04 December 2020

News Flash

समजून घ्या : चीनमधून येणारी Yellow Dust म्हणजे काय?; यातून होतो का करोनाचा प्रसार?

उत्तर कोरियाने नागरिकांना दारं खिडक्या लावून घरात राहण्याचा आदेश दिलेला

फाइल फोटो ( फोटो सौजन्य : AP Photo/Jad Saab)

उत्तर कोरियामधील सरकारी अधिकाऱ्यांनी नागरिकांना यल्लो डस्ट म्हणजेच पिवळ्या रंगाच्या धुळीच्या वादळापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी घरांमध्येच राहण्याचा सल्ला दिला आहे. चीनमधून ही यल्लो डस्ट उत्तर कोरियामध्ये येत असल्याने याच्या माध्यमातून करोनाचा फैलाव होऊ शकतो अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. २१ ऑक्टोबर रोजी उत्तर कोरियामधील अनेक सरकारी प्रसारमाध्यमांनी पुढील काही कालावधीमध्ये देशात धुळीचं वादळ येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. नागरिकांनाही या सुचनांना गांभीर्याने घेतल्याचे चित्र लगचे पहायला मिळत असल्याचे बीबीसीने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. गुरुवारपासून अगदी देशाची राजधानी असणाऱ्या प्यांगयाँग शहरामधील रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली आहे. उत्तर कोरियाने आपल्या देशामध्ये करोनाचे रुग्ण नसल्याचे स्पष्ट केलं आहे. मात्र देशाच्या सीमा जानेवारीपासूनच बंद करण्यात आल्या असून नागरिंकांना फिरवण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

कोरियन सेंट्रल टेलिव्हिजनच्या बुधवारच्या हवामानासंदर्भातील बातम्यांमध्ये पिवळ्या रंगाच्या धुळीच्या वादळासंदर्भात इशारा देण्यात आला. पुढील काही कालावधीमध्ये चीनमधून येणारे हे वादळ देशात दाखल होऊ शकते असं सांगण्यात आलं होतं. देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणचे सार्वजनिक बांधकाम पुढील काही काळासाठी थांबवण्याची घोषणाही करण्यात आली. सर्व नागरिकांनी घरातच थांबवे, घराच्या दारं खिडक्या बंद करुन घ्याव्यात असे आदेश देण्यात आल्याचे बीबीसीने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

गुरुवारच्या रोडाँग सीनमून या सरकारी वृत्तपत्रामध्ये साथीच्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना देशामध्ये पिवळ्या धुलीकणांच्या माध्यमातून प्रवेश करणाऱ्या विषाणूच्या धोक्यासंदर्भात सजग राहण्याचा इशारा देण्यात आला होता. जगभरातील वेगवेगळ्या संशोधनांमध्ये करोनाचा फैलाव हा हवेतून होत असल्याचे सिद्ध झालं आहे याचा संदर्भ या लेखात देण्यात आला आहे. हवेतून करोनाचा प्रसार होत असल्याने यल्लो डस्टचे प्रकरण गांभीर्याने घेण्याची गरज आहे असंही या लेखात नमूद करण्यात आलं होतं.

वेगवेगळ्या देशांच्या राजदुतांनाही या धुळीच्या वादळासंदर्भातील इशारा देण्यात आला होता. उत्तर कोरियामधील रशियन दुतावासाने तर फेसबुकवरही यासंदर्भातील पोस्ट शेअर केली होती. सध्याची परिस्थिती बघता घरीच थांबा असं आवाहन दुतावासाने आपल्या कर्मचाऱ्यांना आणि देशातील रशियन पर्यटकांना केलं होतं.

यल्लो डस्ट म्हणजे चीन आणि मंगोलियातील वाळवंटावरुन उत्तर कोरियामध्ये वेगाने वाहत येणारे धुळीचे वादळ. दरवर्षी उत्तर आणि दक्षिण कोरियामध्ये ठराविक कालावधीमध्ये अशी धुळीची वादळं येत असतात. या वादळांमधील वाळूचे कण हे हवेतील इतर घटकांबरोबर मिसळतात. यामध्ये कारखान्यातून सोडण्यात आलेले वायू आणि इतर घटकांचा समावेश असतो. त्यामुळेच या वादळाला यल्लो डस्ट असं म्हटलं जातं. यामुळे श्वसनासंदर्भातील समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

हवेतील अशा धुलीकणांचे प्रमाण वाढल्यानंतर प्रशासनाकडून नागरिकांनी घराबाहेर निघू नये असा सल्ला देण्यात येतो. सामान्यपणे अशा वातावरणामध्ये व्यायाम आणि मैदानी खेळ न खेळण्याचा सल्ला दिला जातो. हवेमध्ये ८०० मायक्रोग्राम प्रती क्युबिक मीटरपेक्षा अधिक धुलीकण असतील तर त्या भागांमधील शाळा आणि सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात येतात.

 

 

अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने (सीडीसी) दिलेल्या माहितीनुसार करोनाचा विषाणू हवेमध्ये अनेक तास राहू शकतो. मात्र त्याचवेळी अशाप्रकारे हवेमधून मोठ्याप्रमाणात करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी असल्याचेजी सीडीसीने म्हटलं आहे. “मोठ्या आकाराच्या प्रदेशात वाऱ्याच्या मार्फत करोनाचा प्रसार होऊ शकतो किंवा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या माध्यमातून हवेमध्ये मोठ्या प्रमाणात करोना पसरु शकतो असं सिद्ध करणारे कोणतेही पुरावे अद्याप सापडलेले नाहीत,” असं सीडीसीने पाच ऑक्टोबर रोजी म्हटलं होतं.

करोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या बाजूला उभं राहणं, त्याच्या थेट संपर्कात येणं किंवा खोकल्याने अथवा शिंकल्याने करोनाचा फैलाव होऊ शकतो. दक्षिण कोरियामधील एनके न्यूजच्या वृत्तानुसार यल्लो डस्टच्या माध्यमातून करोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो हा दावा अनेक संशोधकांनी फेटाळून लावला आहे.

उत्तर कोरियाने हा आदेश काढून आठवड्याहून अधिक कालावधी होत आला असला तरी यल्लो डस्टसंदर्भातील रहस्य आणि भीती नागरिकांच्या मनात कायम असल्याचे चित्र दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 8:55 am

Web Title: explained yellow dust which north korea has warned could be carrying covid 19 scsg 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 समजून घ्या : अंबानी विरुद्ध बोझस… २५ हजार कोटींचा वाद नक्की आहे तरी काय?
2 Onion Price : भारतीय महिन्याला किती कांदा खातात?; जाणून घ्या उत्पादन, खपाचे गणित
3 समजून घ्या : केंद्र सरकार देत असलेल्या दिवाळी बोनससाठी कोणते कर्मचारी ठरणार पात्र
Just Now!
X