News Flash

‘नरेंद्र मोदी स्टेडियम’चं नाव खरंच ‘सरदार पटेल स्टेडियम’ होतं का?

नामकरण होण्याआधी स्टेडियमचं नाव काय होतं?

छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस

भारत-इंग्लड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यापेक्षा देशात चर्चा झाली, ती सामना खेळवल्या गेलेल्या स्टेडियमच्या नावावरून. भारत तिसरा कसोटी सामना जिंकण्यापूर्वी स्टेडियमच्या झालेल्या नामकरणावरून बरीच उलट-सुलट चर्चा सुरू आहे. नामकरण केलं म्हणून विरोधकांकडून मोदी सरकारवर आणि पंतप्रधान मोदी यांच्यावरही टीका होताना दिसत आहे. त्याला भाजपाकडूनही उत्तर दिलं गेलं. मात्र, मूळ प्रश्न आहे तो स्टेडियमचं खरं नाव काय हा?

तिसरा कसोटी सामना खेळवण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुनर्विकसित करण्यात आलेल्या या स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं. उद्घाटन करण्यात आल्यानंतर स्टेडियमचं नाव नरेंद्र मोदी स्टेडियम असल्याचं समोर आलं. स्टेडियमचं नाव बदलण्यात आल्याची चर्चाही सुरू झाली. स्टेडियमचं नाव सरदार पटेल असं होतं ते नरेंद्र मोदी करण्यात आल्याच्या वादानं जोर धरला.

जगातील सर्वाधिक मोठं स्टेडियम असलेल्या या मैदानाला उद्घाटनानंतर लगेच वादाचं ग्रहण लागलं. राजकारण तापलं. राजकीय नेत्यांनी यावरून मोदी सरकारवर निशाणाही साधला. स्टेडियमचं नाव सरदार पटेल होतं. नाव बदलून नरेंद्र मोदी करणं, हा सरदार पटेल यांचा अपमान असल्याचा हल्ला काँग्रेसनं केला.

काँग्रेसनं केलेल्या टीकेला लगेच केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी उत्तर दिलं. “संपूर्ण कॉम्प्लेक्सचं नाव सरदार पटेल स्पोर्टस एन्क्लेव्ह आहे. फक्त स्टेडियमला नरेंद्र मोदी असं नाव देण्यात आलं आहे,” असं स्पष्टीकरण जावडेकर यांनी दिलं. मात्र, मूळ प्रश्न असा आहे की, स्टेडियमचा उल्लेख आधीपासून काय केला जात होता?

स्टेडियमचं आधीचं नाव काय होतं?

भारत-इंग्लड यांच्यात खेळवल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या काही तास आधी स्टेडियमला नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं. पण, त्या आधी या स्टेडियमचं उल्लेख काय केला जात होता? या स्टेडियमला कोणत्या नावानं ओळखलं जात होतं? गुजरातमधील वरिष्ठ क्रीडा पत्रकार तुषार त्रिवेदी यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार “१९८३ मध्ये हे स्टेडियम उभारण्यात आलं होतं. त्यावेळी या स्टेडियमचं नाव ‘गुजरात स्टेडियम’ असं होतं. अवघ्या नऊ महिन्यातच हे स्टेडियम उभारण्यात आलं होतं आणि माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंह यांनी यांच्या हस्ते याच उद्घाटन करण्यात आलं होतं.

तुषार त्रिवेदी यांच्या माहितीप्रमाणे “१९९४-९५ या स्टेडियमचं नाव सरदार पटेल स्टेडियम असं करण्यात आलं. मोटेरा परिसरात असलेल्या या स्टेडियमला सरदार पटेल यांचं नाव देण्यात आलं होतं. त्यानंतर २०२१ मध्ये या स्टेडियमचं नाव तिसऱ्यांदा बदलण्यात आलं आहे,” असं त्रिवेदी सांगतात.

काही ट्विटमधून या स्टेडियमचं नाव सरदार पटेल असल्याचं दिसत आहे. फेब्रवारी २०२० मध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर असताना याच स्टेडियममध्ये नमस्ते ट्रम्प कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाचं वृत्त देताना प्रसारभारतीने ट्विटमध्ये या स्टेडियमचा उल्लेख सरदार स्टेडियम असाच केलेला आहे. 

इतकंच नाही, तर भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लडच्या क्रिकेट संघटनेनंही तिसऱ्या सामन्याविषयी ट्विट केलेलं आहे. त्यातही या स्टेडियमचा उल्लेख सरदार पटेल असाच केलेला आहे.

२०१५ मध्ये या स्टेडियमच्या पुनर्विकासाचं काम हाती घेण्यात आलं. त्यामुळे इथे एकही सामना खेळवला गेला नाही. मागील वर्षी म्हणजेच फेब्रवारी २०२० मध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर असताना याच स्टेडियममध्ये नमस्ते ट्रम्प कार्यक्रम घेण्यात आला होता. १९८३ ला हे स्टेडियम तयार करण्यात आल्यानंतर भारत-वेस्ट इंडिज यांच्यात या मैदानावर पहिला सामना खेळला गेला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2021 5:00 am

Web Title: explained saradar patel stedium rename as narendra modi stadium what is real story of stadium name bmh 90
Next Stories
1 समजून घ्या: भारतात कसे कमी होऊ शकतात पेट्रोल, डिझेलचे दर
2 समजून घ्या : सोमवारपासून कोणाला, कधी आणि कशापद्धतीने मिळणार करोना लस?, कुठे करावी लागणार नोंदणी?
3 सैफ करीनानं पहिल्या मुलाचं नाव तैमूर का ठेवलेलं? वाचा त्यांच्याच शब्दांत
Just Now!
X