देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे औषधे, ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर अशा वैद्यकीय सुविधांचा तुटवडा भासू लागला आहे. अशातच ऑक्सिजन, करोनाच्या उपचारासाठी लागणारी औषधे यांचा काळाबाजारही काही लोक करत आहेत.

रेमडेसिविर हे करोनाच्या उपचारासाठी लागणारं एक महत्त्वाचं औषध आहे. काही जण ह्या नावाने बनावट औषधे विकत आहेत. त्याबद्दल आता भारत सरकारकडून माहिती देण्यात आली आहे.

पीआयबी फॅक्ट चेकने यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे.

त्यांच्या या ट्विटनुसार, रेमडेसिविर हे इन्जेक्शन कोविप्री या नावाने सध्या काही ठिकाणी विकलं जातं आहे. मात्र, हे औषधं म्हणजे रेमडेसिविर इन्जेक्शन नव्हे. हे औषध बनावट रेमडेसिविर असून कोणीही हे औषध घेऊ नये असं सांगण्यात आलं आहे.

त्याचबरोबर मान्यता नसलेल्या कोणत्याही ठिकाणाहून औषधे खरेदी न करण्याचं आवाहनही या ट्विटमध्ये करण्यात आलं आहे.

तर दिल्ली पोलीसांनीही ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. दिल्लीच्या पोलिस दलातील अधिकारी मोनिका भारद्वाज यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्यावर कोविप्री असा उल्लेख आहे. हे बनावट रेमडेसिविर इन्जेक्शन असून ते खरेदी करु नका असंही मोनिका यांनी सांगितलं आहे.