ZP Election Results : महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, लातूर, सिंधुदुर्ग, परभणी, रायगड येथील जिल्हा परिषदांचे निकाल जाहीर झाले. राज्यातल्या या निवडणुकांमध्येही सर्वाधिक जिल्हा परिषदांमध्ये भाजपाने सत्ता मिळवली आहे. महाविकास आघाडीला या निवडणुकांमध्येही समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली त्यावेळी त्यांनी अजित पवारांची आठवणही काढली.

अजित दादांबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“या निवडणुकांच्या दरम्यान आमचे महायुतीतील वरिष्ठ नेते अजित पवार यांचा मृत्यू झाला. आम्हाला त्याचं दुःख आहे. मी या निवडणुकांचा प्रचार करणार नाही असा निर्णय घेतला होता. एका आवाहनाचा व्हिडीओ सगळ्या जिल्हा परिषदामध्ये प्रसारित केला होता. या निकालांमधून महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेला काय वाटतं ते समोर आलं आहे.” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच विरोधकांनाही त्यांनी टोला लगावला आहे.

भाजपा क्रमांक १ चा पक्ष- फडणवीस

मुख्यमंत्री म्हणाले जवळपास ६० ठिकाणी भाजपा एक नंबरवर आहे. छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, सांगली, धाराशिव, परभणी आणि सातारा. शिवसेना दोन ठिकाणी नंबर एकवर आहे, रत्नागिरी आणि रायगड. राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यामध्ये नंबर एकवर आहे. आणि जेथे तीनही पक्ष एकत्र लढलो अशा कोल्हापूर आणि लातूर येथे महायुतीत नंबर एकवर आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. भारतीय जनता पक्षानेदेखील आपला २०१७ चा रेकॉर्ड देखील भाजपाने मोडला आहे, २०१७ मध्ये या जिल्हा परिषदांमध्ये भाजपाला १४१ जागा होत्या, पण आत्तपर्यंत घोषित झालेल्या निकालांमध्येच २३६ जागा भाजपाला मिळाल्या आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

विरोधकांबाबत काय म्हणाले फडणवीस?

“मला असं वाटतं की विरोधी पक्षांनी जनतेची नाडी ओळखणं सोडून दिलं आहे. जनतेला काय हवं आहे हे त्यांना कळणं बंद झालंय. संपूर्ण विरोधी पक्ष पुढे आहे फक्त माध्यमांमध्ये दिसतं. जमिनीवर लोकांनी त्यांना नाकारलं आहे. लोकांच्या अपेक्षा काय आहेत? हे ओळखणं विरोधकांनी सोडून दिलंय. आपल्या अपेक्षा म्हणजेच लोकांच्या अपेक्षा हे समजण्याची चूक विरोधक करत आहेत. यापेक्षा मोठी चूक कुठलीही नाही. ज्या विषयांवर विषय मानून कायमच विरोधक टीका करत असतात त्याच्याशी जनतेला घेणंदेणं नाही. राजकाराणाचं ओंगळवाणं स्वरुप विरोधक दाखवून देत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही उगाच टीका करत आहेत. जनतेला हे मुळीच आवडलेलं नाही. जोपर्यंत जनभावना काय आहे, जनतेची नाडी काय? त्यांच्या अपेक्षा काय हे विरोधकांना कळत नाही तोपर्यंत ते हरत राहतील.” असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.