दोन देशातील सैन्य आमने-सामने आल्यानंतर रक्तरंजित संघर्ष झाल्याचं अनेकदा ऐकलं असेल, बघितलं असेल. पण, एकाच देशातील दोन राज्यामध्ये सीमावादावरून रक्त सांडलं गेल्याचं कधी ऐकलं का? भारतातीलच दोन राज्यांमधील सीमांचा वाद गोळीबारापर्यंत कसा जाऊ शकतो? हे आणि असेच काही प्रश्न आसाम-मिझोरामधील सीमा संघर्षाने उपस्थित केले आहेत. २६ जुलै रोजी आसाममधील कछर जिल्ह्याला लागून असलेल्या मिझोरामच्या सीमेवर संघर्ष झाला आणि पोलिसांचं रक्त सांडलं गेलं. या ताज्या संघर्षाची कारणं मात्र, फार जुनी आहेत. ब्रिटिश काळातील… इंग्रजांनी केलेल्या दोन नियमांमध्ये या संघर्षांचं मूळ दडलं आहे.

आसाम आणि मिझोराममध्ये सीमेवादावरून संघर्ष उफाळून आला. आसामचा सीमावाद केवळ मिझोरामसोबतच नाही, तर त्याला लागून असलेल्या सहा राज्यांसोबतही सुरू आहे. आता झालेल्या संघर्षांमागे अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप दोन्ही राज्यांनी केला आहे. पण, या वादाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. १०० वर्षांपासून हा वाद सुरू आहे. ज्यावेळी भारतात ब्रिटिशांचं राज्य होतं, त्याच काळात या सीमासंघर्षांची बीजं रोवली गेली.

आसाम-मिझोराम संघर्ष कधी सुरू झाला?

पूर्वेकडील सीमासंघर्ष सुरू झाला तो ब्रिटिशांच्या काळात. १८३० पर्यंत कछर (आता आसाममधील जिल्हा) त्यावेळी स्वतंत्र राज्य होतं. १८३२ मध्ये येथील राजाचा मृत्यू झाला. राजाचा कुणीही उत्तराधिकारी नसल्यानं डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स (भारतातील संस्थानं ताब्यात घेण्यासंदर्भात ब्रिटिशांनी बनवलेलं धोरण) धोरणानुसार हे राज्यावर ब्रिटिशांनी स्वतःच्या ताब्यात घेतलं आणि कछर राज्य ब्रिटिश वसाहतीचाच भाग बनले.

जर एखाद्या संस्थानाच्या राजाचा मृत्यू झाला आणि त्याला उत्तराधिकारी नसेल, तर ब्रिटिश या नियमानुसार ते संस्थान आपल्या ताब्यात घेत असे. त्यावेळी लुशाई हिल्स वर चहाच्या बागा लावण्याची ब्रिटिशांची योजना होती. मात्र, स्थानिक आदिवासी म्हणजे मिझो समुदाय यामुळे नाराज होता. त्यामुळे ते ब्रिटिशांच्या ताब्यातील भागामध्ये लुटालूट करू लागले.

या घटना वाढल्यामुळे ब्रिटिशांनी आसाममधील डोंगराळ व आदिवासी प्रदेशांना वेगळं करण्यासाठी १८७५ मध्ये इनर लाईन रेग्युलेशन (ILR) लागू केला. या नव्या नियमामुळे आपल्या जमीनवर कुणीही अतिक्रमण करु शकणार नाही, असं समजून मिझो आदिवासी खुश झाले. पुढे १९३३ मध्ये ब्रिटिशांनी कछार राज्य आणि मिझो हिल्स यांच्यामध्ये औपचारिकता म्हणून सीमारेषा ठरवली. पण, ही रेषा ठरवताना मिझो आदिवासींना सहभागी करून घेण्यात आलं नाही आणि मिझो आदिवासी समुदायाने याला विरोध दर्शवला. इतकंच नाही, तर १८७५ मध्ये जो इनर लाईन रेग्युलेशन नियम लागू करण्यात आला होता. तो पुन्हा लागू करण्याची मागणी होती.

मिझोराम-आसाम सीमा आता वादाचा मुद्दा काय?

मिझोराममधील तीन जिल्हे आयजोल, कोलासिब आणि ममित हे आसाममधील कछर, करीमगंज आणि हैलाकांडी या जिल्ह्यांना लागून आहेत. तिन्ही जिल्ह्यांमधून आसाम-मिझोरामची १६४.६ किमीची लांब सीमा आहे. १९५० मध्ये आसाम भारतातील एक राज्य म्हणून अस्तित्वात आले. त्यावेळी आसाममध्ये नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि मिझोराम या प्रदेशांचाही समावेश होता. नंतर हे राज्य अस्तित्वात आले आणि पूर्वीच्या सीमावादाने डोकं वर काढलं. नॉर्थ इस्टर्न एरिया कायदा- १९७१ प्रमाणे आसामाची विभागणी करून मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा ही राज्य तयार करण्यात आली.

त्यानंतर १९८७ च्या मिझो शांतता करारनुसार मिझोराम वेगळं राज्य तयार करण्यात आलं. केंद्र सरकार आणि मिझो आदिवासी समुदाय यांच्यात झालेल्या करारानुसार ही विभागणी करण्यात आली होती. त्याला आधार होता १९३३ चा करार. असं असलं तरी १८७५ IRL चा स्वीकार केलेला असल्याची भूमिका मिझो आदिवासी समुदायाकडून घेतली जाते. त्यामुळे हा वाद अजूनही सुटलेला नाही.