26 January 2021

News Flash

Merry Christmas 2020: ‘ख्रिसमस कॅरल्स’ म्हणजे नेमकं काय? कधीपासून झाली सुरूवात?

नाताळ सणातील नाताळ गोठे, खाद्यसंस्कृती यांसारखंच आकर्षण असतं ते 'ख्रिसमस कॅरल्स'चं...

(संग्रहित छायाचित्र)

नाताळ सणातील नाताळ गोठे, खाद्यसंस्कृती यांसारखंच आकर्षण असतं ते ख्रिसमस कॅरल्सचं अर्थात नाताळगीतांचं. आनंद देणाऱ्या या कॅरल्समध्ये परमेश्वराचा गौरव असतो, स्तुती असते.

येशू ख्रिस्ताच्या जन्मसमयी स्वर्गातील देवदूतांनी पहिले कॅरल गीत ‘ग्लोरिया इन एक्सचेल्सिस देवो’ म्हणजे नाताळगीत गायले, असे मानले जाते. त्याच कॅरल्सचे शब्द ‘परमईश्वराचा स्वर्गात गौरव’ या स्फूर्तिगीतातून प्रत्येक रविवारी व सणासुदीच्या काळातील मिस्साबळींमध्ये गायले जातात. ख्रिसमस कॅरल्स ही आनंदगीते असतात. या गीतांमध्ये परमेश्वराचा, प्रभूचा गौरव असतो, स्तुती असते. असे मानले जाते की युरोपात हजारो वर्षांपूर्वी हिवाळ्यात दगडांभोवती फेर धरून गाणी गायली जात. ती तेव्हाची ख्रिसमसची कॅरलची गाणी असं म्हणता येणार नाही. कारण कॅरल या शब्दाचा अर्थ कशासाठी तरी गोलाकारात नृत्य करणे असा होतो. कॅरोलियन या ग्रीक शब्दापासून कॅरल हा शब्द तयार झाला असं सांगितलं जातं. (अर्थात कॅरल शब्दाच्या उगमाबद्दल आणखीही व्युत्पत्ती सांगितल्या जातात.) पहिलं ज्ञात ख्रिसमस कॅरल चौथ्या शतकात रोममध्ये गायलं गेलं असंही सांगितलं जातं.

कालांतराने ख्रिसमस कॅरलची परंपरा ख्रिस्ती धर्माचा प्रसार युरोप खंडात मोठय़ा प्रमाणात झाला, साधारण तेव्हापासून सुरू झाल्याचे दिसते. वर्षांगणिक तिची लोकप्रियता जगात वाढत चालली आहे. अन्य धर्मीयांमध्येही नाताळ व त्यानुषंगाने सादर होणारे नाताळ-गोठे, गाणी, खाद्यपदार्थ यांचे आकर्षण असल्याचे दिसून येते.

२५ डिसेंबर या ख्रिस्तजन्माच्या आधीपासूनच जगभरातील ख्रिस्ती धर्मीय लोक, विशेषत: तरुण-तरुणी गावा-शहरात, रस्तोरस्ती फिरून ही नाताळगीते गाऊन ख्रिस्त जन्मोत्सव लवकरच येत आहे, नाताळ सण लवकरच येत आहे, याची वर्दी देत फिरतात. ‘शांतीची ही रजनी, सुखाची ही कहाणी’ हे नाताळगीत मराठीभाषक ख्रिस्ती धर्मीयांमध्ये प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. या गीताचीही पूर्वपीठिका मजेशीर त्याचबरोबर आध्यात्मिकता सूचित करणारी आहे. ख्रिस्तजन्माच्या पूर्व संध्याकाळी (ख्रिसमस ईव्ह) जर्मनीतील एका चर्चमध्ये ऑर्गन वाजवणारा वादक एकटाच ऑर्गन वाजवत होता. त्या वेळी जोरदार बर्फवृष्टी चालू होती. भयाण शांतता पसरली होती. वातावरणात एक प्रकारची खिन्नता, उदासी पसरली होती. त्यातच भर म्हणून की काय, त्या वादकाचा ऑर्गन अचानक बंद पडला व वाजेनासा झाला. काय करावं या विवंचनेत सारेच असताना तेथील बँडमास्टरला एक नवंच गाणं स्फुरलं. ‘सायलेंट नाइट, होली नाइट, ऑल इज काम , ऑल इज ब्राइट’. संगीताची साथ नसूनही तो वादक, गायक भक्तिमय सहवासात गुंगून गेले होते.

नाताळच्या दिवसांत गायलं जाणारं ‘जिंगल बेल, जिंगल बेल’ हे आणखी एक लोकप्रिय गीत आहे. हे गीत मूळ खालीलप्रमाणे आहे.

डॅशिंग थ्रू द स्नो

इन ए वन हॉर्स ओपन स्लेज (रथ)

ओव्हर द फिल्डस वी गो,

लाफिंग ऑल द वे

बेल्स ऑन बॉब टेल सिंग,

मेकिंग स्पिरिट्स ब्राइट

व्हॉट फन इट इज टू स्लाइड,

अँड सिंग

स्लेजिंग साँग टू नाइट

जिंगल बेल जिंगल बेल,

जिंगल ऑल द वे

ओह, व्हॉट फन इट इज टू स्लाइड

ऑन ए वन हॉर्स ओपन स्लीज

सांताक्लॉज इज कमिंग टू नाइट

रायडिंग ऑल द वे.

नाताळ काळात गायल्या जाणाऱ्या गीतांना फार महत्त्व आहे. सर्व भाषांमध्ये त्या त्या भाषांमध्ये ही गीतं रचली आहेत.

वसईत फादर ओनिल फरोज यांनी रचलेली बाळ जन्मले विश्व आनंदले, अवतीभवती झंकारले, भाकीत होते यशयाचे, इस्रायलच्या तारणाऱ्याचे, मी मरिया तव कथिते, उठा हो विश्ववासी उठा पहा अरुणोदय झाला, आळस हरुनी उठा, मध्यरात्रीच्या शांत  प्रहरी, उंच स्वरांनी दूत गाती, चंद्र शिंपीत होते चांदणे, पंख फुलवीत दूत आले, शुभ्र चांदणे फुलवीत उष:वेल मोहरली, दिस आहे सोनियाचा, शब्द देहरूप झाला, गव्हाणीत बाळ जन्माला अशी कॅरल (नाताळ गीते) लोकप्रिय आहेत. ही गीते गाऊन तरुण-तरुणी येशू जन्माला येत असल्याची वर्दी देतात. हल्लीच्या काळात यूटय़ूबवर कॅरलची गाणी मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत. जगात जिथे जिथे ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाला आहे, तिथे तिथे सगळीकडे ख्रिसमस मोठय़ा उत्साहात साजरा होतो. साहजिकच त्या सगळ्या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या स्थानिक भाषेत कॅरलची गाणी लिहिली गेली असून तेवढय़ा सगळ्या भाषांमध्ये ती गायली जातात.

फादर डॉ. रॉबर्ट डिसोजा या संदर्भात म्हणतात की, नाताळकाळात असे मानले जाते की देव आपला पत्ता बदलून पृथ्वीवर येतो, तो लोकांच्या उद्धारासाठी, मार्ग दाखवण्यासाठी. म्हणूनच माणसांनीही आपल्या दुष्कृत्यांचा, व्यसनीपणाचा मार्ग बदलून पत्ता बदलून आपलं घर, आपला शेजारी यांच्याकडे, त्यांच्या हिताकडे लक्ष केंद्रित करावे.
(हा लेख चार वर्षांपूर्वी लोकप्रभामध्ये प्रकाशित झाला होता, संदीप राऊत – response.lokprabha@expressindia.com)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2020 11:52 am

Web Title: merry christmas 2020 know everything about christmas carols sas 89
Next Stories
1 Merry Christmas 2020: गोष्ट सांताक्लॉजची…भेटवस्तू देणारा ‘सांता’ नेमका कोण?
2 या वर्षी २८ टक्क्यांनी महाग झालं सोनं; जाणून घ्या २०२१ मध्ये कसे असतील सोन्याचे दर
3 Explained: पाकिस्तानच्या अत्याचारांविरोधात आवाज उठवणाऱ्या करिमा बलोच कोण होत्या?
Just Now!
X