कर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३ चा निकाल स्पष्ट झाला असून १३५ जागा जिंकून काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. यानिमित्ताने २०१८ च्या विधानसभा निवडणुकांची पुन्हा एकदा आठवण होत आहे. त्या वेळी झालेल्या निवडणुकीच्या निकालातून त्रिशंकू विधानसभा झाली होती. जेडीएस-भाजपाने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. मात्र २०१९ साली भाजपाने ऑपरेशन लोटस करून दोन्ही पक्षांचे १७ आमदार फोडले. या आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे तत्कालीन जेडीएस-काँग्रेसचे सरकार गडगडले. बंडखोरी करून पोटनिवडणुकीला सामोरे गेलेल्या काही आमदारांना भाजपाने मंत्रिपद देऊ केले, काहींना दिल्लीत पाठवले, तरी काहींचे तिकीट नंतर कापण्यात आले. २०१९ साली बंडखोरी करून भाजपावासी झालेल्या यातील काही आमदारांना भाजपाने पुन्हा तिकीट दिले होते, मात्र त्यापैकी सर्वांना विजय मिळू शकला नाही. अनेकांचा यात पराभव झालेला आहे.

ऑपरेशन लोटस आणि भाजपाची सत्ता

२०१८ साली झालेल्या निवडणुकीत भाजपाने २२४ पैकी १०४ जागा मिळवल्या. मात्र बहुमताच्या ११३ या आकड्यापासून भाजपा दूर होते. काँग्रेसने या निवडणुकीत ७६, तर जेडीएसने ३७ जागा जिंकल्या होत्या. इतर अपक्ष आमदारांसह ११६ आमदारांच्या पाठिंब्यावर जेडीएस-काँग्रेसने सरकार स्थापन केले. मात्र एका वर्षाच्या आतच भाजपाने ऑपरेशन लोटस राबवून हे सरकार पाडले. भाजपाने दोन्ही पक्ष आणि एक अपक्ष मिळून १७ आमदार फोडले होते. या १७ पैकी दोन आमदारांनी या वेळी निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. एका आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मात्र त्यांचा पराभव झाला. उर्वरित १४ आमदारांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मात्र यापैकी आठ जणांचा पराभव झाला आहे आणि फक्त सहा आमदारांना आपला मतदारसंघ राखता आला.

Ramtek Lok Sabha seat, rasmi barve Caste Certificate, Caste Certificate Controversy, raju parve Nomination Displeasure, favours congress, Challenges Shiv Sena, eknath shinde shivsena, lok sabha 2024, politics news, election news, marathi news
रश्मी बर्वे यांना मिळणाऱ्या सहानुभूतीमुळे शिवसेनेपुढे आव्हान; रामटेक लोकसभा मतदारसंघाचे चित्र
Dhule District Congress President,
धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्षांचा राजीनामा देण्याचे कारण काय ?
MLA Bharat Narah resigned from Congress
काँग्रेसला मोठा धक्का; पत्नीला लोकसभेचे तिकीट न मिळाल्याने ‘या’ आमदाराचा राजीनामा
readers reaction on articles
पडसाद : आघाडीपेक्षा भाजपला या निवडणुकीची चिंता!

बंडखोर आमदारांची कामगिरी कशी राहिली

२०१८ साली १२ आमदारांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. १७ पैकी एक असलेले एच. विश्वनाथ यांना विधान परिषदेवर घेण्यात आले होते. मात्र त्यांनी या वर्षी एप्रिल महिन्यात राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार रोशन बेग यांनी २०१९ साली पोटनिवडणूक लढविली नाही आणि या वेळी त्यांनी निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. भाजपाने १० मे रोजी झालेल्या निवडणुकीसाठी १२ विद्यमान आमदारांना तिकीट दिले होते. तर पोटनिवडणुकीत पराभूत झालेल्या इतर दोन माजी आमदारांनाही या वेळी तिकीट देण्यात आले. यापैकी नऊ जणांचा पराभव झाला आहे, तर सहा जणांना निवडणुकीत विजय मिळवता आलेला आहे.

बंडखोरी केलेले काँग्रेस माजी आमदार रमेश जारकीहळ्ळी यांनी २०२३ च्या निवडणुकीत गोकाक विधानसभा मतदारसंघातून सर्वात चांगली कामगिरी केल्याचे दिसून येते. काँग्रेस-जेडीएसचे सरकार पाडण्यात जारकीहळ्ळी यांचा प्रमुख सहभाग होता. या वेळी त्यांनी एक लाखाहून अधिकची मते घेऊन दणदणीत विजय मिळवला आहे. बंडखोरी केलेल्यांपैकी सात जणांना भाजपा सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले होते, त्यापैकी सहा जणांना आपला मतदारसंघ राखता आला आहे. पण बीसी पाटील यांना हिरेकेरूर येथून पराभव सहन करावा लागला आहे.

पराभूत झालेले आमदार

१. प्रतापगौडा पाटील (काँग्रेस) मस्की विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले होते. पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला होताच. या वेळीदेखील काँग्रेसच्या उमेदवाराकडून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

२. महेश कुमठळ्ळी (काँग्रेस) अथनी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे होते. लिंगायत समाजाचे नेते असलेल्या कुमठळ्ळी यांना काँग्रेसच्या लक्ष्मण सावदी यांनी पराभूत केले आहे. (लक्ष्मण सावदी यांचे तिकीट कापल्यामुळे एक महिन्यापूर्वीच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता.)

३. बीसी पाटील (काँग्रेस) हिरेकेरुर विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार राहिलेले आहेत. तीन वेळा जेडीएस आणि दोन वेळा काँग्रेसचे प्रतिनिधित्व त्यांनी केले होते. बोम्मई सरकारमध्ये त्यांनी कृषीमंत्री म्हणून काम केले. काँग्रेसचे उमेदवार उजनेश्वार बसवन्नप्पा यांनी त्यांचा पराभव केला.

४. श्रीमंत पाटील (काँग्रेस) कागवाड विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकले होते. काँग्रेसमधून त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. या वेळी काँग्रेसच्या भरमगौडा कागे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

५ – के. सुधाकर (काँग्रेस) चिकबळ्ळापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीत उभे होते. काँग्रेसच्या प्रदीप ईश्वर यांनी त्यांचा पराभव केला. बोम्मई सरकारच्या काळात ते आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री होते.

६) के. सी. नारायण गौडा (जेडीएस) क्रिष्णाराजपेट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत होते. जनता दलाच्या एच. टी. मंजू यांनी त्यांचा पराभव केला.

७) एन. नागाराजू (काँग्रेस) होसकोटे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत होते. या वेळी भाजपाच्या तिकिटावर त्यांनी एक लाखाहून अधिक मते मिळवली, तरीही त्यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या शरथ कुमार बच्चेगौडा यांचा येथून विजय झाला.

८) २०१९ साली विजयानगरचे आमदार असलेल्या आनंद सिंह (काँग्रेस) यांनी बंडखोरी केली होती. या वेळी त्यांचे पुत्र सिद्धार सिंह ठाकूर यांना भाजपाने तिकीट दिले होते, मात्र त्यांना हा मतदारसंघ गमवावा लागला. काँग्रेसच्या एच. आर. गवियप्पा यांचा येथे विजय झाला.

९) आर. शंकर (अपक्ष) यांनी २०१९ साली बंडखोरी करून भाजपात प्रवेश केला होता. भाजपाने त्यांची वर्णी विधान परिषदेवर लावली होती. या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर रानीबेण्णूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही.

विजयी झालेले आमदार

१) रमेश जारकीहोळी (काँग्रेस) यांचा गोकाक मतदारसंघातून मोठ्या फरकाने विजय झाला आहे. २०१९ साली जेडीएस-काँग्रेसचे सरकार पाडण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. बी. एस. येडियुरप्पा यांच्या सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊ केले होते. मात्र सेक्स सीडी प्रकरणात २०२१ साली त्यांनी राजीनामा दिला.

२) एन. मुनिरत्ना (काँग्रेस) राजराजेश्वरीनगर येथून निवडणूक लढवीत होते. मार्च २०२३ मध्ये त्यांच्यावर ख्रिश्चन समुदायाविरोधात द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तरीही भाजपाने त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना उमेदवारी दिली. १,२७,९८० मते मिळवीत त्यांचा विजय झाला.

३) के. गोपालैह्या (जेडीएस) महालक्ष्मी लेआऊट मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. ९६ हजार ४२४ मते घेऊन त्यांनी विजय मिळवला.

४) बी. ए. बसवराज (काँग्रेस) यांनी के. आर. पुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. १ लाख ३९ हजार ९२५ मते घेऊन त्यांचा विजय झाला.

५) शिवराम हेब्बर (काँग्रेस) येल्लापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत होते. ७४ हजार ६९९ मतदान घेऊन त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला.

६) एस. टी. सोमशेखर (काँग्रेस) यांनी येशवंथपुरा येथून निवडणूक लढवली. १ लाख ६९ हजार मतदान घेऊन त्यांनी जेडीएसच्या उमेदवाराचा पराभव केला.

इतर दोन उमेदवारांचे काय झाले?

रोशन बेग आणि एच. विश्वनाथ यांनी २०२३ ची विधानसभा निवडणूक लढवली नाही.