Vinesh Phogat Campaign Haryana Assembly Election : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात पक्षाने ३१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानुसार पक्षाने कुस्तीपटू विनेश फोगट हिला झुलाना मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर होताच विनेशने प्रचाराला सुरुवातही केली आहे. झुलानामधील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विनेशसाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर विनेश फोगट हिने मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी विनेशने प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. ती म्हणाली, “आयुष्यात बऱ्याचदा असे प्रसंग येतात की तुमची इच्छा नसतानाही तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात. मी माझ्या वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन हा निर्णय (निवडणूक) घेतला आहे”.

विनेश म्हणाली, वडीलधाऱ्यांशिवाय, परमेश्वराशिवाय आपण काहीच करू शकत नाही. तेव्हाही त्यांनीच जिंकवलं होतं, आताही तेच जिंकवतील. त्यांच्याशिवाय आपलं अस्तित्व शून्य आहे. जो कष्ट करेल त्याला वडीलधाऱ्यांचा, परमेश्वराचा आशीर्वाद मिळेल. मी मतदारसंघात फिरतेय, येथील महिला माझ्याकडे खूप अपेक्षेने पाहत आहेत. मी त्यांना आश्वस्त करू इच्छिते की मी नेहमी त्यांच्या पाठिशी उभी राहीन. बऱ्याचदा आयुष्यात अशी स्थिती येते जेव्हा तुम्हाला काही गोष्टी मनाविरोधात कराव्या लागतात. मी माझ्या वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतले आणि कामाला लागले.

गेल्या आठवड्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या नेतृत्वात दिल्लीत काँग्रेस नेत्यांची हरियाणा विधानसभेबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विनेश फोगाटसह ३१ उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या बैठकीला लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, हरियाणा काँग्रेसचे प्रमुख नेते भूपेंद्र सिंह हुड्डा व काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. काँग्रेसने विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्याच्या काही तास आधी विनेश फोगाटने काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

हे ही वाचा >> Rahul Gandhi : “शिखांना पगडी व कडं परिधान करण्याची…”, राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपाचा संताप; म्हणाले, “काँग्रेसने कत्तली घडवून…”

बृजभूषण सिंहांबाबत विनेश काय म्हणाली?

दरम्यान, विनेशने आज तिच्या प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर ती म्हणाली, “मी माझ्या वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन या मैदानात उतरले आहे. त्यांच्या आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने माझा विजय होईल”. दरम्यान, तिला बृजभूषण शरण सिंह यांच्या टीकेवर प्रतिक्रिया विचारली असता विनेश म्हणाली, “बृजभूषण म्हणजे संपूर्ण भारत देश नाही. माझा देश माझ्याबरोबर उभा आहे. माझं कुटुंब, मित्र-परिवार माझ्याबरोबर उभा आहे. माझ्यासाठी तेच सर्वकाही आहेत”.