संपूर्ण जग करोनाशी लढत असताना दुसरीकडे उत्तर कोरियाकडून वारंवार करोनाचा एकही रुग्ण नसल्याचा दावा केला जात होता. उत्तर कोरियाच्या या दाव्यांवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. दरम्यान करोनापासून सुरक्षित असल्याचा दावा करणाऱ्या उत्तर कोरियामध्ये सध्या मात्र संसर्गाने प्रवेश केला आहे.

उत्तर कोरियाचा हुकमूशाह किम जोंग-उन याने करोनाच्या संसर्गाने शिरकाव केल्याबद्दल पक्षातील काही नेत्यांना जबाबदार धरलं असून त्यांच्यामुळे सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आली असल्याचं म्हटलं आहे. स्थानिक प्रसारमाध्यमाने हे वृत्त दिलं आहे.

केळी तीन हजार रुपये किलो, कॉफीचं पाकिट सात हजाराला; किम जोंग उन यांच्यासमोर नवं संकट

“जगात करोनाचं संकट असून त्याच्याशी लढण्यासाठी पक्षाने घेतलेल्या संस्थात्मक, साहित्य, विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित उपायांकडे दुर्लक्ष करत अधिकाऱ्यांनी मोठी चूक केली आहे. यामुळे देशाची तसंच त्याच्या नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे,” असं किम-जोंग उन यांनी पक्षाच्या बैठकीत म्हटल्याचं वृत्त सरकारी वृत्तसंस्था KCNA कडून देण्यात आली आहे .

मात्र यावेळी उत्तर कोरियाने चुकांचं नेमकं स्वरुप काय आहे हे स्पष्ट केलं नसून तज्ञ मात्र स्वत:ला विभक्त ठेवणाऱ्या उत्तर कोरियात करोनाने प्रवेश केल्याचं सांगत आहेत.

उत्तर कोरियातील करोनासंबंधी आतापर्यंत काय माहिती हाती आली आहे?

उत्तर कोरियाचे शेजारी असणाऱ्या चीन आणि दक्षिण कोरियात फार लवकर करोनाचा उद्रेक पहायला मिळाला होता. उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाची सीमारेषेवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात केली आहे तर दुसरीकडे चीनच्या सीमारेषेवर तुलनेने कमी सुरक्षा आहे.

२०२० मध्ये उत्तर कोरियाने तात्काळ कारवाई करत २३ जानेवारीपासून परदेशी पर्यटकांना बंदी घातली होती. यानंतर एका आठवड्याने आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला उत्तर कोरियाने अनेक कडक निर्बंध लावले होते. दरम्यान उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाने करोनासंबंधी दिलेल्या रिपोर्टला दुजोरा दिला नव्हता. दुसरीकडे त्यांनी २० फेब्रुवारीपासून शाळा बंद केल्या होत्या. याच महिन्यात त्यांनी आंतरराष्ट्रीय विमानं तसंच रस्ते आणि समुद्री मार्ग बंद केला होता. याशिवाय मास्कदेखील अनिवार्य करण्यात आला.

Video: हुकूमशाह किम जोंग उनचं वजन घटल्याने उत्तर कोरियात चिंतेचं वातावरण

१८ मार्चला किम जोंग-उन यांनी नवी रुग्णालयं उभारण्याचा आदेश दिला. मात्र यावेळी त्यांनी ही रुग्णालयं देशाची आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी उभारली जात असल्याचा दावा करताना त्यांनी करोनाचा उल्लेख करणं मात्र टाळलं होतं. मार्च महिन्याच्या अखेपर्यंत, सरकारने जवळपास १० हजार लोकांनी क्वारंटाइन केलं होतं.

हॉगकाँगस्थित एशिया टाइम्स आणि अमेरिकेतील वेबसाईट ३८ नॉर्थ यांनी या कार्यकाळात वृत्त देताना उत्तर कोरियाने लावलेल्या निर्बंधांवरुन करोना संसर्गाने त्यांच्या देशात प्रवेश केल्याचं दिसत असल्याचं म्हटलं होतं. एप्रिल महिन्यात उत्तर कोरियाचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. यावेळी हजारो प्रतिनिधी विना मास्क हजर होते.

जून महिन्यात उत्तर कोरियाने जागतिक आरोग्य संघटनेला आपल्या देशातील सर्व शैक्षणिक संस्था सुरु असल्याची माहिती दिली. दरम्यान जुलै महिन्याच्या अखेरीस किम जोंग-उन यांनी करोना रुग्ण सापडल्याच्या संशय आल्यानंतर आणीबाणी जाहीर करत केसॉन्ग या शहरात लॉकडाउन जाहीर केला.

दक्षिण कोरियाच्या गुप्तचर यंत्रणेनुसार, उत्तर कोरियात चीनमधून साहित्य आणल्याप्रकरणी ऑगस्ट महिन्यात एका अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. याशिवाय उत्तर कोरियाने प्योंगयांगमध्ये लॉकडाउन करत चीनमधून होणारी तांदूळ करोना व्हायरस येईल या भीतीने वाहतूक रोखली होती. ऑक्टोबर महिन्यात उत्तर कोरियाच्या सरकारी वाहिनीने जग आम्ही करोनामुक्त असल्याने आमच्याकडे पाहत असल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान यावर्षी मार्च महिन्यात उत्तर कोरियाने आपण टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार नसल्याचं जाहीर केलं. एप्रिल महिन्यात किम जोंग-उन यांनी करोनामुळे आपला देश आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाला सामोरा जात असल्याची कबुली दिली होती.