News Flash

समजून घ्या : पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी कोण लिहितं भाषण?; त्यासाठी किती पैसे दिले जातात?

पंतप्रधान कार्यालयानेच यासंदर्भातील माहिती दिलीय

(मूळ फोटो पीटीआयवरुन साभार)

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या भाषणांसाठीही ओळखले जातात. ‘मन की बात’ असो किंवा इतर काही कार्यक्रम मोदी आपल्या भाषणामधून प्रभाव पाडताना दिसतात. मोदी जवळजवळ कोणत्या ना कोणत्या कारणासाठी रोज भाषण देत असतात असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. निवडणूक कालावधीमध्ये मोदींच्या प्रचारसभांना केवळ भाषण ऐकण्यासाठी गर्दी करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मोदी आपल्या खास शैलीमध्ये भाषणामध्ये नावीन्यपूर्ण शब्द आणि वाक्य रचना वापरुन विरोधकांवर निशाणा साधताना दिसतात. मोदींची फटकेबाजी ऐकून अनेकांना ही भाषणं नक्की कोण लिहितं असा प्रश्न पडतो. मोदी स्वत: ही भाषणं लिहितात का की त्यांना ती कोणी तयार करुन देतं? हे भाषण लिहिणाऱ्या टीममध्ये नक्की कोणाचा समावेश असतो? भाषण लिहिणाऱ्यांना किती पैसे दिले जातात?, असे शेकडो प्रश्न मोदींच्या भाषणासंदर्भात उपस्थित केले जातात.

मात्र आता माहिती अधिकार कायद्याअंतर्गत पंतप्रधान कार्यालयाने मोदींच्या भाषणांसंदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तर दिली आहेत. मोदींच्या भाषणांसंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने नक्की काय माहिती दिलीय जाणून घेऊयात.

मोदीच देतात अंतिम स्वरुप…

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणासंदर्भातील माहिती मिळवण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडे विचारणार करणारी माहिती अधिकार याचिका दाखल करण्यात आली होती. या माहिती अधिकार अर्जाला उत्तर देताना पीएमओ म्हणजेच पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधान मोदींच त्यांच्या भाषणाला अंतिम स्वरुप देतात असं स्पष्ट केलं आङे. ज्या पद्धतीच्या कार्यक्रमासाठी भाषण द्यायंच आहे त्यानुसार पंतप्रधान वेगवेगळ्या व्यक्तींना, अधिकाऱ्यांना, संघटना, संस्थांकडून भाषणासाठी माहिती घेतली जाते. या माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या भाषणाचे अंतिम स्वरुप मोदींची निश्चित करतात.

या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत

पंतप्रधानांची भाषणं लिहिण्यासाठी एखादी टीम आहे का?, असेल तर त्यामध्ये किती सदस्य आहेत?, त्यांना किती पैसे दिले जातात? असे प्रश्नही माहिती अधिकार अर्जामध्ये विचारण्यात आलेले. मात्र या प्रश्नांना पंतप्रधान कार्यालयाने उत्तर दिलं नाही.

भाजपा मोदी लाटेवर स्वार…

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ साली लोकसभा निवडणूक लढलेल्या भाजपाला केंद्रात सत्ता मिळवण्यात यश आलं होतं. भाजपाने पंतप्रधान म्हणून मोदींचा प्रचार करत या निवडणुकीमध्ये विजय मिळवला होता. या निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदींनी शेकडो सभा घेतल्या होत्या. त्यांच्या आक्रामक प्रचाराच्या जोरावर भाजपाने काँग्रेसच्या हातून सत्ता मिळवण्यात यश मिळवलं. मोदींनी एवढ्या मोठ्या प्रमाणात सभा आणि भाषणांमधून प्रचार केला की अब की बार मोदी सरकार हे प्रचाराचं वाक्य देशातील घराघरात पोहचलं.

मोदींचे भाषण असतं खास

भाषण देण्याची शैली आणि त्यामध्ये वापरले जाणारे शब्द या दोन गोष्टी मोदींचं भाषण अनेक अर्थांनी खास बनवतात. मोदी आपल्या भाषणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात अशं अनेकजण सांगतात. विकासाबरोबरच इतर मुद्द्यांवरही मोदी स्पष्टपणे आणि प्रभावी पद्धतीने आपलं म्हणणं मांडतात की ते पाहून त्यांनी भाषणासाठी किती तयारी केली असेल याचा अंदाज बांधता येतो. मोदी इतर नेत्यांप्रमाणे लिहिलेलं भाषण वाचून दाखवत नाहीत. मोदी आपल्या भाषेने आणि शब्दांनी समोरच्या श्रोत्याला आपलसं करुन घेतात.

हे पंतप्रधान स्वत:चं भाषण स्वत:च तयार करायचे…

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाला नेहरु यांच्यापासून पंतप्रधानांचे भाषण लिहिताना वेगवेगळ्या खात्यांकडून माहिती घेण्याची परंपरा आहे. पंतप्रधानांच्या भाषणाला पक्ष, मंत्री, विषयातील जाणकार, पंतप्रधानांची टीम माहिती एकत्र करुन देते आणि त्या भाषणाला अंतिम स्वरुप दिलं जातं. जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी हे सर्व नेते स्वत:चं भाषणं स्वत: तयार करायचे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 10:45 am

Web Title: who writes pm modi speeches this is what pmo says in rti reply scsg 91
Next Stories
1 ज्येष्ठांचे करोना लसीकरण संभ्रम काय?
2 समजून घ्या : अनेक बँकांमध्ये वापरात नसणारी Saving Accounts असल्यास बसू शकतो आर्थिक फटका
3 समजून घ्या : जमाल खाशोगी प्रकरण आहेत तरी काय?
Just Now!
X