Mumbai Mayor Post : महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी काही महानगरपालिकांमध्ये भाजपाला सहाकारी पक्ष किंवा प्रसंगी विरोधी पक्षातील काही गटांचा पाठिंबा घेण्याची तजवीज करावी लागली. तर दुसरीकडे राज्यात सत्तेत एकत्र असणाऱ्या पक्षांना स्थानिक पातळीवर आपल्याच मित्रपक्षाविरोधात उभं राहण्याचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार स्थानिक नेत्यांवर देण्याची वेळ ओढवली. या पार्श्वभूमीवर एकीकडे सत्तास्थापनेबाबत जवळपास सर्वच महानगरपालिकांमध्ये राजकीय नाट्य रंगत असताना दुसरीकडे महापौरपदाची सोडत हादेखील चर्चेचा विषय ठरला होता. ही सोडत अखेर जाहीर झाली आहे.

मातृशक्तीच्या नेतृत्वात महापालिका भ्रष्टाचार मुक्त करु-भाजपाचा नारा

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी खुला प्रवर्ग आणि महिला महापौर असा निकष ठरला आहे. त्यामुळे मुंबईच्या महापौरपदी महिलाच विराजमान होणार हे स्पष्ट झालं आहे. मातृशक्तीच्या नेतृत्वात मुंबई महापालिका भ्रष्टाचारमुक्त करु अशी प्रतिक्रिया भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी दिली आहे. दरम्यान मुंबईच्या महापौरपदासाठी कुठल्या नगरसेविकांची नावं चर्चेत आहेत हे आपण जाणून घेऊ.

महापौर पदाचा चेहरा म्हणून कुठल्या ५ नावांची चर्चा?

१) तेजस्वी अभिषेक घोसाळकर : तेजस्वी घोसाळकर यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला. १६ हजार ४८४ मतं मिळवत त्यांनी विजय मिळवला. त्यामुळे त्यांना मुंबईचं महापौरपद दिलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

२) योगीता सुनील कोळी : योगीता सुनील कोळी यांनी मालाडमधून विजय मिळवला आहे. त्यांनीही मोठं मार्जिन ठेवून हा विजय मिळवला आहे. त्यामुळेच त्यांचंही नाव महापौर पदाच्या शर्यतीत असण्याची शक्यता आहे.

३) आशा मराठे : भाजपाच्या आशा मराठे या तिसऱ्यांदा नगरसेविका झाल्या आहेत. त्यामुळे महापौर पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडणार का? याचीही चर्चा रंगली आहे.

४) अलका केळकर या भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यांनी मुंबईच्या उपमहापौर म्हणूनही काम केलं आहे. तसंच त्या चौथ्यांदा नगरसेविका झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे महापौर पद जाऊ शकतं अशीही एक चर्चा आहे.

५) या यादीतलं पाचवं नाव आहे रितू तावडे. रितू तावडे यांच्याकडे भाजपाच्या महिला मोर्चाचं पद आहे. तसंच त्या दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्यामुळे भाजपा त्यांना मोठी जबाबदारी देणार का? हे पाहणंही महत्त्वाचं असेल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही ५ नावं चर्चेत आहेत. पण भाजपा त्यांच्या धक्कातंत्रासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे यांच्यापैकीच कुणी नगरसेविका महापौर होईल असं मुळीच नाही. मुंबईच्या महापौरपदी खुल्या प्रवर्गातील महिला महापौर होईल हे नक्की झालं आहे. पण तो चेहरा कुणाचा असेल? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.