Super El Nino 2026: Is the World Facing an 1877-Like Climate Catastrophe?: एल निनो ही संकल्पना आता अपरिचित राहिलेली नाही. वातावरणातील प्रचंड उष्मा त्याचाच परिणाम आहे, हे इथे वेगळं सांगायला नको. एल निनो म्हणजे मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा अधिक वाढण्याची प्रक्रिया. या वाढलेल्या तापमानाचा थेट परिणाम पृथ्वीवरील हवेच्या दाबावर आणि प्रवाहावर होतो. एल निनोचा भारतीय उपखंडातील मान्सूनच्या वार्‍यावर परिणाम होतो. त्यामुळे पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटते. ही एक नैसर्गिक हवामानविषयक घटना असली, तरी ती दर काही वर्षांनी ठराविक अंतराने घडत असते. मात्र, सध्या शास्त्रज्ञांनी वर्तवलेली भीती अधिक चिंताजनक आहे.

यंदा सुपर एल निनो

यंदा केवळ एल निनोच नाही, तर अत्यंत तीव्र स्वरूपाचा ‘सुपर एल निनो’ निर्माण होण्याची शक्यता आहे. इतिहासाकडे नजर टाकल्यास या संकटाची भीषणता स्पष्ट होते. यापूर्वी १८७७ साली अशाच एका महाविनाशकारी ‘सुपर एल निनो’चा जगाला सामना करावा लागला होता. त्याकाळी उद्भवलेला भीषण दुष्काळ आणि हवामानातील टोकाच्या तीव्र बदलांमुळे जगभरात कोट्यवधी लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. यंदाची परिस्थिती तशीच राहिल्यास त्याचे गंभीर परिणाम जागतिक अर्थव्यवस्था आणि अन्नसुरक्षेवर होऊ शकतात, असे मत तज्ज्ञ व्यक्त करतात.

एल निनो

एल निनो हा ‘एल निनो-सदर्न ऑसिलेशन’ (ENSO) नावाच्या एका विशाल जागतिक हवामान प्रणालीचा मुख्य भाग आहे. या चक्रात ‘एल निनो’ आणि ‘ला निना’ या दोन परस्परविरोधी स्थितींचा समावेश होतो. ‘एल निनो’ या शब्दाची व्युत्पत्ती १९ व्या शतकात पेरूत झाली. स्पॅनिश भाषेत याचा अर्थ ‘लहान मुलगा’ असा होतो; विशेषतः कॅपिटल अक्षरात (El Niño) लिहिल्यास त्याचा संदर्भ ‘ख्रिस्त बालक’ असा घेतला जातो. याउलट, या प्रणालीतील दुसऱ्या स्थितीला ‘ला निना’ (लहान मुलगी) असे म्हटले जाते.

एल निनो विरुद्ध ला निना

  • एल निनो: ही घटना साधारणपणे दर दोन वर्षांनी एकदा घडते आणि सुमारे एक वर्ष टिकते. यात प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील पाण्याचे तापमान वाढते.
  • ला निना: ही घटना एल निनोच्या अगदी उलट असते. यात पूर्व प्रशांत महासागराचे पाणी गरजेपेक्षा जास्त थंड होते. ही स्थिती एल निनोच्या तुलनेत अधिक वारंवार उद्भवते.

भारतावर होणारा परिणाम

भारतासाठी एल निनो हा नेहमीच चिंतेचा विषय ठरला आहे. ऐतिहासिक आकडेवारीनुसार, एल निनोच्या वर्षांत देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो. यामुळे अनेकदा दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. शेतीपिकांचे मोठे नुकसान होते. अन्नधान्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे त्यांच्या निर्यातीवर निर्बंध घालावे लागतात.

Super El Nino environmental effect
सुपर एल निनो (Image- Gemini)

काय आहे ‘सुपर’ एल निनो?

  • जेव्हा ही नैसर्गिक घटना अत्यंत रौद्र रूप धारण करते, तेव्हा तिला ‘सुपर एल निनो’ म्हटले जाते. हवामानतज्ज्ञ मॅथ्यू सिटल सांगतात, समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान एरवीच्या सामान्य तापमानापेक्षा किमान २ अंश सेल्सिअसने वाढल्यास ‘सुपर एल निनो’ची स्थिती निर्माण होते. ही घटना अत्यंत दुर्मीळ असून, सुमारे १४९ वर्षांपूर्वी अशाच एका महाविनाशकारी ‘सुपर एल निनो’ची नोंद झाली होती.

१८७७-१८७८ चे ‘सुपर एल निनो’: मानवी इतिहासातील एक महाविनाशकारी आपत्ती

नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशनने (NOAA) दिलेल्या माहितीनुसार १८७७ ते १८७८ या काळात जगाने सर्वात भयंकर ‘सुपर एल निनो’चा अनुभव घेतला होता.

‘महादुष्काळ’ आणि मृत्यूचे तांडव

या सुपर एल निनोमुळे जागतिक हवामान चक्र पूर्णपणे विस्कळीत झाले होते आणि जगभरात ‘ग्रेट ड्रॉट’ म्हणजेच महादुष्काळाची भीषण लाट आली. ‘द वीक’ने दिलेल्या माहितीनुसार या आपत्तीत उपासमार आणि आजारांमुळे किमान ५ कोटी लोकांनी आपले प्राण गमावले. हा आकडा त्या काळातील जगाच्या एकूण लोकसंख्येच्या तब्बल ३ ते ४ टक्के इतका प्रचंड होता.

देशनिहाय भीषणता

अमेरिकन मेटरोलॉजिकल सोसायटीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, या संकटाचा सर्वाधिक फटका आशिया आणि दक्षिण अमेरिकेला बसला:

  • भारत: सुमारे १.२२ कोटी ते २.९३ कोटी मृत्यू.
  • चीन: १.९५ कोटी ते ३ कोटी मृत्यू.
  • ब्राझील: सुमारे २० लाख मृत्यू.

इजिप्तसारख्या देशांनाही या भीषणतेचा सामना करावा लागला. दुष्काळामुळे निर्माण झालेल्या अन्नटंचाईने लोकांची प्रतिकारक्षमता क्षीण झाली होती. त्यामुळे मलेरिया, प्लेग, कॉलरा, देवी आणि अतिसार यांसारख्या साथीच्या रोगांनी जगभर थैमान घातले.

ऐतिहासिक तुलना

  • संशोधकांनी या घटनेचे वर्णन मानवजातीवर ओढवलेली आतापर्यंतची सर्वात मोठी पर्यावरणीय आपत्ती असे केले आहे. या काळात झालेल्या जीवितहानीची भीषणता इतकी मोठी होती की, तिची तुलना दोन्ही महायुद्धे आणि १९१८ च्या इन्फ्लूएंझा महामारीशी केली जाते. निसर्गाचे एक छोटेसे बदललेले चक्र किती भयानक स्वरूप धारण करू शकते, याचे हे सर्वात मोठे आणि भयावह उदाहरण आहे.
  • आगामी संकट: ‘सुपर एल निनो’ आणि बदलणारे जागतिक हवामान
  • विविध जागतिक संस्था आणि हवामानशास्त्रज्ञांनी वर्तवलेले अंदाज भविष्यातील भीषणतेची जाणीव करून देणारे आहेत.

१८७७ पेक्षाही शक्तिशाली स्थिती?

‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने प्रसिद्ध केलेल्या ECMWF च्या आकडेवारीनुसार, २०२६ च्या उत्तरार्धात प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा ३ अंश सेल्सिअसने वाढू शकते. तज्ज्ञांच्या मते, ही स्थिती १८७७ मधील ऐतिहासिक विनाशकारी घटनेपेक्षाही अधिक शक्तिशाली असू शकते. न्यूयॉर्क स्टेट युनिव्हर्सिटीचे पॉल राउंडी यांनी इशारा दिला की, १८७० च्या दशकानंतरचा हा कदाचित सर्वात मोठा ‘एल निनो’ ठरेल.

जागतिक परिणाम आणि मानवी आरोग्य

विषुवृत्तीय प्रशांत महासागरातील ही उष्णता केवळ समुद्रापुरती मर्यादित राहणार नाही. याचे दूरगामी परिणाम खालीलप्रमाणे दिसू शकतात:

  • जगभरात भीषण दुष्काळ, आकस्मिक पूर आणि उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढेल.
  • समुद्री बर्फाच्या थरांमध्ये (Sea Ice) वेगाने बदल होतील.
  • हवामान शास्त्रज्ञ कॅथरिन हेहो यांच्या मते, उष्णता आणि आर्द्रतेतील बदलांमुळे मानवी आरोग्यावर अत्यंत गंभीर आणि जीवघेणे परिणाम होऊ शकतात.

१.५°C ची धोक्याची पातळी

‘इनसाइड क्लायमेट न्यूज’ने एक अत्यंत चिंताजनक शक्यता वर्तवली आहे. हा ‘सुपर एल निनो’ पृथ्वीला कायमस्वरूपी १.५ अंश सेल्सिअस या तापमान वाढीच्या मर्यादेपलीकडे ढकलू शकतो. एकदा ही मर्यादा ओलांडली की, हवामानातील बदल ‘अपरिवर्तनीय’ (Irreversible) होतील, म्हणजेच ते पुन्हा पूर्ववत होणे अशक्य होईल.

२०२७: इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष?

डेव्हिड वॉलेस-वेल्स (The New York Times) यांनी संगितले की, हा एल निनो १५० वर्षांपूर्वीसारखा मानवी संहार घडवणार नसला (प्रगत तंत्रज्ञानामुळे), तरी तो २०२७ हे वर्ष आधुनिक इतिहासातील ‘सर्वात उष्ण वर्ष’ म्हणून नोंदवण्यास कारणीभूत ठरेल.

भारतापुढील आव्हाने: मान्सूनची चिंता

भारतीय हवामान विभागाने (IMD) २०२६ साली सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या उत्तरार्धात एल निनोचा प्रभाव वाढून पावसाचे प्रमाण घटू शकते. एल निनोचा संबंध मान्सूनशी असला, तरी गेल्या ७० वर्षांतील १७ घटनांपैकी ५ वेळा भारतात सरासरीइतका पाऊस झाला आहे, हीच काय ती एक जमेची बाजू. मात्र, गेल्या सहा एल निनो वर्षांमध्ये भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. भारतातील जवळपास ७० टक्के पर्जन्यमान मान्सूनमधून मिळते. देशाच्या कृषी क्षेत्रासाठी मान्सून अत्यंत महत्त्वाचा आहे. हे क्षेत्र जवळपास ४ ट्रिलियन डॉलर म्हणजेच अंदाजे ३,३२,००,००० कोटी रुपयांच्या अर्थव्यवस्थेत सुमारे १८ टक्के वाटा उचलते आणि भारताच्या १.५ अब्ज लोकसंख्येपैकी जवळपास निम्म्या लोकांना रोजगार देते.

सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यास तांदूळ, कापूस आणि सोयाबीन यांसारख्या पिकांचे उत्पादन घटू शकते. तसेच जमिनीतील ओलावा कमी राहिल्याने गहू आणि मोहरी यांसारख्या हिवाळी पिकांवरही परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत केंद्र सरकार काही कृषी उत्पादनांच्या निर्यातीवर निर्बंध घालू शकते. असे निर्बंध २०२३ साली एल निनोच्या वर्षात घालण्यात आले होते. याशिवाय भारताला खाद्यतेलांची, विशेषतः पाम तेल आणि सोया तेलाची, आयात वाढवावी लागू शकते. कमी मान्सूनचा परिणाम वीज निर्मितीवरही होऊ शकतो. जलविद्युत उत्पादन घटल्यास वीज निर्मितीला फटका बसू शकतो. कारण भारताच्या एकूण वीज निर्मितीत जलविद्युतचा वाटा सुमारे ६ टक्के आहे.