दलित,ओबीसी, महिला आणि तरुणांशी पक्षाचा संवाद वाढवण्यावर त्यांनी भर दिला होता. याशिवाय खासदारांनी मोदी आणि अमित शहा यांच्या सभेत हजेरी लावण्याऐवजी उमेदवारांना मैदानात उतरुन मदत करावी अशा सूचना त्यांनी जारी केल्या. बन्सल यांच्या या मेहनतीने कमळ फुलले असून भाजपला बन्सल यांच्या रुपाने आधुनिक चाणक्य लाभल्याची चर्चा रंगली आहे.