गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही कदाचित क्लबहाउस (Clubhouse)नावाच्या एका अ‍ॅपबाबत ऐकलं असेल.  काही दिवसांपासून या अ‍ॅपबाबत इतकी चर्चा आहे की, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क यांनीही हे अ‍ॅप डाउनलोड केलं आहे.

क्लब हाउस काय आहे?
क्लबहाउस एक आवाजावर आधारित सोशल मीडिया अ‍ॅप आहे. हे सामाजिक ऑडियो अ‍ॅप असून केवळ iPhone युजर्ससाठीच हे उपलब्ध आहे. मात्र आयफोन युजर्सनाही केवळ दुसऱ्या युजरकडून इन्व्हाइट आल्यानंतरच हे अ‍ॅप वापरता येतं. एक युजर फक्त दोन जणांनाच इन्व्हाइट करु शकतो.

काय होतं क्लब हाउसमध्ये ?
या अ‍ॅपमध्ये तुम्ही ‘रूम’मध्ये सहभागी होऊ शकतात. तिथे बातम्या, डिजिटल मार्केटिंग किंवा अन्य कोणत्याही विषयावर चर्चा करता येते. अगदी शेतकऱ्यांचं आंदोलन किंवा बिटकॉइनसारख्या विषयांवरही तिथे चर्चा होते. तुम्ही तिथे तुमचं मतही मांडू शकतात किंवा इतरांचे फक्त विचार ऐकायचे असतील तर तसाही पर्याय यामध्ये आहे.

ऑडिओ मोडमध्ये लाइव्ह चर्चा
या रुम्समध्ये एक लाइव्ह चर्चा ऑडिओ मोडमध्ये होते. ऑडिओ चॅट रुमचे मॉडरेटर व चॅटिंगमध्ये सहभागी झालेल्या अन्य सदस्यांची नावं तुम्ही बघू शकतात व त्यांना फॉलो करु शकतात, एखाद्या निवडक विषयाला फॉलो करण्याचा पर्यायही आहे. शिवाय एखाद्या विषयावर तुम्हाला मत मांडायचं असल्यास मॉडरेटरच्या परवानगीनंतर तुम्ही स्वतःचे विचार इतरांसमोर मांडू शकतात. तुम्ही ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटही क्लब हाउस अकाउंटसोबत लिंक करु शकतात. गेल्या वर्षी लाँच झालेलं हे अ‍ॅप सध्या केवळ आयफोन युजरसाठी आहे. अँड्रॉइड युजरसाठी अद्याप अ‍ॅप लाँच झालेलं नाही, पण आयफोन युजर्सकडून मिळालेला प्रतिसाद आणि अल्पावधीत वाढलेल्या लोकप्रियतेमुळे लवकरच अँड्रॉइड युजर्ससाठीही हे अ‍ॅप लाँच होण्याची शक्यता आहे.