वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार झिशान सिद्दिकी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे. तसेच अजित पवार गटाने त्यांना वांद्रे पूर्वमधून विधानसभेची उमेदवारीदेखील जाहीर केली आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, उमेदवारी मिळाल्यानंतर झिशान सिद्दिकी यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
नेमकं काय म्हणाले झिशान सिद्दिकी?
“माझे वडील बाबा सिद्दिकी यांनी नेहमीच समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांसाठी काम केलं. त्यांच्यासाठी लढले. कठोर परिश्रम आणि चिकाटीने काम करण्यावर त्यांचा विश्वास होता. या निवडणुकीत मला जिंकताना बघणं हे त्यांचे स्वप्न होतं. आता त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. वांद्रे पूर्वेतील जनतेची सेवा करणे हे माझे कर्तव्य आहे”, अशी प्रतिक्रिया झिशान सिद्दिकी यांनी दिली.
“निवडणूक लढवण्याची संधी दिल्याबद्दल मी अजित पवारांचा ऋणी”
“आज मी औपचारिकपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( अजित पवार गट) प्रवेश केला आहे. या कठीण काळात माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराचे आभार मानतो. अजित पवार यांनी मला दिलेल्या पाठिंब्याबद्दल तसेच निवडणूक लढवण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे”, असेही ते म्हणाले.
“वडिलांचे कार्य पुढे नेण्याचा माझा प्रयत्न”
“या संधीचं सोनं करण्याचा तसेच जनादेश मिळवण्याचा माझा प्रयत्न आहे. माझ्या वडिलांनी वांद्रे पूर्वतील लोकांच्या सेवेसाठी त्यांचे जीवन समर्पित केलं. त्यांचं कार्य पुढे नेण्यासाठी माझा प्रयत्न असेन”, असेही त्यांनी सांगितलं.
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेची पकड
वांद्रे पूर्व हा मतदारसंघ उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. २००९ साली झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघावर सुरुवातीपासून शिवसेनेची पकड होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेला हा मतदारसंघ २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या हातून निसटला आणि काँग्रेसच्या ताब्यात गेला. शिवसेनेचे प्रकाश उर्फ बाळा सावंत यांची या मतदारसंघावर पकड होती. ते वांद्रे पूर्वेकडील एका वॉर्डमधून १९९७ ते २००९ पर्यंत नगरसेवक होते. २००९ मध्ये त्यांना शिवसेनेने येथून विधानसभेचं तिकीट दिलं आणि सावंतांनी ही निवडणूक जिंकली.
२०१४ साली पुन्हा एकदा शिवसेनेच्या तिकीटावर ते येथून आमदार म्हणून विधानसभेवर गेले. मात्र त्यानंतर काही महिन्यांनी त्यांचं निधन झालं. बाळा सावंतांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. शिवसेनेने बाळा सावंतांची पत्नी तृप्ती सावंत यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली. तर, काँग्रेसने नारायण राणे यांना या मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरवलं होतं. मात्र सावंत यांनी नारायण राणेंचा तब्बल १९ हजार मतांनी पराभव केला.