भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न क्रिकेट मैदानावर बॉक्सिंग डे कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेचे सर्वजण कौतुक करत आहेत. फक्त भारतीय माजी खेळाडू नव्हे तर ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू देखील त्याचे कौतुक करत आहेत. नियमित कर्णधार विराट कोहलीच्या गैरहजेरीत अजिंक्य भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. ज्या पद्धतीने फिल्डिंग प्लेसमेंट केली आणि गोलंदाजांचा वापर केला यावरुन विराट कोहलीपेक्षा अजिंक्यची नेतृत्व शैली वेगळी असल्याचं दिसत आहे.

अश्विनला लवकर संधी –

अजिंक्य रहाणेनं आपल्या गोलंदाजाचा आक्रमक वापर केला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या डावात फक्त १९५ धावांपर्यंत मजल मारु शकला. गोलंदाजीसाठी आर अश्विनला लवकर घेऊन येण्याचा रहाणेच्या निर्णयाचा फायदा झाला. रहाणेनं अश्निवला ११ व्या षटकांत गोलंदाजी करण्यासाठी पाचारण केलं होतं. अश्विनला नवीन चेंडूवर गोलंदाजी करायला आवडते. त्यानं ते पुन्हा एकदा सिद्ध केलं. अश्विननं धोकादायक स्मिथचा अडथळा दूर केला. अॅडलेड कसोटी सामन्याप्रमाणेच मेलबर्न कसोटी सामन्यातही अश्विननं कांगारुंना धक्के दिले. अश्विनला लवकर संधी देण्याचा रहाणेचा निर्णय मास्टरस्ट्रोक ठरला. अश्विननं मॅथू वेड आणि स्मित यांना पहिल्याच स्पेलमध्ये बाद केलं.

कोहलीनं पहिल्या कसोटी सामन्यात अश्विनचा वापर चौथा गोलंदाज म्हणून केला होता. बुमराह, शमी आणि उमेश यादव यांच्यानंतर कोहलीनं अश्विनला गोलंदाजी दिली होती.

म्हणून अजिंक्य ठरतो वेगळा –
शनिवारी, क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानावर उतण्यापूर्वी भारतीय संघ एकत्र आला होता. त्यावेळी अजिंक्य राहणेनं संघाला संबोधित केलं. तसेच रहाणेन आपली क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीबद्दलची रणनिती संघाला सांगितली. त्यानंतर संघातील इतर खेळाडूंची मतेही जाणून घेतली. यामध्ये अश्विन आपलं मत मांडल्याचं दिसून आलं. याउलट विराट कोहली कर्णधार असताना फक्त तो एकटाच संबोधित करत असतो.

गोलंदाजाचे मोठे स्पेल –
अंजिक्य रहाणे गोलंदाजाला जास्त संधी देत आहेत. तो प्रत्येक गोलंदाजाला मोठे स्पेल देत आहे. रहाणेनं सुरुवातीला बुमराहाला पाच षटकं दिली. दुसरा गोलंदाज असणाऱ्या उमेश यादवला लागोपाठ सहा षटकं दिली. त्यानंतर अश्विनला पाचारण केलं. अश्विननं लागोपाठ १२ षटकं टाकली. त्याचवेळी दुसऱ्या बाजूनं बुमराहाचा तीन षटकाचा आणखी एक स्पेल केला. बुमराहनं रहाणेनं सिरजाला पाचारण केलं. सिरजाचा पहिला स्पेल सहा षटकांचा होता. विराट कोहली नेतृत्व करत असताना छोटे छोटे स्पेल करत असतो. विकेट पडत नसताना फक्त एक षटक टाकल्यानंतरही विराट कोहलीनं गोलंदाजीत बदल केलेला आहे. त्यामुळे दोघांच्या नेतृत्वात हा मोठा फरक दिसतोय.

शांत राहणे –
रहाणेचा स्वभाव शांत आणि संयमी आहे. इतर खेळाडूंच्या तुलनेत रहाणे खूपच शांतपणे परिस्थिती हातळत असल्याचं दिसत आहे. याउलट विराट कोहली नेतृत्व करत असताना आक्रमक होतो. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात पहिल्या डावांदरम्यान तिसरे पंच पॉल विल्सन यांनी टीम पेन धावबाद असल्याचं अपील फेटाळून लावत ऑस्ट्रेलियाच्या बाजूने निर्णय दिला. ५५ व्या षटकादरम्यान कर्णधार पेन आणि ग्रीन यांच्यात एक धाव काढताना संभ्रम निर्माण झाला. यावेळी उमेश यादवने पेनच्या दिशेने थ्रो केला आणि यष्टीरक्षक पंतने धावबाद करण्यासाठी स्टम्प उडवले. तिसऱ्या पंचांच्या पाहणीमध्ये पेनची बॅट ही क्रिजच्या पुढे गेल्याचं कोणत्याही कॅमेरा अँगलमधून दिसत नव्हतं. तरीही पंच पॉल विल्सन यांनी पेन नाबाद असल्याचा निर्णय दिला. पहिल्या कसोटी सामन्यात ७३ धावांची महत्वाची खेळी करणाऱ्या टीम पेनला धावबाद असताना बाद न दिल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉर्न यानेही तिसऱ्या पंचाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

पेनचा निर्णय भारतीय संघाच्या विरोधात असतानाही राहणेनं शांतपणे प्रकरण हाताळलं. पंचाचाशी कोणताही वाद घातला नाही किंवा चर्चाही केली नाही. तसेच या निर्णयामुळे संघाचं मनोबलही खचून दिलं नाही. पण याच जागी विराट कोहली असता तर वेगळ्या पद्धतीनं वागला असता.