अमेरिकेत सध्या मोठया प्रमाणावर तणाव आहे. जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यामुळे अमेरिकेतील वेगवेगळया शहरांमध्ये हिंसक विरोध प्रदर्शन सुरु आहे. शुक्रवारी आंदोलनकर्ते थेट व्हाइट हाऊसपर्यंत पोहोचले. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची सुरक्षा संभाळणारे सिक्रेट सर्व्हीसचे एजंट त्यांना व्हाइट हाऊसमधल्या भूमिगत बंकरमध्ये घेऊन गेले. असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प जवळपास तासभर त्या बंकरमध्ये होते.

हा बंकर प्रेसिडेनशिअल इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर म्हणूनही ओळखला जातो. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष तसेच व्हाइट हाऊसच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्यानंतर या बंकरचा वापर करण्यात येतो. आतापर्यंत फार कमी वेळा या बंकरचा वापर करण्यात आला आहे. १३२ खोल्यांच्या व्हाइट हाऊसमध्ये PEOC हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे. तत्कालिन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रॅन्कलिन रुझवेल्ट यांच्या सुरक्षेसाठी दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी हा बंकर बांधण्यात आला होता.

टाऊन अँड कंट्री मॅगझिनच्या रिपोर्टनुसार, व्हाइट हाऊसमध्ये तळघराच्या खाली किंवा इस्ट विंगला हा बंकर आहे. कार्यालये आणि कॉन्फरन्स रुमने हा बंकर सुसज्ज असून इथे व्हाइट हाऊसच्या मिलिट्री विभागाचे कर्मचारी काम करतात. अमेरिकेत ११ सप्टेंबर २००१ रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेन्टागॉनवर हल्ला झाल्यानंतर या प्रेसिडेनशिअल इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचा वापर करण्यात आला होता. त्यावेळचे तत्कालिन माजी उपराष्ट्राध्यक्ष डिक चेनी यांना सुरक्षिततेसाठी येथे आणण्यात आले होते.

तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश हल्ला झाला, त्यावेळी फ्लोरिडामध्ये होते. दुसरा हवाई हल्ला झाल्याचा चुकीचा अलार्म वाजल्यानंतर त्याच रात्री बुश यांना सुद्धा लगेच या बंकरमध्ये नेण्यात आले होते. द न्यू यॉर्क टाइम्सने हे वृत्त दिले होते.

दहशतवादी हल्ल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बुश यांनी याच PEOC चा वापर केला होता. फर्स्ट लेडी लॉरा बुश यांना सुद्धा पूर्ण सुरक्षेमध्ये याच बंकरमध्ये आणण्यात आले होते. लॉरा बुश यांनी त्यांच्या ‘स्पोकन फॉर्म द हार्ट’ या पुस्तकात हा दाखला दिला आहे. इमर्जन्सीमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष या बंकरमधून सर्व कारभार चालवू शकतात. ‘फोन, टीव्ही, दूरसंचार यंत्रणा अशा सर्व अत्याधुनिक उपकरणांनी हा बंकर सुसज्ज आहे’ असे वर्णन पुस्तकात करण्यात आले आहे.

9/11 दहशतवादी हल्ल्यानंतर बंकरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. विमानही व्हाइट हाऊसला धडकले तरी या बंकरला काही होणार नाही अशा पद्धतीने बंकरची रचना करण्यात आली आहे. 9/11 हल्ल्यानंतर शुक्रवारी प्रथमच या बंकरचा वापर करण्यात आला असे वृत्त न्यू यॉर्क टाइम्सने दिले आहे. मॅनसायनच्या वृत्तानुसार, व्हाइट हाऊसमध्येच एक पाच मजली भूमिगत चेंबर आहे, जे PEOC पेक्षा पण मोठे आहे. बायोलॉजिकल तसेच रेडिओलॉजिकल हल्ल्यापासून फर्स्ट फॅमिली आणि व्हाइट हाऊसच्या सर्व कर्मचाऱ्यांचे रक्षण करण्यासाठी हे चेंबर उभारण्यात आले आहे. इथे हवेची सुद्धा व्यवस्था आहे तसेच अनेक महिने पुरेल इतका अन्नसाठा सुद्धा असतो.