06 March 2021

News Flash

समजून घ्या : अर्थव्यवस्था म्हणजे काय? आणि अर्थव्यवस्थेचे प्रमुख प्रकार कोणते?

जागतिक अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण दोन निकषांवर करतात

भारतीय अर्थव्यवस्थेला करोनाचा मोठा फटका असल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून (एनएसओ) जारी करण्यात आलेल्या आकडेवारीमधून समोर आलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीत एप्रिल ते जून २०२० या तिमाहीत तब्बल २३.९ टक्क्यांनी घट झाली आहे. सलग दोन तिमाहींमध्ये जीडीपीत घट झाल्याचे चित्र दिसत असून सध्या सुरु असणाऱ्या जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीतही ही घट कायम राहणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतच नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेला करोनाचा मोठा फटका बसल्याचे अर्थतज्ज्ञ सांगतात. मात्र अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि ती किती प्रकारची असते त्याचे फायदे तोटे काय आहेत हे अनेकांना ठाऊक नसते. याचवर टाकलेली नजर…

अर्थव्यवस्था म्हणजे काय?

अर्थव्यवस्थेची सर्वात लोकप्रिय व्याख्या ही रशियन अर्थतज्ज्ञ प्राध्यापक ग्रेगरी ग्रॉसमन यांनी दिली आहे. “देशातील व्यक्ती, कुटुंबे, उद्योगसंस्था, व्यवसाय संस्था यांच्या मार्फत उत्पादन, विभाजन, विनिमय व उपयोग या आर्थिक क्रिया पार पाडल्या जातात. देशातील विविध घटक आणि संस्थांना वळण लावण्यासाठी ज्या यंत्रणेचा वापर केला जातो तिला अर्थव्यवस्था असं म्हणतात,” अशी व्याख्या ग्रेगरी यांनी केली आहे.

समजून घ्या : >> GDP म्हणजे नेमकं काय? तो कसा मोजतात?, त्याचा सामान्याशी संबंध कसा?

तर अमेरिकन अर्थतज्ज्ञ प्रोफेसर रॉबर्ट लाऊकस यांच्या सांगण्यानुसार, “मानवी गरजा भवविताना उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करण्यासाठी केलेले समग्र आर्थिक व्यवहार म्हणजे अर्थव्यवस्था होय.”

अर्थव्यवस्थांचे प्रकार –

जागतिक अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण दोन निकषांवर करतात.

१) उत्पादक साधनसंपत्तीच्या मालकीनुसार

२) विकासाच्या अवस्थेनुसार

उत्पादक साधनसंपत्तीच्या मालकीनुसार याचे पुन्हा तीन प्रकारांत वर्गीकरण केले जाते.

अ) भांडवलशाही अर्थव्यवस्था

ब) समाजवादी अर्थव्यवस्था

क) मिश्र अर्थव्यवस्था

अ) भांडवलशाही अर्थव्यवस्था (Capitalistic Economy) – ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनांची साधने खासगी मालकीची असतात.

वैशिष्टये –
१) उत्पादक उपभोगाच्या मागणीनुसार वस्तूचा पुरवठा करतात.
२) ग्राहक सार्वभौम असतात, त्यांच्या पसंतीनुसारच उत्पादन केले जाते. थोडक्यात, उपभोक्ता बाजारपेठेत राजा असतो.
३) किंमत ठरविण्याची प्रक्रिया मुक्तपणे चालते म्हणजे ती सरकारी हस्तक्षेपापासून मुक्तअसते. म्हणून या अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था असेदेखील म्हणतात. (Laisser faire).
४) उत्पादन हे नफा मिळविण्याच्या हेतूने केले जाते.

दोष-
आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण झाल्याने गरिबी व श्रीमंतांची दरी वाढत असते. त्याप्रमाणे गरिबी, बेरोजगारी, पर्यावरण आदींचा विचार केला जात नाही.

ब) समाजवादी अर्थव्यवस्था (Socialist Economy) – ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने सरकारच्या म्हणजे सार्वजनिक मालकीची असतात, त्यांना समाजवादी अर्थव्यवस्था म्हणतात.

वैशिष्टये –
१) उत्पादनांची साधने सरकारी मालकीची असतात.
२) वस्तू आणि सेवांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी होत नाही. सर्व आर्थिक निर्णय सरकार घेते.
३) या व्यवस्थेत ग्राहक सार्वभौम ठरत नाही.

दोष- यात व्यक्तिस्वातंत्र्याचा लोप होतो. कधीकधी सरकारी नियंत्रणाचा अतिरेक होतो. कार्यक्षमता, उत्पादकता कमी होते.

क) मिश्र अर्थव्यवस्था (Mixed Economy)- ज्या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आणि खासगी अशी दोन्ही क्षेत्रे एकाच वेळी अस्तित्वात असतात, त्या अर्थव्यवस्थेस मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात.

वैशिष्टये –
१) खासगी मालमत्तेचा मर्यादित हक्क असतो.
२) काही उद्योगांची उभारणी सरकारी व खासगी स्तरावर केली जाते.
३) भांडवली आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचा दोष टाकून चांगल्या गुणांचा समन्वय या अर्थव्यवस्थेत करण्यात आला आहे.

विकासाच्या अवस्थेनुसार दोन भागांमध्ये अर्थव्यवस्थेचे वर्गिकरण करता येते.

विकसित अर्थव्यवस्था- ज्या अर्थव्यवस्थेत दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रमाण मोठे असते. मोठय़ा प्रमाणावर औद्योगीकरण, शहरीकरण झालेले असते. त्याचप्रमाणे साक्षरतेचे प्रमाण जास्त असते. जन्मदर व मृत्युदराचे प्रमाण कमी असते. उदा. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया इ.

विकसनशील अर्थव्यवस्था- ज्या अर्थव्यवस्थेत दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रमाण तुलनेने कमी असते. साक्षरतेचे प्रमाण कमी असते. मात्र जी अर्थव्यवस्था आपल्या समस्या दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते, त्या अर्थव्यवस्थेला विकसनशील अर्थव्यवस्था असे म्हणतात. उदा., भारत, श्रीलंका, आफ्रिका व दक्षिण अमेरिकेतील काही देश.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 12:06 pm

Web Title: what is economy and its types scsg 91
Next Stories
1 समजून घ्या : राष्ट्रीय दुखवटा म्हणजे काय?, तो कोणाकडून आणि कधी जाहीर केला जातो?
2 समजून घ्या : GDP म्हणजे नेमकं काय? तो कसा मोजतात?, त्याचा सामान्याशी संबंध कसा?
3 Taxpayers Charter आजपासून देशात लागू; जाणून घ्या याचा नक्की काय फायदा होणार
Just Now!
X