News Flash

Yaas Cyclone : कसा असेल ‘यास’ चक्रीवादळाचा प्रवास? कधी आणि कुठे धडकणार? जाणून घ्या!

हवामान विभागानं यास चक्रीवादळाचा समावेश अतीतीव्र चक्रीवादळ श्रेणीत केला आहे.

देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर अवघ्या काही दिवसांपूर्वीच अरबी समुद्रात गेल्या २ दशकांत आलेलं सर्वात मोठं चक्रीवादळ तौते धडकलं. त्यानंतर अवघ्या आठवड्याभरातच पूर्व किनारपट्टीवर Yaas Cyclone घोंघावू लागलं आहे. या चक्रीवादळाचा तडाखा आसाममधील चार जिल्ह्यांना आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरील काही भागांना बसण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी भारतीय हवामान विभागानं बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र झाला, तरच यास चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली होती. पण आता हे चक्रीवादळ येणार असल्याचं निश्चित झालं आहे. केंद्र सरकारसोबतच पश्चिम बंगाल आणि आसाम राज्य सरकारांनीही या वादळाचा सामना करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासोबतच एनडीआरएफ, कोस्ट गार्डसोबतच इतर सर्व बचाव यंत्रणा सज्ज झाल्या आहेत!

सध्या ‘यास’ चक्रीवादळाची परिस्थिती काय?

भारतीय हवामान विभागानं यासंदर्भात ट्विटरवरून सविस्तर माहिती दिली आहे. सध्या बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान निकोबार बेटांच्या वर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. जसजशी वेळ जात आहे, तसतसा हा पट्टा अधिकाधिक तीव्र होत आहे. चक्रीवादळासाठी आवश्यक असणाऱ्या वर्तुळाकार वाहणाऱ्या वाऱ्यांची परिस्थिती बंगालच्या उपसागरात पूर्वमध्य समुद्रात निर्माण झाली आहे. पुढच्या काही तासांमध्ये ती कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये केंद्रीत होईल.

 

पुढच्या २४ तासांत होणार चक्रीवादळात रुपांतर!

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली ही परिस्थिती पुढच्या २४ तासांमध्ये चक्रीवादळात रुपांतरीत होण्यासाठी अनुकूल अशी झाली आहे. हे वारे उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने सरकल्यानंतर २४ मे पर्यंत म्हणजेच पुढच्या २४ तासांमध्ये त्यांचं चक्रीवादळात रुपांतर होईल. आणि त्यापुढच्या २४ तासांत म्हणजे २५ मेपर्यंत त्याचं रुपांतर अतीतीव्र चक्रीवादळात होईल. पुढे पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या दिशेने जाताना वादळाची तीव्रता वाढत जाईल.

२६ मे रोजी सकाळी किनारपट्टीवर धडकणार!

२६ मे रोजीच्या सकाळी यास चक्रीवादळ पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा आणि बांगलादेशच्या किनारपट्टीजवळ पोहोचेल. या चक्रीवादळाचा वेग इतका असेल की ते संध्याकाळपर्यंत पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा आणि बांगलादेशचा किनारपट्टीचा भाग ओलांडून गेले असेल. किनारपट्टीवर धडकल्यानंतर त्याची तीव्रता काही प्रमाणात कमी होईल.

 

एनडीआरएफ, कोस्ट गार्ड सज्ज!

यास चक्रीवादळासाठी आता एनडीआरएफ आणि इतर बचावकार्य करणाऱ्या यंत्रणांनी कंबर कसली आहे. “भारतीय हवामान विभागानं यास चक्रीवादळाचा समावेश अतीतीव्र चक्रीवादळ श्रेणीमध्ये केला आहे. एनडीआरएफनं संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी ७५ तुकड्या तैनात केल्या आहेत. यापैकी ५९ तुकड्या पश्चिम बंगाल आणि ओडिशामधल्या संभाव्य तडाखा बसणाऱ्या क्षेत्रात पाठवल्या जातील, तर उर्वरीत १६ तुकड्या गरज पडेल त्या ठिकाणी पाठवण्यासाठी सज्ज ठेवल्या जातील”, अशी माहिती एनडीआरएफचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी दिली आहे.

 

पंतप्रधानांनी घेतला परिस्थितीचा आढावा!

दरम्यान, यास चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सर्व व्यवस्थेचा आढावा रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या बैठकीत चक्रीवादळाचा सामना करण्याविषयीच्या उपाययोजनांची माहिती पंतप्रधानांना दिली गेली. यास चक्रीवादळाचा तडाखा बसेल, तेव्हा आरोग्य सेवा विस्कळीत होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत. त्यासोबतच, तडाखा बसेल, त्या भागातला वीजपुरवठा आणि वाहतूक व्यवस्था लागलीच पूर्ववत करण्याचे देखील निर्देश देण्यात आले आहेत.

 

ममता बॅनर्जी स्वत: कंट्रोल रूममध्ये बसणार!

पश्चिम बंगालच्या दिशेने यास चक्रीवादळ घोंघावत येत असताना राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील कंबर कसली असून या काळात त्या स्वत: नबाना येथील नियंत्रण कक्षात उपस्थित राहून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवणार आहेत.

अंदमान निकोबार बेटावर मान्सून सरी; केरळमध्ये वेळेआधी पोहोचणार मान्सून

‘तौते’ नाव म्यानमारने दिलं, तर ‘यास’ हे नाव…

भारतीय उपखंडात निर्माण होणाऱ्या वादळांना या भागातील देशांकडून नावं दिली जातात. पश्चिम किनारपट्टीवर आलेल्या वादळाळा म्यानमारनं ‘तौते’ हे नाव दिलं होतं. चक्रीवादळाला दिलेलं हे नाव एका सरड्याच्या प्रजातीचं आहे. प्रचंड आवाज करणाऱ्या सरड्याची प्रजाती GECKO वरून हे नाव देण्यात आलं आहे. सरड्याला तौत्के म्हटलं जातं, ज्याचा उच्चार तौते असा होतो. त्याचप्रमाणे, यापुढे जे वादळ निर्माण होईल, त्याला ‘यास’ असं नाव दिलं जाईल. ओमेन देशाने हे नाव दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 4:49 pm

Web Title: yaas cyclone track live position very severe cyclone by imd to hit west bengal north odisha pmw 88
टॅग : Crime News
Next Stories
1 Explained: ‘साइटोकिन स्टोम’ म्हणजे काय?; तरुण रुग्णांचा मृत्यू होण्यासाठी हाच फॅक्टर कारणीभूत असतो का?
2 Explained : २८.३९ लाख कोटी… करोना कालावधीमध्ये भारतीयांकडे नोटबंदीपेक्षाही अधिक कॅश, जाणून घ्या कारणं
3 Explained: संसर्गाची लाट म्हणजे काय? ती कशी येते? तिसरी लाट टाळता येणं शक्य आहे का?
Just Now!
X