28 February 2021

News Flash

जाणून घ्या : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना नक्की किती पगार मिळतो?; इतर कोणत्या सुविधा त्यांना दिल्या जातात?

जो बायडेन हे अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे बुधवारी (२० जानेवारी २०२१ अमेरिकन स्थानिक वेळेनुसार) अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. तर कमला हॅरिस या अमेरिकेच्या ४९ व्या उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स हे १२ वाजता (स्थानिक वेळेनुसार) कॅपिटलच्या वेस्ट फ्रण्टवर बायडेन यांना राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ देतील. ७८ वर्षीय बायडेन हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणारे सर्वात वयस्कर व्यक्ती ठरणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद हे जगातील सर्वात प्रभावशाली राजकीय पद आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे जगातील सर्वात शक्तीशाली नेता म्हणून पाहिले जाते. मात्र अमर्याद शक्तीबरोबरच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षला पदाला साजेसा पगारही मिळतो. तसेच या पदावर असणाऱ्या व्यक्तीला अशा काही सुविधा मिळतात ज्या जगातील इतर कोणत्याही राष्ट्राध्यक्षाला मिळत नाहीत. याच सेवा आणि सुविधांचा हा लेखाजोखा…

नक्की वाचा >> समजून घ्या : नोव्हेंबरमध्ये निवडणूक जिंकल्यानंतरही २० जानेवारीलाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष का घेतात शपथ?

१) कोणकोणत्या सुविधा मिळतात : 

अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणाऱ्या व्यक्तीला व्हाइट हाऊसबरोबरच, खासगी विमान, हेलिकॉप्टरसारख्या सुविधाही मिळतात. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांचा बहुतांश खर्च हा सरकारच्या तिजोरीमधूनच केला जातो. राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर माजी राष्ट्राध्यक्षांना पेन्शन म्हणून मोठी रक्कम दिली जाते.

२) निवृत्तीनंतर दिला जातो भत्ता : 

वर्षाला ५० हजार डॉलर म्हणजेच ४० लाख रुपये भत्ता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मिळतो. तसेच एक लाख डॉलर म्हणजेच ८० लाखांपर्यंतचा निधी राष्ट्राध्यक्षांच्या प्रवास खर्चासाठी राखीव ठेवण्यात येतो. विशेष म्हणजे या खर्चावर कोणताही कर लावला जात नाही.

३) मनोरंजनासाठी दिली जाते विशेष रक्कम : 

राष्ट्राध्यक्षांना वर्षाला १९ हजार डॉलर म्हणजेच १४ लाख रुपये एंटरन्टेनमेंट म्हणजेच करमणुकीवरील खर्चासाठी दिले जातात. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पगारावर कर आकारण्यात येतो मात्र त्यांना जे भत्ते दिले जातात त्यावर कोणताही कर आकारण्यात येत नाही.

४) राष्ट्राध्यक्ष कपडे भेट म्हणून स्वीकारत नाहीत आणि स्वीकारलेच तर… : 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य महागडे, डिझायनर कपडे वापरतात. विशेष म्हणजे कपड्यांसारख्या सारख्या गोष्टी अध्यक्षांकडून किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून भेट म्हणून स्वीकारल्या जात नाहीत. जरी अशी एखादी गोष्ट भेट म्हणून स्वीकारल्यास त्या एकदा वापरल्यानंतर ते पुन्हा वापरले जात नाही. ते थेट नॅशनल अर्काइव्हमध्ये दिले जातात.

५) सर्वात सुरक्षित इमारतीत वास्तव्य : 

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष व्हाइट हाऊसमध्ये राहतात. व्हाइट हाऊस ही जगातील सर्वात सुरक्षित सरकारी इमारतींपैकी एक आहे. सर्वात आधी १७९२ साली अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना व्हाइट हाऊस अधिकृत सरकारी निवासस्थान म्हणून देण्यात आले.

नक्की वाचा >>  समजून घ्या : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पहिल्याच भाषणाचे भारतीय कनेक्शन

६) कसं आहे व्हाईट हाऊस? : 

व्हाइट हाऊसमध्ये सहा इमारती असून त्यामध्ये १३२ खोल्या आहेत. यामध्ये वेगवेगळ्या वापरासाठीच्या खोल्यांबरोबरच टेनिस कोर्ट, स्विमिंग पूल्सचाही समावेश आहे. व्हाइट हाऊसमध्ये ५१ खुर्च्यांचे एक चित्रपटगृहही आहे. या ठिकाणी चित्रपटांबरोबरच लहानमोठे कार्यक्रमांचेही आयोजन केलं जातं.

७) सजावटीसाठी विशेष निधी : 

प्रत्येक राष्ट्राध्यक्षांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार व्हाइट हाऊसची सजावट करण्यासाठी एक लाख डॉलरचा निधी दिला जातो. बराक ओबामा जेव्हा पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले होते तेव्हा त्यांनी हा निधी वापरला नव्हता. दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवडूण आल्यानंतर त्यांनी एक निधी वापरला होता. एनबीसीच्या वृत्तानुसार ट्रम्प राष्ट्राध्यक्ष  झाल्यानंतर त्यांनी १.७५ मिलियन डॉलरचा निधी फर्नीचर, भिंती आणि इतर सजावटींसाठी खर्च केला होता.

८) व्हाइट हाऊसच्या अंगणात होते शेती : 

व्हाइट हाऊसमध्ये मोठ्या आकाराचे बगिचे आहेत. बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल या स्वत: गार्डनिंग करायच्या. अनेकदा त्यांनी शाळांमधील लहान मुलांना येथे बोलवून वनस्पती आणि पर्यावरणाचे धडे दिले आहेत. सध्या या ठिकाणी अनेक फळं आणि भाज्यांचे उत्पादन घेतलं जातं. हे सर्व पदार्थ व्हाइट हाऊसमध्येच वापरले जातात.

९) कर्मचाऱ्यांचा ताफाच : 

व्हाइट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी १०० कर्माचारी कार्यरत असतात. यामध्ये नोकर, स्वयंपाके, माळी आणि मुख्य हाऊस किपर्सचा समावेश असतो.

१०) सुट्टीसाठी गेस्ट हाऊस : 

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष सामान्यपणे सुट्ट्यांसाठी मेरीलॅण्डमधील कॅम्प डेव्हिडला भेट देतात. येथे राष्ट्राध्यक्षांना सुट्ट्यांमध्ये वेळ घालवण्यासाठी विशेष निवासस्थान तयार करण्यात आलं आहे. यामध्ये जीम, स्विमिंग पूल, एअरक्राफ्ट हँगरसारख्या सुविधा आहेत.

११) विशेष विमान : 

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना बोइंग ७४७ हे विमानही वापरण्यासाठी दिलं जातं. या विमानामध्ये चार हजार स्वेअर फुटांची जागी आहे. यात मेडिकल रुम, राष्ट्राध्यक्षांसाठी खासगी खोली, तसेच एका वेळेस शंभर जण बसू शकतील एवढी जागा आहे. राष्ट्राध्यक्षांच्या सेवेत असणाऱ्या बोइंग ७४७ विमानाच्या एका तासाच्या उड्डाणाचा खर्च दोन लाख डॉलर इतका आहे. मॅरीन वन ही खास हेलिकॉप्टर्सही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना दिली जातात.

१२) असा असतो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा ताफा : 

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची मुख्य गाडी ही बुलेटप्रुफ आणि बॉम्बप्रुफ आहे. या गाडीला द बीस्ट्स असं म्हणतात. राष्ट्राध्यक्षांच्या गाडीसोबत मोठा ताफा असतो यामध्ये अनेक सुरक्षारक्षकांचा समावेश असतो.

१३) २००१ मध्ये वाढवण्यात आलं वेतन : 

२००१ पर्यंत अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे वेतन दोन लाख डॉलर म्हणजेच जवळजवळ दीड कोटी रुपये इतके होते. मात्र त्यानंतर काँग्रेसने हे वेतन दुप्पटीने वाढवले. त्याचप्रमाणे २००१ साली ५० हजार डॉलरचा निधी अतिरिक्त निधी म्हणून देण्यात आला.

१४) ट्रम्प यांच्यासाठी पगार म्हणजे अगदी शुल्लक : 

अर्थात मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांना मिळणारे हे वेतन एक उद्योगपती म्हणून त्यांची जी कमाई आहे त्यापेक्षा खूपच कमी होते. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार ट्रम्प यांच्याकडे ३.१ बिलियन डॉलर म्हणजेच २.३ खरब रुपये इतकी संपत्ती आहे.

१५) राष्ट्राध्यक्षांना नक्की किती पगार मिळतो : 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना वर्षाला चार लाख डॉलरचा म्हणजेच भारतीय चलनानुसार दोन कोटी ९० लाख रुपये पगार मिळतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2021 4:15 pm

Web Title: financial perks salary and list of other services offered for being the president of the united states scsg 91
Next Stories
1 समजून घ्या : नोव्हेंबरमध्ये निवडणूक जिंकल्यानंतरही २० जानेवारीलाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष का घेतात शपथ?
2 समजून घ्या : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पहिल्याच भाषणाचे भारतीय कनेक्शन
3 दौरा नाही तर शिकवण… भारतीय संघाकडून शिकता येतील अशा १० गोष्टी
Just Now!
X