गुजरातमधील जुनागढ, उपलेटा आणि सौराष्ट्रमधील काही भागांमध्ये सोमवारी रात्री आकाशात दिसलेल्या रहस्यमय प्रकाशाचं गूढ वाढलं आहे. एकीकडे काही स्थानिक कुतुहूल व्यक्त करत असताना काही जण मात्र गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. या घटनेचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून याबद्दल जरा सविस्तर जाणून घेऊयात.

गुजरातमध्ये आकाशात नेमकं काय दिसलं?

राजकोट जिल्ह्यातील उपलेटामध्ये लोकांना एक मोठा आवाज ऐकू आला यानंतर आकाशात जळत असल्यासारखी एक वस्तू दिसली. आकाशातून पडणारी ही वस्तू जमिनीवर कोसळत असताना मोठा प्रकाशही दिसला.

“मी कुतुबखाना येथील आपलं दुकान बंद करुन जात असताना मोठा आवाज ऐकू आला. स्फोट झाल्यासारखा हा आवाज होता. मी आजूबाजूला पाहिले तेव्हा जळणारी वस्तू खाली पडत असताना दिसलं. पण ती वस्तू हवेतच जळत होती,”असं ४८ वर्षीय लक्ष्मण यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं आहे. घटनास्थळी मोबाइलवर व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्यांमध्ये लक्ष्मणदेखील होते.

उलपेटा येथील सरकारी अधिकारी जी एम महावदिया यांनीदेखील आपण विमान उडत असल्यासारखा आणि नंतर मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज ऐकल्याची माहिती दिली आहे. दरम्यान त्यांनी आकाशात कोणतीही जळणारी वस्तू पाहिली नव्हती, पण इतरांकडून ऐकलं आहे. “आकाशातून कोणतीही संशयास्पद वस्तू जमिनीवर पडल्याची माहिती आम्हाला मिळालेली नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हे नेमकं कुठे पाहण्यात आलं ?

जुनागढ जिल्ह्यातील मनवदर आणि केशोद येथेही लोकांनी आवाज ऐकला असल्याचं महावदिया यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी हे भारतीय हवाई दलाचं लढाऊ विमान असावं अशी शक्यता व्यक्त केली आहे. पण यासंबंधी हवाई दलाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. जामनगर एअरबेसमधून उड्डाण केल्यानंतर अनेकदा विमानंच उलपेटामधील आकाशात दिसतात असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान धोराजीचे उपविभागीय दंडाधिकारी जी व्ही मियानी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली आहे. उलपेटा जिल्हा मियानी यांच्या अंतर्गत आहे. “कोणतंही नुकसान झालं नसलं तरी लोकांमध्ये कुतुहूल आणि भीतीचं वातावरण आहे. भारतीय हवाई दलाकडून ट्रेनिंग किंवा नियमित उड्डाण यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र तरीही आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलं आहे,” असं त्यांनी सांगितलं आहे.

तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे ?

भुजमधील स्टार गेजिंग इंडिया क्लबचे निशांत गोर यांनी हा प्रकाश लढाऊ विमानाचा असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. “अनेक शक्यता आहेत. उल्का किंवा उपग्रहाचा एखादा भागही असू शकतो. पण व्हिडीओंची पडताळणी केल्यानंतर आणि स्थानिकांशी बोलल्यानंतर हे लढाऊ विमान असावं या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत,” असं ते म्हणाले आहेत.

भारतीय हवाई दलाची सूत्रं काय सांगत आहेत –

जामनगरच्या धावपट्टीवरुन अनेकदा भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांचं उड्डाण होत आहे. स्थानिकांनी ऐकलेल्या आवाजानंतर (Sonic Boom) हा आवाज लढाऊ विमानांमुळे निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही असं हवाई दलाच्या सूत्रांनी म्हटलं आहे. मात्र आकाशात दिसलेल्या प्रकाशाबद्दल ते स्पष्टीकरण देऊ शकलेले नाहीत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपलेटा आणि जुनागढमध्ये लढाऊ विमानांची उपस्थिती नवी नसली तरी व्हिडीओत दिसत असणारा प्रकाश हा लढाऊ विमानांचा नाही. दरम्यान याप्रकरणी भारतीय हवाई दल किंवा गुजरात सरकारकडून कोणत्याही चौकशीचे आदेश देण्यात आलेले नाहीत.