News Flash

भारत-चीन संघर्ष : लडाख सीमेवर भारताने तैनात केले ‘टी-९० भीष्म’ टँक; जाणून घ्या जगातील या सर्वोत्तम रणगाड्यांबद्दल

भारताकडे असे १२०० हून अधिक टी-९० रणगाडे

फोटो सौजन्य: एएनआय

भारत आणि चीनदरम्यान सुरु असणाऱ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने सीमेरेषेजवळ आधुनिक रणगाडे, युद्ध विमाने तैनात केली आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ भारताने अनेक रणगाडे तैनात केले आहेत. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. भारताने या सीमेवर ‘टी-९०’ भीष्म टँकची फौजच तैनात केली आहे. लडाखसारख्या प्रदेशामध्ये युद्ध झाल्यास हे टँक खूपच महत्वाची भूमिका पार पाडू शकतात. मात्र हे टँक नक्की आहेत कसे आणि त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण या लेखामधून जाणून घेणार आहोत.

> ‘टी-९०’ हा रशियाचा सध्याचा मेन बॅटल टँक (एमबीटी) असून तो जगातील सर्वोत्तम रणगाडय़ांपैकी एक आहे. त्यापूर्वीच्या टी-७२ या रणगाडय़ाची ही सुधारित आणि अत्याधुनिक आवृत्ती आहे. रशियाचे टी-८० हे रणगाडे अद्ययावत असले तरी त्यांची रचना आणि निर्मिती प्रक्रिया काहीशी गुंतागुंतीची होती. त्याच्या तुलनेत टी-९० ची रचना सोपी आणि मोठय़ा प्रमाणावर उत्पादनास सुटसुटीत आहे.

> १९९३ साली टी-९० रणगाडे रशियन सैन्यात दाखल झाले. भारताने २००१ साली ३१० टी-९० रणगाडे विकत घेतले असून त्यांचे नाव भीष्म असे ठेवले आहे. आता भारतीय सैन्यातील टी-९० रणगाडय़ांची संख्या १२०० च्या वर गेली आहे.

> टी-९० रणगाडय़ांची मुख्य खासियत म्हणजे त्यांची तिहेरी संरक्षण प्रणाली. यात पहिल्या स्तरावर रणगाडय़ाचे कॉम्पोझिट आर्मर (चिलखत) आहे. त्यावर तिसऱ्या पिढीतील कॉन्टॅक्ट-५ हे एक्स्प्लोझिव्ह रिअ‍ॅक्टर आर्मर (ईआरए) आहे. ईआरएमध्ये धातूच्या थरांमध्ये स्फोटकांचा थर लावलेला असतो.

> शत्रूचा तोफगोळा किंवा रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र त्यावर धडकले की त्यातील स्फोटकांचा बाहेरील बाजूला स्फोट होऊन शत्रूचा तोफगोळा बाहेर ढकलला जातो आणि मुख्य चिलखत सुरक्षित राहते. या रणगाडय़ाच्या पृष्ठभागावर जे विटांसारखे भाग दिसतात ते ईआरए आहे.

> तिसऱ्या संरक्षक स्तरात ‘श्टोरा’ (पडदा) नावाची खास रशियन प्रणाली आहे. त्यात इलेक्ट्रो-ऑप्टिकल डॅझलर किंवा अ‍ॅक्टिव्ह इन्फ्रारेड जॅमर आहेत. ते शत्रूने आपल्या रणगाडय़ावर लेझर किरणांनी नेम धरला की कर्मचाऱ्यांना संभाव्य हल्ल्याची आगाऊ सूचना देतात. त्यानंतर इन्फ्रारेड जॅमर आपल्या दिशेने येणाऱ्या शत्रूच्या क्षेपणास्त्राची दिशादर्शन प्रणाली जॅम करतात आणि त्याला आपल्या रणगाडय़ापासून बाजूला वळवतात.

> तसेच रणगाडय़ाच्या सभोवताली स्मोक ग्रेनेड्स (धूर पसरवणारे बॉम्ब) फेकले जातात. त्यानेही शत्रूचे तोफगोळे किंवा क्षेपणास्त्रे लक्ष्यापासून भरकटतात. याशिवाय अन्य रशियन रणगाडय़ांप्रमाणे टी-९० चे डिझाइनही बसके (उंचीला कमी) असल्याने शत्रूच्या हल्ल्यापासून वाचण्याची त्याची क्षमता अधिक आहे.

> टी-९० ची १२५ मिमीची स्मूथ बोअर मुख्य तोफ नेहमीच्या तोफगोळ्यांसह ९एम११९एम रिफ्लेक्स रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र डागू शकते. रिप्लेक्स क्षेपणास्त्र शत्रूच्या रणगाडय़ांचे ३७ इंच जाडीचे पोलादी कवच भेदू शकते आणि कमी उंचीवरील हेलिकॉप्टरही पाडू शकते.

> याशिवाय लेझर आणि इन्फ्रारेड रेंज फाईंडर, बॅलिस्टिक कॉम्प्युटर, गन स्टॅबिलायझेशन आदी यंत्रणाही आहेत. टी-९० ताशी ६५ किमी वेगाने ६५० किमीची मजल मारू शकतो. त्यात वातानुकूलन यंत्रणाही आहे.

ही सर्व वैशिष्ट्ये पाहता नक्कीच हा रणगाडा सध्या भारताकडे असणाऱ्या सर्वोत्तम रणगाड्यांपैकी एक आहे असं ठामपणे म्हणता येईल.

(टीप : हा मूळ लेख सचिन दिवाण यांनी लोकसत्ताच्या गाथा शस्त्रांची या सदराअंतर्गत लिहिला होता. हा लेख २४ मे २०१८ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 9:43 am

Web Title: india vs china ladakh t 90 m bhishma india main battle tank mbt scsg 91
Next Stories
1 समजून घ्या सहजपणे : दीपिका, सारा, श्रद्धा आणि रकुल यांना एनसीबीने का समन्स बजावले?
2 समजून घ्या… केंद्रीय मंत्रिमंडळातून का बाहेर पडला अकाली दल?
3 समजून घ्या : ३० टक्के वेतन कपातीनंतर खासदार, मंत्र्यांना किती पगार मिळणार?; सरकारचा किती पैसा वाचणार?
Just Now!
X