पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा दुसरा आणि अखेरचा टप्पा पार पडतो आहे. सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीतला हा टप्पा अत्यंत निर्णायक मानला जातो आहे. पश्चिम बंगाल विधानसभेत एकूण २९४ जागा आहेत. त्यापैकी १४२ जागांसाठी मतदान सुरु झालं आहे. बंगालची ही निवडणूक तृणमूल काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. दुसऱ्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये विक्रमी ९१.६६ टक्के एवढे मतदान झाले आहे.
दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण ९१.६६ टक्के मतदान
पश्चिम बंगालच्या दुसऱ्या टप्प्यातील एकूण मतदान ९१.६६ टक्के एवढे झाले आहे. पहिल्या टप्प्यात राज्यात ९३.१९ टक्के मतदान झाले होते. दोन्ही टप्प्यातील मतदानाची आकडेवारी आता ९२.४७ टक्के एवढी झाली आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत ८९.९९ टक्के मतदान
पश्चिम बंगालमध्ये आज दुसऱ्या टप्पातील मतदान पार पडले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात उर्वरीत १४२ जागांसाठी एकूण ८९.९९ टक्के मतदान झाले. २०२१ मध्ये याच जागांसाठी ८०.४ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानांच्या टक्केवारीत अजून वाढ होण्याची शक्यता निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
बंगालमध्ये दुपारी ३ पर्यंत ७८.६८ टक्के मतदान
पश्चिम बंगालमध्ये मतदानाचा दुसरा आणि अखेरचा टप्पा आहे. या दिवसाची वाटचालही रेकॉर्डब्रेक मतदानाच्या दिशेने होताना दिसते आहे. कारण दुपारी ३ वाजेपर्यंत ७८.६८ टक्के मतदान झालं आहे.
दुपारी ३ वाजेपर्यंत कुठल्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झालं?
हुगळी – ८०.७७ टक्के
हावडा- ७७.७३ टक्के
कोलकाता उत्तर-७८ टक्के
कोलकाता दक्षिण-७५.३८ ट्क्के
नाडिया-७९.७९ टक्के
उत्तर २४ परगणा-७७.३९ टक्के
पूर्ब बर्दमान-८३.११ टक्के
दक्षिण २४ परगणा-७६.७५ टक्के
पश्चिम बंगालमध्ये दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदानाची नोंद
पश्चिम बंगालमध्ये मतदानाचा दुसरा आणि अखेरचा टप्पा आहे. या दिवसाची वाटचालही रेकॉर्डब्रेक मतदानाच्या दिशेने होताना दिसते आहे. कारण दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान झालं आहे.
दुपारी १ वाजेपर्यंत कुठल्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झालं?
हुगळी – ६४.५७ टक्के
हावडा- ६०.६८ टक्के
कोलकाता उत्तर-६०.१८ टक्के
कोलकाता दक्षिण-५७.५३ ट्क्के
नाडिया-६१.४१ टक्के
उत्तर २४ परगणा-५९.५३ टक्के
पूर्ब बर्दमान-६६.८० टक्के
दक्षिण २४ परगणा-५८.५८ टक्के
सकाळी ११ वाजेपर्यंत ४० टक्के मतदानाची नोंद
बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडते आहे. १४२ जागांसाठी आज मतदान होतं आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत बंगालमध्ये ४० टक्के मतदान पार पडलं आहे. या टप्प्यातही बंगालमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान होणार अशी चिन्हं दिसून येत आहेत. विविध जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. तरीही सकाळी ११ पर्यंत ४० टक्के मतदान पार पडलं आहे.
सकाळी ११ वाजेपर्यंत कुठल्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झालं?
हुगळी – ४३.१२ टक्के
हावडा- ३९.४५ टक्के
कोलकाता उत्तर-३८.३९ टक्के
नाडिया-४०.३४ टक्के
उत्तर २४ परगणा-३८.४३ टक्के
पूर्ब बर्दमान-४४.५० टक्के
दक्षिण २४ परगणा-३७.९२ टक्के
भवानीपूरची लढत सर्वात लक्षवेधी
दुसऱ्या टप्प्यातील सर्वात लक्षवेधी लढत भवानीपूर मतदारसंघात होत आहे. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाजपचे दिग्गज नेते आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी हे निवडणूकीच्या मैदानात आहेत. ‘दीदी’ आपल्या बालेकिल्ल्यात विजय मिळवणार की सुवेंदू अधिकारी मैदान मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
८ जिल्ह्यांमध्ये १४२ मतदारसंघात मतदान
दुसऱ्या टप्प्यात प्रामुख्याने कोलकाता आणि आसपासच्या ८ जिल्ह्यांमधील १४२ मतदारसंघांचा समावेश आहे
उत्तर २४ परगणा: ३३ जागा
दक्षिण २४ परगणा: ३१ जागा
हुगळी: १८ जागा
नदिया: १७ जागा
पूर्व वर्धमान: १६ जागा
हावडा: १६ जागा
कोलकाता (उत्तर व दक्षिण): ११ जागा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मतदानाच्या दिवशी मतदांना उद्देशून पोस्ट केली आहे. “मी मतदारांना आवाहन करतो आहे की लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान नक्की करा. पश्चिम बंगाल निवडणुकीचा आज दुसरा टप्पा आहे. रेकॉर्ड ब्रेक मतदान करा असं मी आवाहन करतो आहे. पश्चिम बंगालच्या महिला, माता-भगिनी, युवक आणि माझे बांधव यांना मी आवाहन करतो आहे की मोठ्या प्रमाणावर मतदान करा.”
सोनार बांगलासाठी मतदान करा, अमित शाह यांचं आवाहन
बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरु झालं आहे. दरम्यान भाजपाचे वरिष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री यांनी सोनार बांगलासाठी मतदान करा असं आवाहन केलं आहे. अमित शाह यांनी पोस्ट केली आहे. अमित शाह यांनी म्हटलं आहे की बंगालला भयमुक्त करायचं असेल, सिंडिकेटच्या भ्रष्टाचारातून बाहेर काढायचं असेल, भ्रष्टाचार मुक्त शासन हवं असेल तर युवक, माता-भगिनी आणि माझे बांधव या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावं असं आवाहन मी करतो आहे. तुमचं एक मत बंगालचा चेहरा बदलण्यासाठी काम करु शकतं असंही त्यांनी म्हटलं आहे.
दुसऱ्या टप्प्यातले इतर महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला
भवानीपूरसह बिधाननगरमध्ये राज्य मंत्री सुजीत बोस, कोलकाता पोर्टमध्ये फिरहाद हकीम, हावडा येथून ज्योतिप्रिया मल्लिक, दम दम मधून ब्रात्य बसु, बालीगंज मधून सोवंदेब चटोपाध्याय, उत्तरपाडातून मीनाक्षी मुखर्जी हे महत्त्वाचे उमेदवारही निवडणुकीच्या मैदानात आहेत.
