भारत आणि अमेरिकेमध्ये काल ऐतिहासिक ‘बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन अ‍ॅग्रीमेंट’ म्हणजे ‘BECA’ करार झाला. या करारामुळे भारताचा अमेरिकेकडून काही महत्त्वाची फायटर विमाने मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारताची नजर बोईंगच्या F-15EX फायटर विमानांवर आहे. F-15EX विमानाची निर्मिती करणाऱ्या उत्पादकाला अद्यापी भारताला या विमानांच्या विक्री करण्याचा परवाना मिळालेला नाही. बोईंग ही जगातील एक आघाडीची विमान उत्पादक कंपनी आहे.

काही महिन्यांपूर्वी बोईंगने डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडे भारताला F-15EX विमानांची विक्री करण्याची परवानगी मागितली होती. ‘फ्लाइट ग्लोबल’ वेबसाइटने हे वृत्त दिले आहे. बोईंगने यापूर्वी भारताला F/A-18 E/F सुपर हॉरनेट विमाने विकण्याची तयारी दाखवली आहे. इंडियन एअर फोर्स आणि भारतीय नौदल दोघांसाठी बोईंग कंपनी या विमानांचे उत्पादन करणार होती. F-15EX ही F-15E स्ट्राइक इगल मल्टीरोल फायटर विमानाची आधुनिक आवृत्ती आहे.

मल्टीरोल म्हणजे बहुउद्देशीय एकाचवेळी वेगवेगळी काम करु शकणारं फायटर विमान. F-15E ही F-15 विमानाची पुढची आवृत्ती आहे. १९७२ साली F-15 फायटर विमानाने पहिले उड्डाण केले होते. F-15E आणि F-15 ही दोन्ही विमाने अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांच्या हवाई दलाच्या ताफ्यात अजूनही आहेत. सौदी अरेबिया आणि कतार या आखातामधील दोन देशांकडे F-15EX विमाने आहेत. “या वर्गातील कुठल्याही फायटर विमानांपेक्षा F-15EX विमानांचा पल्ला आणि जास्त पेलोड वाहून नेण्याची क्षमता आहे” असे बोईंगकडून सांगण्यात आले.

F-15EX मध्ये ३६ टनापर्यंत वजन उचलून उड्डाण करण्याची क्षमता आहे. भारताचे मुख्य अस्त्र सुखोई-३० एमकेआयमध्ये सुद्धा इतकीच क्षमता आहे. बोईंगच्या दाव्यानुसार F-15EX १३ टनापर्यंत शस्त्रास्त्र वाहून नेऊ शकते. या विमानातील अत्याधुनिक दिशादर्शक प्रणालीमुळ जमिनीवरील लक्ष्यावर अचूकतेने प्रहार करता येऊ शकतो. F-15EX मध्ये हवेतून हवेत हल्ला करणारी २२ मिसाइल्स डागण्याची क्षमता आहे. F-15EX मध्ये F-35 या स्टेल्थ फायटर जेटपेक्षाही जास्त मिसाइल्स वाहून नेण्याची ची क्षमता आहे.

F-35 हे अमेरिकेते सर्वात अत्याधुनिक फायटर विमान आहे. मागच्यावर्षीच डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन एअर फोर्ससाठी आठ F-15EX विमाने खरेदी करायला मंजुरी दिली. इस्रायल, दक्षिण कोरिया आणि सिंगापूर या देशांकडे F-15E विमाने आहेत. महत्त्वाच म्हणजे दक्षिण कोरिया आणि सिंगापूरने राफेलऐवजी F-15E च्या खरेदीला पसंती दिली होती.