Lok Sabha Election Voting : लोकसभा निवडणुकीत मतदान वाढवण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे. यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांसह सर्वच पक्ष आणि उमेदवारांकडून जोरदार प्रचार चालू असला तर मतदारांमध्ये निवडणुकीबाबत मोठा उत्साह पाहायला मिळालेला नाही. मतदारांनी मतदान केंद्रांकडे पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याआधीच्या निवडणुकांपेक्षा यंदा मतदानाची टक्केवारी घसरल्याचं पाहायला मिळत आहे. परिणामी लोकांनी मतदान करावं यासाठी निवडणूक आयोगाला अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. अशातच नॅशनल रेस्तराँ असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) निवडणूक आयोगाच्या मदतीसाठी पुढे आली आहे.

निवडणूक आयोग वेगवेगळ्या जाहिराती, पथनाट्यांद्वारे लोकांमध्ये मतदानासाठी जनगागृती करत आहे. त्यांना या कामात महाविद्यालये, शाळा आणि स्वयंसेवी संस्थांचीदेखील मदत मिळत आहे. अनेक सेलिब्रेटी आणि खेळाडूदेखील लोकांना मतदानाचं आवाहन करत आहेत. दरम्यान, रेस्तराँ असोसिएशननेदेखील मतदान वाढावं यासाठी पुढाकार घेतला आहे. मुंबईतील अनेक रेस्तराँ मालकांनी मतदान करून आलेल्या मतदारांना २० आणि २१ मे रोजी जेवणावर सूट देऊ केली आहे. मुंबईतील १०० हून अधिक रेस्तराँमध्ये ही सूट उपलब्ध असेल.

नॅशनल रेस्तराँ असोसिएनशन ऑफ इंडियाच्या मुंबई विभागाने एक अधिकृत निवेदन जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी ‘डेमोक्रसी डिस्काउंट’ची घोषणा केली आहे. रेस्तराँ असोसिएनशनची ही डेमोक्रसी डिस्काउंट मोहीम लोकांना मतदान करण्यास प्रोत्साहित करेल, असा विश्वासही संस्थेने व्यक्त केला आहे. एनआरएआयच्या मुंबई विभागाच्या प्रमुख रेचल गोएंका म्हणाल्या, मुंबई शहराने नेहमीच आपली सामाजिक जबाबदारी निभावली आहे. आमच्या संस्थेशी संलग्न अनेक ब्रँड्स या ‘डेमोक्रसी डिस्काउंट’ मोहिमेत सहभागी झाले आहेत आणि याचा आम्हाला खूप आनंद आहे.

‘डेमोक्रसी डिस्काउंट’ या मोहिमेअंतर्गत एनआरएआयशी संलग्न रेस्तराँमध्ये जेवणाऱ्या मतदारांना त्यांच्या एकूण बिलावर २० टक्के सूट दिली जाईल. यासाठी मुंबईकरांना रेस्तराँमध्ये बिल भरताना केवळ मतदान केल्यानंतर बोटावर लावली जाणारी शाई दाखवावी लागेल.

मुंबईत २० मे रोजी मतदान

मुंबईत येत्या २० मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यामुळे नागरिकांना २० आणि २१ मे रोजी या ‘डेमोक्रसी डिस्काउंट’चा लाभ घेता येईल.

हे ही वाचा >> “नकली राष्ट्रवादी, शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार”, मोदींच्या दाव्यावर शरद पवार म्हणाले, “मी सुचवलेलं की…”

मतदानात घट

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान पार पडलं. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार या मतदारसंघांमध्ये केवळ ६३ टक्के मतदान झालं. २०१९ मध्ये तिसऱ्या टप्प्यात ६८.४० टक्के मतदान झालं होतं. प्राथमिक आकडेवारीनुसार मतदानात ५ टक्के घट झाली आहे.