13 August 2020

News Flash

समजून घ्या सहजपणे : करोना संसर्गावर ‘हे’ आहेत उपचार

रूग्णालयात दाखल केल्यानंतर काय केलं जातं?

संग्रहित छायाचित्र

राजेंद्र येवलेकर-

करोनाचा नवीन विषाणू हा सार्स म्हणजे सिव्हीयर अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम- सीओव्ही १ विषाणूचा दुसरं रुप आहे. त्यामुळे त्याला सीओव्हीआयडी १९ बरोबरच सार्स सीओव्ही २ असंही नाव देण्यात आले आहे. आता करोनाचा हा विषाणू १३० हून अधिक देशात पसरलेला आहे. या विषाणूच्या संसर्गावर उपचारच नाहीत असे सांगितले जात असले, तरी त्यात पूर्ण तथ्य नाही. कारण जगात इतर अनेक विषाणूजन्य रोग आहेत. त्यावर मात करण्यात पूर्वीच यश आले आहे. साधारणपणे सर्वच विषाणूंच्या मानवी शरीरावर हल्ला करण्याच्या कार्यपद्धतीत काही साम्यस्थळे असतात. शिवाय विषाणू शरीरातील पेशीत गेल्यानंतर जी क्रिया घडते ती पूर्णपणे वेगळी नसते. त्यामुळे इतर विषाणूजन्य आजारांवरील औषधे यातील लक्षणं कमी करण्यासाठी उपयोगाची आहेत.

चीनमध्ये जे उपचार करण्यात आले त्यात एड्सवरील आपण अँटीव्हायरल विषाणूरोधक औषधांचा वापर करण्यात आला हे आता उघड गुपित आहे. करोनावर लस उपलब्ध नाही हे मात्र निर्विवाद सत्य आहे. जगभरातील संशोधक व औषध कंपन्या आता लस तयार करण्यासाठी अहोरात्र काम करीत आहेत. त्याचबरोबर प्रभावी औषधांचा शोध घेतला जात आहे. आज आपण करोनावर कुठली औषधे चालू शकतात हे समजून घेणार आहोत.

करोना संसर्ग झाल्यानंतरची लक्षणे-

करोना विषाणू शरीरात गेल्यानंतर ताप, कफ, श्वाास अडखळणे, थकवा, ही लक्षणे दिसतात. करोना विषाणूवर कुठली लस उपलब्ध आहे का? तर करोना संसर्गावर सध्यातरी लस उपलब्ध नाही. पण ती उपलब्ध होण्यास आता अजून सहा ते आठ महिने तरी लागतील. भारतात अशी लस बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेनं हा विषाणू वेगळा करून त्याच्या रचनेचा रहस्यभेद केला आहे. आता त्या माहितीचा उपयोग करून लस तयार करणे शक्य आहे. यात ऑस्ट्रेलियातही करोनाचा कृत्रिम विषाणू तयार करून लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारण त्यात लस तयार करण्यास कमी वेळ लागतो. ब्रिटनमध्ये लस जवळपास तयार असल्याचा दावा करण्यात आला आहे व जे रुग्ण वैद्यकीय चाचण्यात ती टोचून घेतील, त्यांना २ ते ३ लाख रूपये दिले जाणार आहे.

सध्या करोनावर कुठली औषधे उपलब्ध आहेत ?

करोनाची बाधा झाली म्हणजे आता सगळे संपले असं नाही. करोना हा विषाणू आहे. त्यावर इतर विषाणूंवरची काही औषधे चीनमध्ये प्रभावी ठरली आहेत. त्यांना मान्यताही देण्यात आली. एचआयव्ही या एड्सच्या विषाणूवर उपचारासाठी जी औषधे वापरली जातात. त्यांचा वापर यात प्रभावी ठरला आहे. त्यामुळे जर अगदी गंभीर लक्षणे दिसली तर या औषधांचा उपयोग केला जातो.

रूग्णालयात दाखल केल्यानंतर काय केलं जातं?

चीनमधील जी माहिती हाती आली आहे, त्यानुसार निर्जलीकरण टाळण्यासाठी द्रव पदार्थ दिले जातात. ताप उतरवण्यासाठी पॅरासिमटेमॉलपासून इतर औषधे दिली जातात. ऑक्सिजनचा पूरक आधार दिला जातो. ज्यांना श्वास घ्यायला कठीण जाते त्यांना कृत्रिम श्वासावर ठेवले जाते.

कुठली औषधे यात प्रभावी दिसून आली आहेत ?

विषाणूजन्य रोगांवरील औषधी यात प्रभावी ठरली आहेत. करोनाची साथ भरात असताना चीनमध्ये अशा औषधांच्या वैदयकीय चाचण्या करून त्यातील काहींना मान्यता देण्यात आली होती. पण हे सगळे उपचार लसीप्रमाणे प्रतिबंध करून प्रतिकारशक्ती वाढवणारे नाहीत. तर संसर्ग झाल्यानंतर विषाणू ज्या पद्धतीने काम करतो ते पाहून त्याला नंतरच्या पातळीवर रोखणाऱ्या आहेत.

करोनावर प्रभावी ठरलेल्या औषधे पुढीलप्रमाणे

रेमडेसीवीर- हे औषध अनेक विषाणूंना मारते त्यात इबोलाचा समावेश आहे. करोनावर ते प्रभावी ठरले आहे. त्याच्या चीनमध्ये दोन चाचण्या झाल्या. अमेरिकेनेही त्यावर चाचण्या करून मान्यता दिली आहे.
क्लोरोक्वीन- हे मलेरिया म्हणजे हिवतापावरचे औषध आहे. गेली सत्तर वर्षे त्याचा वापर हिवतापावर केला जातो त्याचा परिणाम करोनामुळे येणाऱ्या तापातही चांगला दिसून आला.

लोपिनवीर व रिटोनाविर- ही दोन्ही औषधे यात चांगला परिणाम दाखवतात. एचआयव्ही या एड्सच्या विषाणूवरील ही औषधे आहेत. दक्षिण कोरियातील एका ५४ वर्षांच्या २४ तास ही औषधे करोनावर देण्यात आली होती. हीच औषधे कालेट्रा या नावानेही विकली जातात. इतर औषधांच्या समवेत ती प्रभावी ठरतात.

एपीएन ०१- हे चीननं शोधून काढलेल्या औषधाचे सांकेतिक नाव आहे. त्याच्या चाचण्या सुरू आहेत. एसीई २ या सार्समधील प्रथिनांवर ते इ.स. २००० मध्ये शोधण्यात आले होतं. त्यामुळे फुफ्फुसांचं रक्षण होते. सीओव्हीआयडी १९ हा नवीन विषाणूही एसीइ-२ प्रथिनाच्या मदतीनेच पेशींवर हल्ला करतो असे दिसून आले आहे.

फॅविलाविर – चीनने फॅविलावीर औषधाला करोनावर उपचारासाठी मान्यता दिली आहे. सुरूवातीला ते नाक व घशातील संसर्गावर वापरले जात होते. आता ७० लोकांवर त्याच्या चाचण्या झाल्या असून ते प्रभावी ठरले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2020 1:51 pm

Web Title: coronavirus treatment possible on coronavirus bmh 90
Next Stories
1 समजून घ्या सहजपणे : मुंबईत जमावबंदी लागू झाली म्हणजे नेमकं काय?
2 समजून घ्या सहजपणे: स्पॅनिश फ्लूशी करोनाची तुलना का केली जाते आहे?
3 समजून घ्या सहज सोपे: जवळचा मित्र इराण भारतावर का उलटला ?
Just Now!
X