लोकसभा निवडणुकीत भाजपाला एकट्याच्या बळावर ३०० हून अधिका जागा मिळतील, असे भाकीत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी वर्तविले होते. त्यावरून त्यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. निकालानंतर त्यांचा अंदाज साफ चुकीचाा निघाल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर प्रशांत किशोर यांनी इंडिया टुडेला शुक्रवारी (दि. ७ जून) मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अंदाज चुकल्याचे प्रांजळपणे कबूल केले. तसेच मी पाचव्या टप्प्यातील मतदानावेळी अंदाज वर्तविला होता. त्यानंतर जे दोन टप्पे झाले, त्यात भाजपाला मोठे अपयश मिळाले, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत. तसेच भाजपाला २०१९ च्या तुलनेत यावेळी ६३ जागांचा फटका का बसला? याचेही निरीक्षण त्यांनी नोंदविले.

काय म्हणाले प्रशांत किशोर?

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रशांत किशोर यांना लोकसभा निवडणुकांच्या निकालातील तीन ते चार कळीचे मुद्दे कोणते? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्रशांत किशोर यांनी पहिलाच मुद्दा अहंकाराचा दर्प असल्याचे सांगितले. “समाजातील कोणत्याही घटकाला अहंकाराचा दर्प आवडत नाही. मग ते कुणीही असोत. आंध्रात जगनमोहन, ओडिशातील नवीन पटनायक असोत जिथे जिथे जनतेला अहंकार दिसतो, तिथे तिथे जनता धडा शिकवते. तसेच लोकसभा निवडणुकीत झाले आहे.

“४०० पारच्या नाऱ्याने भाजपाचं प्रचंड नुकसान, ज्या कुणी…”, निवडणूक निकालांनंतर प्रशांत किशोर यांचं भाष्य

पहिले कारण

“तसेच लोकसभा निवडणुकीत तीन कारणांमुळे भाजपाला अपयश मिळाले, असे मला वाटते. एक म्हणजे ज्याने कुणी ४०० पारची घोषणा दिली, त्यामुळे नुकसान झाले. या नाऱ्यात चुकीचे काही नव्हते. पण हा नारा अर्धवट होता. ४०० पार जायचे आहे, पण कशासाठी? यावर शंका उपस्थित करायला त्यांनी जागा ठेवली. जसे २०१४ मध्ये आम्ही नारा दिला की, ‘बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार’ या घोषणेतून आम्ही उद्देश स्पष्ट केला होता. पण ४०० पार कशासाठी? हे भाजपाकडून सांगण्यात आले नाही. त्यामुळे भाजपाच्या काही वाचाळ नेत्यांनी आपल्या पद्धतीने त्यावर भाष्य केले. विरोधकांनी त्यांचा अर्थ काढला आणि पुढे जे व्हायचे ते झाले”, असे प्रशांत किशोर म्हणाले.

दुसरे कारण

दुसरे कारण म्हणजे भाजपाचे मोदींवर असलेले पराकोटीचे अवलंबित्व. अनेक ठिकाणी मोदींवर अवलंबून राहिल्यामुळे भाजपाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. कार्यकर्ते, नेते मोदींमुळे शिथिल झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्याकडे उद्देश नव्हता. पण विरोधकांनी मात्र आक्रमकरित्या त्यांचा अजेंडा राबविला आणि ते त्यात यशस्वी झाले. मोदींच्या नावावर आपल्याला मते मिळूनच जातील, या अतित्मविश्वासात राहिल्यामुळेबी भाजपाचे नुकसान झाले, असेही प्रशांत किशोर म्हणाले.

भाजपा पिछाडीवर पडली, म्हणजे काँग्रेस जिंकली असे नाही

भाजपाला ६३ जागा गमवाव्या लागल्या आणि त्याचबाजूला काँग्रेसला मात्र अपक्षांचा पाठिंबा पकडून जवळपास ५० जागांचा यावेळी फायदा झाला आहे. तरीही हा काँग्रेसचा म्हणावा तसा विजय नाही, असेही प्रशांत किशोर यांनी सांगितले. यासाठी त्यांनी तीन राज्यांचे उदाहरण दिले. ते म्हणाले, “कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. कर्नाटक आणि तेलंगणात त्यांना म्हणाव्या तितक्या जागा मिळालेल्या नाहीत. तिथे ते अर्ध्यावर आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये तर त्यांना भोपळाही फोडता आलेला नाही. जर संपूर्ण देशभरात काँग्रेसला एकमुखी पाठिंबा आहे, असे जरी आपण मानले तर मग त्यांना त्यांच्याच राज्यात कमी जागा मिळाल्या नसत्या.”