गेल्या महिन्याभरापासून देशभरात लोकसभा निवडणुकांचा प्रचार आणि मतदान होत आहे. पहिल्या चार टप्प्यांसाठी मतदान पार पडलं असून येत्या १ जूनपर्यंत उरलेल्या तीन टप्प्यांसाठी मतदान होईल. महाराष्ट्रातही पहिल्या चार टप्प्यांमध्ये मतदान झालं असून येत्या २० मे रोजी राज्यात शेवटच्या टप्प्याचं मतदान होणार आहे. यंदा राज्यातील राजकीय स्थिती कमालीची गुंतागुंतीची झाल्यामुळे महाराष्ट्रात नेमकं निकालाचं काय चित्र असेल? याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. राजकीय पक्षही वेगवेगळे दावे करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नेमकं लोकसभा निवडणुकांचं काय चित्र असेल? याविषयी राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी मोठं भाकित केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

योगेंद्र यादव यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये देशात भाजपा व एनडीएची यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पीछेहाट होईल, असं ते म्हणाले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला तब्बल ३०३ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे पूर्ण बहुमत भारतीय जनता पक्षाच्या पाठिशी होतं. एनडीएकडे एकूण ३५३ जागा होत्या. यंदा भाजपानं ४०० पारचा नारा दिला आहे. एकीकडे पक्षाकडून या जागा मिळण्याचा विश्वास व्यक्त केला जात असताना दुसरीकडे योगेंद्र यादव यांनी मात्र एनडीएला तब्बल ९० ते १०० जागांचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली आहे.

योगेंद्र यादव यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार…

भाजपाला जवळपास ७० जागांचा फटका यंदा बसू शकतो असा त्यांचा अंदाज आहे. त्यामुळे भाजपाच्या जागा या लोकसभा निवडणुकीत ३०३ वरून २३३ वर येण्याची शक्यता असल्याचं ते सांगतात. दुसरीकडे भाजपाच्या एनडीएतील मित्रपक्षांनाही ३५ जागा मिळतील. त्यामुळे एनडीएचा या निवडणुकीतला आकडा २६८ च्या आसपासच पोहोचू शकतो असं योगेंद्र यादव म्हणतात. त्यामुळे संपूर्ण एनडीए मिळूनही भाजपाला बहुमत मिळवता येणार नाही, असं ते सांगतात.

महाराष्ट्रात काय आहे राजकीय स्थिती?

महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचं दिसून आलं. शिवाय या दोन्ही पक्षांमधून फुटलेले जवळपास प्रत्येकी ४० आमदारांचे गट थेट सत्ताधारी भाजपासोबत गेले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांचं अस्तित्व सत्ताधारी गट आणि विरोधी गट अशा दोन्ही बाजूला दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मतांचं विभाजन आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर करण्यात आलेली टीका-टिप्पणी यामुळे लोकसभा निवडणुकांचं गणित काय असेल? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

“भाजपाला २३३ तर एनडीएला…”, लोकसभा निवडणूक निकालांबाबत योगेंद्र यादव यांचं मोठं भाकित; Video मध्ये मांडलं जागांचं गणित!

लोकसभा निवडणुकांच्या निकालांवर आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच पक्षांचं जागावाटप आणि आघाडी वा युतीमधील ताकद अवलंबून असेल. त्यानुसारच या पक्षांचा सत्तेतील वाटाही ठरेल. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या ४८ जागांचा निकाल नेमका काय लागतो? हे या पक्षांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.

एनडीएला २० जागांचा फटका?

दरम्यान, राज्यातल्या सध्याच्या राजकीय स्थितीत भाजपाप्रणीत एनडीएला तब्बल २० जागांचा फटका बसू शकतो, असा अंदाज योगेंद्र यादव यांनी वर्तवला आहे. सध्या राज्यातल्या ४८ जागांपैकी ४२ जागा एनडीएकडे असून त्यातल्या त्यांच्या २० जागा कमी होणार आहेत, असं योगेंद्र यादव म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogendra yadav on maharashtra loksabha election 2024 results loss for bjp pmw