Vinesh Phogat in Paris Olympic : भारताची आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विनेश फोगट हरियाणातील विधानसभा निवडणुकीत उतरली आहे. जुलाना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने तिला उमेदवारी दिली आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत वजनामुळे अपात्र ठरलेल्या विनेश फोगटने आता या स्पर्धेवरून भारत सरकारवर टीका केली. सरकारने अपात्रतेविरोधात याचिकाही दाखल केली नाही, असा गंभीर आरोप तिने केला. तसंच, आमच्या समस्या सोडवण्यापेक्षा त्यांना माध्यमांना प्रतिक्रिया देणं जास्त महत्त्वाचं वाटलं, असं ती म्हणाली. एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत १०० ग्रॅम अतिरिक्त वजन भरल्यामुळे अंतिम सामन्यातून विनेश फोगट अपात्र ठरली. या अंतिम सामन्यातून तिच्याकडून सुवर्णपदकाची आशा होती. परंतु, ती अपात्र ठरल्याने भारताला मिळणाऱ्या सुवर्ण पदकाची आशा मालवली. त्यामुळे या अपात्रतेविरोधात आणि रौप्यपदक मिळावं म्हणून तिने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टमध्ये स्वतःहून याचिका दाखल केली. या प्रक्रियेत भारत सरकारने योग्य सहकार्य केलं नसल्याचा तिचा दावा आहे. ती म्हणाली, “याचिका कोणी दाखल केली पाहिजे होती? भारत सरकारने की मी? मी याचिका दाखल केली. पॅरिसमधील वकिलांनी याचिका दाखल केली होती. माझ्या नावाने याचिका दाखल झाली होती, भारताच्या नावाने नाही. भारत या याचिकेत थर्ड पार्टी होता. आम्ही भारताचं प्रतिनिधित्व करायला गेलो होतो. कोणत्याही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारत सरकार प्रतिनिधित्व करतं ना. आपला देश आम्हाला का निवडून पाठवतं, यासाठीच ना की आम्ही देशातील प्रत्येक नागरिकाचं प्रत्येक पावलावर प्रतिनिधित्व करावं. त्यामुळे हे सरकारचं कर्तव्य बनतं. पण ते माध्यमांना प्रतिक्रिया द्यायला जात होते.”

हेही वाचा >> Vinesh Phogat : “इच्छा नसतानाही काही निर्णय घ्यावे लागतात”, विधानसभेचा प्रचार सुरू करताना विनेश फोगटचं मोठं वक्तव्य

बऱ्याच गोष्टी पडद्यामागे घडतात

“पीटी उषा रुग्णालयात भेटायला आल्या होत्या. त्यांनी काही विचारलंही नाही. राजकारणात पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत असतात. तसंच, इथंही राजकारण घडत असतं. प्रत्येक ठिकाणी राजकारण आहे. तुम्ही न सांगता फोटो काढता आणि सोशल मीडियावर फोटो टाकता आणि म्हणता की त्यांच्यासोबत होते. पीटी उषा यांच्यासोबतची भेट म्हणजे यापेक्षा वेगळं काही नव्हतं”, असंही विनेश फोगट म्हणाली.

ती पुढे म्हणाली, “तुम्ही संजय सिंगकडून सकारात्मक परिणामांची अपेक्षा करू शकत नाही. त्यांच्या हेतूबद्दल काही शंकाच नाही. कारण आम्ही त्यांच्यावर विश्वासच ठेवू शकत नाही. ते ब्रिजभूषण शरण सिंह यांचा डमी उमेदवार आहेत. WFI अजूनही ब्रिजभूषण यांच्या घरी चालते.”