News Flash

समजून घ्या : पुण्यासहीत राज्यातील काही ठिकाणी मार्च महिन्यात का पडतोय पाऊस?

महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणातही पाऊस

फाइल फोटो

पुणे शहर आणि परिसरामध्ये आज (२२ मार्च २०२१) दुपारी साडेतीनच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पूर्वमोसमी पावसासंदर्भात यापूर्वीच इशारा देण्यात आला होता. मात्र मार्च महिन्यामध्ये अचानक पाऊस पडण्यामागे काय कारण आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर या पावसासंदर्भात हवामान खात्याने काही दिवसांपूर्वीच इशारा दिला होता. राज्यावर हवेची चक्रीय स्थिती निर्माण होऊन बाष्प येत असल्याने सध्या पूर्वमोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. पुढील चार दिवस सर्वच विभागांत कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता आहे, असं हवामान खात्यानं १८ मार्च रोजी स्पष्ट केलं होतं.

मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला होता मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला होता. पुणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये शनिवारी गारपीटीसहीत हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला.

सध्या संपूर्ण मध्य भारतावरच कमी दाबाचे पट्टे निर्माण होत आहेत. परिणामी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आदी राज्यांत पावसाला २२ मार्चपर्यंत अनुकूल स्थिती आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून मराठवाडा आणि लगतच्या भागामध्ये हवेची चक्रीय स्थिती निर्माण झालीय. त्यामुळे मागील काही दिवसांमध्ये राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अगदी तुरळत गारपीटही झाली.

मराठवाड्यामध्येही १९ ते २२ मार्च दरम्यान पाऊस राहणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं होतं. विदर्भात गुरुवारी (१८ मार्च रोजी) नागपूरमध्ये पावसाची नोंद झाली. त्यानंतरच मध्य महाराष्ट्रात १९ ते २१ मार्च या कालावधीत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली. तर कोकणात २१ आणि २२ मार्चला काही भागांत पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला.

मध्य भारत आणि दक्षिणेतील केरळ, कर्नाटकमध्ये २१ मार्चपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस राहणार असल्याचं सांगण्यात आलेलं. २२ मार्चपासून उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाला अनुकूल स्थिती असेल असंही हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे. हिमालयाच्या विभागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा वाढला असल्याने उन्हाचे चटके जाणवत असले, तरी मागील काही दिवसांपासून तापमानात घट जाणवत आहे. रात्रीचे किमान तापमान मात्र वाढल्याने रात्रीच्या उकाड्यात वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार १९ ते २२ मार्च या कालावधीत औरंगाबाद, जालना, परभणी, पुणे, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, बीडर्, हिंगोली, नागपूर, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, बुलढाणा, २१ आणि २२ मार्चला रायगड, रत्नागिरीर्, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आदी जिल्ह््यांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलीय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2021 4:46 pm

Web Title: reason for unseasonal rain in march scsg 91
Next Stories
1 समजून घ्या : सचिन वाझेंवर हत्येचा आरोप असणारं ख्वाजा युनूस प्रकरण आहे तरी काय?
2 समजून घ्या : ‘सॉफ्ट सिग्नल’ म्हणजे काय?; का आहे या नियमाला क्रिकेटमध्ये एवढं महत्व?
3 समजून घ्या : सात बँकांचे IFSC कोड १ एप्रिलपासून बदलणार; खातेदारांना काय करावं लागणार?
Just Now!
X