करोना विषाणूच्या कचाट्यातून अजून राज्य सावरतंय न सावरतंय तोवरच आता झिका या नव्या विषाणूचं संकटही राज्यावर घोंगावू लागलं आहे. पुणे जिल्ह्यातल्या एका गावात या विषाणूचा एक रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा तात्काळ कामाला लागली आहे.

झिका विषाणू जीव घेणा नसला तरी तरी महिलांना त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावाला घाबरुन न जाता जास्तीत जास्त खबरदारी घेणं आवश्यक आहे. पण त्या आधी हा आजार आणि त्याविषयी काही प्राथमिक माहिती जाणून घेणं गरजेचं आहे.

काय आहे झिका विषाणू?

या विषाणूमुळे होणारा आजार हा एडिस इजिप्ती प्रजातीच्या डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार असून या आजारात ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे ताप, अंगावर पुरळ उठणे अशी लक्षणे आढळतात. झिका आणि इतर कीटकजन्य आजारासाठी सर्वेक्षण सक्षम करत असतानाच करोना सर्वेक्षण आणि लसीकरण याकडे दुर्लक्ष होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना आरोग्य विभागाने निर्देश दिले आहेत.

हेही वाचा – पुरंदर तालुक्यात आढळला महाराष्ट्रातील पहिला झिका विषाणूचा रुग्ण

या विषाणूपासून वाचण्यासाठी काय काळजी घेता येईल?

  • घरात डास होऊ देऊ नका, घरातील स्वच्छतेची काळजी घ्या. मच्छरदानीचा वापर करा.
  • ज्या ठिकाणी हा व्हायरस पसरला आहे. तेथून प्रवास करुन येणाऱ्या महिलांनी किमान 8 आठवडे गर्भधारणा होऊ देऊ नये.
  • घरामध्ये व परिसरात साठवलेले पाणी जास्त काळ ठेवू नये व उघडे ठेवू नये
  • हा आजार संसर्गजन्य नाही.
  • या विषाणूचा धोका महिलांना जास्त आहे..
  • घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावा.
  • झिका विषाणू असलेल्या व्यक्तीला डास चावून दुसऱ्या व्यक्तीला चावला तर त्याला झिकाची लागण होते.
  • प्रवास करुन आल्यावर दोन दिवस ताप राहिल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • तुम्हाला डायबेटिस, उच्च रक्तदाब किंवा अन्य काही समस्या असतील तर प्रवास करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

उपचार

झिका विषाणूच्या संसर्गासाठी कोणतेही विशिष्ट उपचार नाहीत. उदाहरणार्थ, डॉक्टर ताप आणि डोकेदुखीसाठी औषधाची शिफारस करु शकतात. म्हणजेच आपल्याला असलेल्या लक्षणांवर उपचार केला जातो.