1000-Year-Old Skeleton Preserved for 70 Years Could Reveal Secrets of Ancient Varanasi: वाराणसी ही केवळ धार्मिक श्रद्धेची नगरी नाही, तर हजारो वर्षांच्या मानवी वस्तीचे थर आपल्या पोटात जपून ठेवलेले एक जिवंत पुरातत्त्वीय क्षेत्र आहे. या पार्श्वभूमीवर राजघाट येथे १९५७ साली उत्खननादरम्यान सापडलेला आणि बनारस हिंदू विद्यापीठात जवळपास सत्तर वर्षे जतन करून ठेवलेल्या मानवी सांगाड्याला आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अंदाजे एक हजार वर्षे जुना मानला जाणारा हा सांगाडा प्राचीन डीएनए, रेडिओकार्बन डेटिंग आणि स्थिर समस्थानिकांच्या विश्लेषणासाठी तपासला जात आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यास केवळ एका व्यक्तीचीच ओळख नाही तर मध्य गंगा खोऱ्यातील लोकांचे स्थलांतर, वंशसंबंध, आहार आणि जीवनपद्धती याविषयी नवे पुरावे मिळू शकतात.

राजघाटचे पुरातत्त्वीय महत्त्व

राजघाट वाराणसीच्या उत्तर-पूर्व भागात गंगा आणि वरुणा नद्यांच्या परिसरात वसलेले आहे. येथील मोठ्या पुरातत्त्वीय टेकाडांत अनेक शतकांच्या मानवी वस्तीचे थर आढळले आहेत. त्यामुळे वाराणसीच्या विकासाचा कालानुक्रमिक मागोवा घेता येतो. राजघाट परिसराकडे आधुनिक पुरातत्त्वशास्त्राचे लक्ष विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात गेले. पुढे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि बनारस हिंदू विद्यापीठाशी संबंधित संशोधकांनी येथे विविध टप्प्यांत उत्खनने केली. विशेषतः १९५०-६० च्या दशकातील उत्खननांमुळे राजघाटची सांस्कृतिक मालिका स्पष्ट झाली. इथे मातीची भांडी, नॉर्दर्न ब्लॅक पॉलिश वेअर (NBPW), लाल मृद भांडी, टेराकोटाच्या मानवी व प्राण्यांच्या मूर्ती, नाणी, मुद्रा व सीलिंग्ज, हाडांपासून तयार केलेल्या वस्तू आणि वास्तूंचे अवशेष सापडले आहेत. इतर काही पुरातत्वीय सर्वेक्षणात शहराच्या संरक्षणासाठी उभारलेल्या मातीच्या तटबंदीचे पुरावेही नोंदविले आहेत. या वस्तूंवरून येथील वस्ती ही केवळ ग्रामीण वस्ती नव्हती, तर उत्पादन, देवाणघेवाण आणि प्रशासकीय व्यवहार असलेले विकसित नागरी केंद्र होते असे दिसते.

राजघाट हे प्राचीन वाराणसीच्या इतिहासाचा पुरातत्त्वीय आधार देणारे महत्त्वाचे स्थळ आहे. धार्मिक आणि साहित्यिक ग्रंथांमध्ये काशीच्या प्राचीनत्वाचा उल्लेख आढळतो; तर राजघाटमधील उत्खननातून मिळालेल्या पुराव्यांमुळे या प्राचीन वस्तीचे भौतिक अस्तित्व स्पष्ट होते. त्यामुळे ग्रंथांतील काशी आणि पुरातत्त्वीय वाराणसी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून राजघाटकडे पाहिले जाते. येथे सापडलेले पुरावे गंगा खोऱ्यातील ‘दुसऱ्या नागरीकरणा’ची प्रक्रिया समजून घेण्यासाठी महत्त्वाचे आहेत. गंगा आणि वरुणा नद्यांच्या जवळचे त्याचे स्थान व्यापारासाठी अनुकूल होते. त्यामुळे प्राचीन काशी हे केवळ धार्मिक केंद्र नव्हते, तर व्यापार, उत्पादन आणि आर्थिक व्यवहारांचेही महत्त्वाचे केंद्र होते.

उत्खननात सापडलेल्या टेराकोटा मूर्ती, खेळणी, हाडांपासून तयार केलेल्या वस्तू आणि विविध प्रकारची भांडी तत्कालीन लोकांच्या दैनंदिन आणि सामाजिक जीवनाची माहिती देतात. मौर्य, शुंग, कुषाण, गुप्त आणि नंतरच्या काळातील विविध सांस्कृतिक स्तरांमुळे वाराणसीतील दीर्घकालीन राजकीय आणि सांस्कृतिक बदलांचाही मागोवा घेता येतो.

एका मानवी सांगाड्याला एवढे महत्त्व का?

पुरातत्त्वशास्त्रात मातीची भांडी, नाणी, इमारती, शिलालेख आणि वस्तू या एखाद्या समाजाच्या बाह्य जीवनाची माहिती देतात. मात्र मानवी सांगाडा त्या समाजातील व्यक्तीच्या शरीरात नोंदवलेला इतिहास सांगू शकतो. हाडे आणि दातांमधून वय, लिंग, काही आजार, पोषण, आहार आणि काही वेळा स्थलांतराचे संकेत मिळतात. त्यात प्राचीन डीएनए सुरक्षित असेल, तर व्यक्तीचा आनुवंशिक वंश आणि इतर प्राचीन लोकसमूहांशी असलेले जैविक नाते तपासता येते. यामुळे राजघाटावर सापडलेला हा सांगाडा हा केवळ संग्रहालयीन अवशेष राहत नाही; तो एका ऐतिहासिक व्यक्तीचे जैविक संग्रहालय ठरू शकतो.

अचूक कालमापन आवश्यक

या सांगाड्याचे वय सुमारे एक हजार वर्षे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला, तरी वैज्ञानिकदृष्ट्या तो अंतिम निष्कर्ष नाही. त्यासाठी रेडिओकार्बन डेटिंग महत्त्वाचे ठरेल. कार्बन-14 च्या प्रमाणावरून व्यक्तीचा मृत्यू कोणत्या कालखंडात झाला असावा, याचा अधिक अचूक अंदाज मिळू शकतो. हा कालखंड निश्चित झाला तर त्याची सांगड वाराणसीच्या तत्कालीन राजकीय, आर्थिक आणि धार्मिक परिस्थितीशी घालता येईल. उदाहरणार्थ, सांगाडा कोणत्या शतकातील आहे हे स्पष्ट झाल्यावर त्या काळातील राजसत्ता, व्यापारव्यवस्था, नागरी विस्तार आणि धार्मिक केंद्रांच्या वाढीशी त्याचा संदर्भ जोडता येईल. म्हणूनच या संशोधनाचा पहिला महत्त्वाचा प्रश्न “तो कोण होता?” हा नसून “तो नेमका केव्हा जगला?” हा आहे.

DNA

संशोधक माइटोकॉन्ड्रियल DNA तपासण्याचा प्रयत्न करणार आहेत. तो प्रामुख्याने मातृरेषेतून पुढे जात असल्यामुळे त्या व्यक्तीच्या मातृवंशाशी संबंधित आनुवंशिक संकेत मिळू शकतात. सांगाडा पुरुषाचा असल्याची पुष्टी झाल्यास Y-गुणसूत्राच्या आधारे पितृरेषेची माहिती मिळण्याचीही शक्यता आहे. परंतु येथे एक महत्त्वाची वैज्ञानिक मर्यादा समजून घेणे आवश्यक आहे. एखादा आनुवंशिक वंशवृक्ष सापडले म्हणजे त्या व्यक्तीची आधुनिक जात, भाषा, धार्मिक ओळख किंवा सामाजिक समुदाय थेट ठरवता येत नाही. आजच्या सामाजिक ओळखी शेकडो वर्षांच्या राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रक्रियांमधून तयार झालेल्या आहेत. त्यामुळे DNA निष्कर्षांचा उपयोग इतिहास समजण्यासाठी करणे योग्य असले, तरी त्यातून आजच्या ओळखींबाबत अतिसुलभ किंवा राजकीय निष्कर्ष काढणे वैज्ञानिकदृष्ट्या धोकादायक ठरू शकते.

राखीगढीशी तुलना का महत्त्वाची?

दक्षिण आशियाच्या लोकसंख्या-इतिहासात प्राचीन DNA संशोधनाने गेल्या काही वर्षांत मोठे बदल घडवले आहेत. राखीगढी येथील हडप्पाकालीन व्यक्तीच्या जीनोमच्या अभ्यासामुळे सिंधू संस्कृतीतील लोक आणि नंतरच्या दक्षिण आशियाई लोकसंख्यांमधील संबंधांविषयी महत्त्वाचे संकेत मिळाले. नरसिंह आणि सहकाऱ्यांच्या व्यापक संशोधनाने दक्षिण व मध्य आशियातील प्राचीन लोकसंख्यांमध्ये अनेक कालखंडांत परस्पर संमिश्रण झाल्याचे दाखवले. त्यामुळे राजघाटच्या व्यक्तीचा जीनोम पुरेशा गुणवत्तेने उपलब्ध झाला, तर तो या विस्तृत आनुवंशिक नकाशात कुठे बसतो हे तपासता येईल. मात्र एका व्यक्तीचा DNA संपूर्ण वाराणसीच्या तत्कालीन लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतो, असे मानता येणार नाही. इतिहास लिहिण्यासाठी अनेक व्यक्ती, वेगवेगळे कालखंड आणि विविध स्थळांवरील नमुने आवश्यक असतात.

आहारातून उलगडू शकते तत्कालीन अर्थव्यवस्था

या संशोधनातील दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे स्थिर समस्थानिक विश्लेषण. मानवी हाडे आणि दातांमधील कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन किंवा स्ट्रॉन्शियमसारख्या समस्थानिकांवरून आहार आणि काही परिस्थितींमध्ये भौगोलिक स्थलांतराचा अंदाज घेता येतो. व्यक्तीच्या आहारात तांदूळ, गहू, बाजरीसारख्या पिकांचे प्रमाण काय होते, प्राणीजन्य प्रथिनांचा वापर किती होता किंवा स्थानिक पर्यावरणाशी त्याचे संबंध कसे होते यासंबंधी संकेत मिळू शकतात. यामुळे इतिहास केवळ राजे, मंदिरे आणि युद्धांच्या चौकटीत न राहता सामान्य माणसाच्या ताटापर्यंत पोहोचतो. त्या काळातील कृषीव्यवस्था, अन्नपुरवठा आणि सामाजिक जीवनाच्या पुनर्रचनेत अशा अभ्यासाचे मोठे महत्त्व असते.

सत्तर वर्षे जतन होणे हेही संशोधनाचे यश

या प्रकरणातील आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे सांगाड्यावर रासायनिक संरक्षकांचा वापर झाला नसल्याची माहिती महत्त्वाची ठरते. जुन्या काळात अनेक सांगाड्यांना जतन करण्यासाठी वापरलेल्या पदार्थांमुळे DNA किंवा रासायनिक विश्लेषणात अडथळा निर्माण होऊ शकतो. राजघाटचा नमुना तुलनेने कमी हस्तक्षेपाने जतन झाला असेल, तर आधुनिक तंत्रज्ञानासाठी ही मोठी संधी आहे. त्याच वेळी नमुना सत्तर वर्षे पेटीत ठेवला गेल्यामुळे आधुनिक मानवी DNA, धूळ, तापमानातील बदल किंवा हाताळणीमुळे झालेल्या संभाव्य प्रदूषणाचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. म्हणूनच प्राचीन DNA प्रयोगशाळांमध्ये अतिशय कठोर स्वच्छता आणि प्रमाणीकरणाची पद्धत वापरली जाते.

राजघाट : वाराणसीच्या नागरी इतिहासाची गुरूकिल्ली

राजघाटचे महत्त्व एका सांगाड्यापुरते मर्यादित नाही. गंगा आणि वरुणा नद्यांच्या परिसरात असलेले हे क्षेत्र वाराणसीच्या प्राचीन नागरी विकासाचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. विसाव्या शतकाच्या मध्यापासून झालेल्या उत्खननांत विविध सांस्कृतिक कालखंडांचे अवशेष आढळले आहेत. A. K. Narain आणि T. N. Roy यांच्या राजघाट उत्खननावरील कार्याने मृद्भांडांच्या आधारे येथील सांस्कृतिक अनुक्रम समजण्यास मदत केली. पुढील अभ्यासांनीही मध्य गंगा खोऱ्यातील नागरीकरण, व्यापार आणि सांस्कृतिक बदल समजण्यासाठी राजघाटचे महत्त्व अधोरेखित केले आहे. यामुळे नवीन सांगाड्याच्या-अभ्यासाची खरी ताकद तेव्हाच दिसून येईल, जेव्हा DNA आणि समस्थानिकांचे निष्कर्ष त्या व्यक्तीच्या उत्खनन-स्तरातील मातीची भांडी, वास्तू, इतर वस्तू आणि संपूर्ण पुरातत्त्वीय संदर्भाशी जोडले जातील.