२ ऑक्टोबर २०१८ रोजी म्हणजेच जवळपास तीन वर्षांपूर्वी इस्तंबुलमधील सौदी अरेबियाच्या दूतावासात एक घटना घडली. एका प्रसिद्ध पत्रकाराची हत्या करण्यात आली. मात्र, फक्त हत्या करण्यात आली, इतक्यावर ही घटना मर्यादित नव्हती. तर त्या पत्रकाराच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. ते तुकडे बॅगमध्ये भरून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. हे पत्रकार म्हणजे ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे स्तंभलेखक आणि अमेरिकेचे नागरिक जमाल खाशोगी. खाशोगी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आणि अमेरिका संतापण्या मागचं कारणंही असंच काहीसं आहे.

जमाल खाशोगी यांची हत्या झाली, तो अत्यंत नियोजनपूर्वक कट होता हे नंतर समोर आलं. या हत्येसाठी सौदी अरेबियातून जवळपास डझनभर मंडळी त्या देशाच्या सरकारी विमानाने इस्तंबूलला गेली. काही कागदपत्रे मिळवण्यासाठी खाशोगी त्या वेळी कार्यालयात गेलेले होते. कार्यालयात गेलेले खाशोगी तिथून जिवंत परत आलेच नाहीत. खाशोगी यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यास सुरूवात झाल्यानंतर सुरुवातीला खाशोगी दूतावासातून कुठे गेले ते ठाऊक नाही, असा पवित्रा सौदी अरेबियाने घेतला होता. पण प्रथम तुर्कस्तान आणि नंतर संयुक्त राष्ट्रांच्या तपास अधिकाऱ्यांनी अधिक चौकशी केल्यानंतर खाशोगी यांची हत्या झाल्याची आणि त्यांच्या शरीराचे दूतावासातच तुकडे करून विल्हेवाट लावण्यात आल्याची कबुली सौदी अरेबियाला द्यावी लागली होती.

खाशोगी यांना संपवण्यामागे सौदी अरेबियाचे राजपुत्र आणि त्या देशाचे वास्तवातील राज्यकर्ते मोहम्मद बिन सलमान यांचा हात होता की नाही, याविषयी तर्कवितर्क लढविले गेले. मात्र त्याबद्दल ठोस पुरावा मिळालेला नाही. या घटनेविषयीचा संशय राजपुत्र सलमान यांच्याकडे वळल्यानंतर ते काही महिने अज्ञातवासातही गेले होते. ट्रम्प सत्तेत असताना झालेल्या या हत्याकांडाविषयी अमेरिकेतील परराष्ट्र खाते आणि गुप्तहेर संस्था (सीआयए) यांची खाशोगी हत्येतील सलमान यांच्या सहभागाविषयी भिन्न मते होती.

मात्र, आता अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी खाशोगी यांच्या हत्याकांडात सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांचा सहभाग होता, असं म्हटलं आहे. गुप्तचर यंत्रणांच्या अहवालात याविषयी भाष्य करण्यात आलेलं आहे. खाशोगी यांना संपवण्याच्या कटाला सौदीचे राजपुत्र सलमान यांनीच मंजुरी दिली होती, असं या अहवालात म्हटलेलं आहे. सलमान यांनी पत्रकार जमाल खाशोगी यांना पकडण्यासाठी वा ठार मारण्यासाठी इस्तंबुल, टर्कीमध्ये ऑपरेशन राबवण्यास मंजूरी दिली होती, असा दावा यात करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणाचा हा दावा सौदीनं फेटाळून लावला असला, तरी अमेरिकनं मात्र, संताप व्यक्त केला आहे.

खाशोगी यांच्या हत्याकांडावरून अमेरिकेने थेट सौदी अरेबियावर काही निर्बंध लादण्याचा निर्णय घेतल आहे. तसेच सौदीतील नागरिकांच्या व्हिसावर बंदी घातली आहे. पत्रकार वा सामाजिक कार्यकर्त्याच्या हत्येत सहभागी असलेल्यांच्या व्हिसावर बंधने आणण्याचं धोरण अमेरिकनं जाहीर केलं असून, खाशोगी हत्याकांडात गुप्तचर यंत्रणांनी केलेला दावा आणि अमेरिकेनं लगेच दिलेला झटका, यामुळे दोन्ही देशातील संबंध बिघडण्याचा शक्यता व्यक्त केली जात आहे.