भाषण म्हटल्यावर आपल्या सर्वांच्या डोळ्यांसमोर मोठी सभा किंवा राजकीय भाषणांचे चित्र उभं राहतं. मात्र अवघ्या काही तासांमध्ये जगातिक स्तरावरील सर्वात महत्वाच्या राजकीय व्यासपीठावर एक भाषण होणार असून या भाषणाकडे संपूर्ण जगाचं लक्ष असेल. हे भाषण असणार आहे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचं. मात्र हे भाषण देणारी व्यक्ती ही जागतिक राजकारणाच्या पटलावरील सर्वात शक्तीशाली व्यक्तींपैकी एक असल्याने त्यांचे भाषणही तसेच खास असणार आहे. म्हणूनच हे भाषण लिहिण्यासाठी एक खास टीम नियुक्त करण्यात आली असून या टीमचे नेतृत्व एक भारतीय करत आहे. याच भाषणाची परंपरा, हा भारतीय नक्की कोण आहे?, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष भाषणात काय सांगू शकतील यावर टाकेली ही नजर…

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे बुधवारी (२० जानेवारी २०२१ अमेरिकन स्थानिक वेळेनुसार) अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. तर कमला हॅरिस या उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स हे १२ वाजता (स्थानिक वेळेनुसार) कॅपिटलच्या वेस्ट फ्रण्टवर बायडेन यांना राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ देतील. ७८ वर्षीय बायडेन हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणारे सर्वात वयस्कर व्यक्ती ठरणार आहेत. बायडेन हे शपथ घेतल्यानंतर लगेचच अमेरिकन नागरिकांना राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिलं अध्यक्षीय भाषण करतील. विशेष म्हणजे हे भाषण अमेरिकन नागरिकांबरोबरच भारतीयांसाठीही विशेष असणार आहे. कारण अमेरिकेच्या नवीन राष्ट्राध्यक्षांचं पहिलं भाषण लिहिण्याचा मान एका भारतीयाला मिळाला आहे. विनय रेड्डी यांनी बायडेन यांचं भाषण लिहिलेलं आहे. रेड्डी यांनी यापूर्वीही निवडणूक प्रचारादरम्यान बायडेन आणि कमला हॅरिस यांच्यासाठी भाषणं लिहिली आहेत. इतकचं नाही तर रेड्डी हे अगदी बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असतानाही उपराष्ट्राध्यक्ष पदी असणाऱ्या बायडेन यांच्या टीममध्ये चीफ स्पीच रायटर म्हणजेच भाषण लिहिणाऱ्या गटाचे प्रमुख होते.

भाषणामध्ये काय असू शकतं?

अमेरिकन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार जो बायडेन हे राष्ट्राध्यक्ष पदी विराजमान झाल्यानंतर जे पाहिलं भाषण देणार आहेत त्यामध्ये राष्ट्रीय एकतेच्या मुद्द्यावर भर देण्यात आलाय. दुपारी १२ वाजता शपथ घेतल्यानंतर लगेचच बायडेन भाषण देतील. सध्या अमेरिकेवर आलेल्या करोनारुपी संकटामध्ये सर्वांनी एकत्र राहण्याची गरज असल्याचं आवाहन बायडेन आपल्या भाषणातून करण्याची शक्यात आहे. बायडेन यांचं भाषण २० ते ३० मिनिटांचं असेल. अमेरिकेत सध्या निवडणुका आणि त्यापूर्वीही ब्लॅक लाइव्हज मॅटरच्या माध्यमातून सामाजिक दरी निर्माण झाली आहे त्याच पार्श्वभूमीवर बायडेन यांचे भाषण हे राष्ट्रीय एकता या विषयी असेल असं सांगितलं जात आहे.

रेड्डी नक्की आहेत तरी कोण?

राष्ट्राध्यक्षांचे भाषण लिहिणारे भारतीय वंशाचे विनय रेड्डी यांचं बालपण ओहायोमधील डायटन येथेच गेलं. त्यांनी आपलं शिक्षण ओहायोमधील स्टेट यूनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लॉमधून पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी मियामी येथील विद्यापिठामधून पदवी संपादित केली. रेड्डी यांचं कुटुंब मूळचं तेलंगणमधील पोथिरेडिपेटा गावातील आहे. यापूर्वी रेड्डी हे २०१३ ते २०१७ दरम्यान बायडेन यांच्यासाठी भाषण लिहायचे. ते बायडेन यांच्या टीममधील मुख्य स्पीच रायडर होते. बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकल्यापासूनच रेड्डी बायडेन यांच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षीय भाषणावर काम करत असल्याचे वृत्त आहे.

भाषण लिहिण्याची जबाबदारी

व्हाइट हाऊसमधील प्रेसिडेंशियल डिपार्टमेंटमधील ऑफिस ऑफ स्पीच रायटिंगकडे राष्ट्राध्यक्षांसाठी भाषण तयार करण्याची जबाबदारी सोपवली जाते. बायडेन यांचं भाषण माइक डॉनिलन सुद्धा तपासून पाहणार आहेत. डॉनिलन हे बायडेन यांचे निटवर्तीय मानले जातात.

भाषणाची परंपरा आणि सर्वात मोठं भाषण कोणी दिलं?

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी भाषण देण्याची परंपरा ही जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यापासून चालत आलेली आहे. वॉशिंग्टन हे ३० एप्रिल १७८९ रोजी अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडण्यात आलेले. त्यांनी आपल्या पहिल्या भाषणामध्ये नव्या आणि स्वतंत्र सरकारबद्दल भाष्य केलं होतं. तर आपल्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये शपथ घेतल्यानंतर जॉर्ज यांनी अवघ्या १३५ शब्दांचं इतिहासातील सर्वात छोटं भाषण दिलं होतं. तर १८४१ मध्ये विलियम हॅनरी हॅरिसन यांनी आठ हजार ४५५ शब्दांचं सर्वात लांबलचक भाषण दिलं होतं.