India Lok Sabha Election 2024 Phase 4 Voting Updates, 13 May: राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी सध्याच्या लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण केलं आहे. या विश्लेषणामध्ये भारतीय जनता पक्ष व एनडीए अर्थात नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्सला गेल्या निवडणुकीत किती जागा मिळाल्या आणि या निवडणुकीत त्यांची कामगिरी कशी राहील? यासंदर्भात त्यांनी भाकित वर्तवलं आहे. त्या भारतीय जनता पक्षाला किंवा एनडीएलाही बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. काय आहे पोस्टमध्ये? योगेंद्र यादव यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये लोकसभा निवडणूक निकालांबाबत भाष्य केलं आहे. "या व्हिडीओच्या माध्यमातून मी आज तुम्हाला एक असं सत्य सांगणार आहे, जे जाणून-बुजून लपवलं जात आहे. सत्य हे आहे की या लोकसभा निवडणुकीनं रोख बदलला आहे. भारतीय जनता पक्षाला यंदा बहुमत मिळणार नाही", असं योगेंद्र यादव यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. एनडीएलाही बहुमत नाही? दरम्यान, भाजपाप्रमाणे संपूर्ण एनडीएही बहुमताच्या जादुई आकड्यापेक्षा कमी कामगिरी करू शकेल, असं योगेंद्र यादव यांचं मत आहे. "भाजपाला बहुमत मिळणार नाही. भाजपा २७२ च्या खूप खाली आहे. एनडीएही २७२ च्या जादुई आकड्यापेक्षा खाली जाण्याची शक्यता आहे", असं ते पोस्टसोबत शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सांगत आहेत. “महाराष्ट्रात भाजपाप्रणीत एनडीएच्या २० जागा कमी होणार”, योगेंद्र यादव यांनी वर्तवला अंदाज; म्हणाले, “४८ जागांपैकी…” २०१९ला भाजपाला ३०३ जागा मिळाल्या, एनडीएला ३५३ मिळाल्या. मात्र, यंदा या जागांमध्ये तब्बल ९० ते १०० जागांची घट होईल, असा अंदाज योगेंद्र यादव यांनी वर्तवला आहे. तसेच, भाजपा ४०० पार जागा मिळवेल, हा अपप्रचार असून मतदारांनी त्याला बळी पडू नये, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. काय आहे योगेंद्र यादव यांचं गणित? योगेंद्र यादव यांनी राज्यनिहाय भाजपा व एनडीएच्या जागांचं गणित आपल्या विश्लेषणात मांडलं आहे. कर्नाटकमध्ये २८ लोकसभा जागांपैकी २६ एनडीएकडे आहेत. पण तिथे त्यांना किमान १० जागांचं नुकसान होईल, असं त्यांचं मत आहे. राजस्थान आणि गुजरातमध्ये मिळून ५१ पैकी ५१ जागा एनडीएकडे आहेत. पण दोन्ही राज्यांमध्ये मिळून किमान १० जागांवर एनडीएचं नुकसान होईल, असं योगेंद्र यादव म्हणाले. महाराष्ट्रात किती जागा मिळणार? दरम्यान, महाराष्ट्रात आधी शिवसेना व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यामुळे राज्यातली राजकीय समीकरणं कमालीची गुंतागुंतीची झाली आहेत. या दोन्ही प्रमुख पक्षांचा मतदारवर्ग विभागला गेला आहे. त्यामुळे राज्यात नेमकं काय चित्र असेल? याविषयी अनेकांच्या मनात तर्क-वितर्क चालू आहेत. महाराष्ट्रातही एनडीएचं नुकसान होण्याचा अंदाज योगेंद्र यादव यांनी वर्तवला आहे. "महाराष्ट्रात ४८ पैकी ४२ जागा एनडीएकडे आहेत. पण तिथे किमान २० जागा एनडीए गमावेल", असं भाकित योगेंद्र यादव यांनी वर्तवलं आहे. "हरियाणा, पंजाब, चंदीगड, हिमाचल प्रदेश, दिल्ली या सगळ्या राज्यांत मिळून एनडीएचं किमान १० जागांचं नुकसान होईल, तर छत्तीसगड, छारखंड आणि मध्य प्रदेश मिळून १० जागांचं नुकसान होईल", असं गणित योगेंद्र यादव यांनी मांडलं आहे. "उत्तर प्रदेश, उत्तराखंड मिळून ६९ जागा एनडीएकडे आहेत. पण त्यात किमान १५ जागा एनडीए गमावेल. शिवाय, बिहारमध्ये ४० पैकी ३९ जागांवर एनडीए आहे. पण तिथेही एनडीएचं किमान १५ जागांचं नुकसान होईल. पूर्वेकडे पश्चिम बंगाल, पूर्ण नॉर्थ-इस्ट आणि इतर केंद्रशासित प्रदेश मिळून किमान १० जागांचं एनडीएचं नुकसान होईल", असा अंदाज योगेंद्र यादव यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून वर्तवला आहे. भाजपाचं एकूण ७५ जागांचं नुकसान! दरम्यान, या सर्व राज्यांमध्ये मिळून भारतीय जनता पक्षाला एकूण ७५ जागांचा फटका बसू शकतो, असं योगेंद्र यादव यांना वाटतंय. तर मित्रपक्षांसह एनडीएच्या तब्बल १०० जागा कमी होऊ शकतील, असं ते म्हणाले. अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; मुख्यमंत्रीपदाबाबत… चार राज्यांमध्ये भाजपाचा फायदा दरम्यान, तमिळनाडू, केरळ, तेलंगणा व आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला एकूण १५ जागांचा फायदा होईल. मात्र, इतर ठिकाणी होणाऱ्या नुकसानामुळे त्यांना बहुमताचा आकडा गाठता येणार नाही, अशी शक्यता योगेंद्र यादव यांनी व्यक्त केली आहे. "या सर्व आकडेमोडीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला ६५ जागांचं नुकसान तर मित्रपक्षांना १५ जागांचं नुकसान होईल. त्यामुळे आजच्या स्थितीनुसार भाजपाला २३३ जागा मिळतील. अर्थात, सध्या हातात असलेल्या ३०३ जागांमधल्या ७० जागांचं नुकसान. तर मित्रपक्षांना आजच्या हिशेबाने ३५ जागा मिळतील. त्यामुळे एनडीएला साधारण २६८ जागा मिळू शकतील. त्यामुळे संपूर्ण एनडीएला किमान आजच्या स्थितीत तरी बहुमत मिळणार नाही", असं ते म्हणाले. "देशात सगळे माध्यमं, व्यवस्था, निवडणूक तज्ज्ञ असे सगळे मिळून प्रचार करत आहेत की भाजपा जिंकली आहे. त्याचा परिणाम असा होतो की सामान्य माणूस म्हणतो मी तर कदाचित एनडीएला मत देणार नाही, पण येणार तर मोदीच. ही खोटी धारणा मोडून पडायला हवी. लोकांपर्यंत सत्य पोहोचायला हवं", असंही योगेंद्र यादव यांनी व्हिडीओमध्ये नमूद केलं आहे.