जम्मू-काश्मीरच्या विलीनीकरणाची शाई वाळते न वाळते तोच, काश्मीरच्या खोऱ्यावर परकीय आक्रमणाचे काळे ढग दाटले होते. रस्ते बंद, भौगोलिक परिस्थिती अत्यंत दुर्गम आणि समोरून वेगाने येणारा आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज शत्रू! या दोलायमान परिस्थितीत भारताचे भवितव्य केवळ एका धावपट्टीवर… श्रीनगर विमानतळावर टिकून होते. भारतीय सैन्याने घेतलेली ती एक ऐतिहासिक झेप आणि त्यानंतर अवघ्या काही तासांत उलटलेला युद्धाचा फासा, हा स्वतंत्र भारताच्या लष्करी इतिहासातील सर्वांत गौरवशाली अध्याय ठरला.
ऑक्टोबर १९४७ मध्ये जम्मू-काश्मीरवर टोळीवाल्यांनी (Tribal Raiders) केलेले आक्रमण रोखण्यासाठी भारतीय लष्कराने विमानांद्वारे सैनिकांना तातडीने श्रीनगरमध्ये उतरवले. आक्रमकांनी मुझफ्फराबाद, डोमेल आणि उरी या मोक्याच्या ठिकाणांवर ताबा मिळवला होता. त्यानंतर त्यांची आगेकूच जम्मू-काश्मीर संस्थानाची उन्हाळी राजधानी असलेल्या श्रीनगरच्या दिशेने सुरू होती. या परिस्थितीत काश्मीर खोरे आक्रमकांच्या ताब्यात जाण्यापासून रोखण्यासाठी श्रीनगर विमानतळ सुरक्षित ठेवणे ही भारतासाठी जीवन-मरणाची लढाई ठरली होती. मात्र, या टोळीवाल्यांनी काश्मीरवर आक्रमण का केले होते? त्यांची नेमकी उद्दिष्टे कोणती होती? आणि भारतीय लष्कराने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विमानांद्वारे सैनिकांना श्रीनगरमध्ये उतरवण्याची ही ऐतिहासिक मोहीम कशी फत्ते केली, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
जम्मू-काश्मीर संस्थानाची स्थापना कशी झाली?
१८४६ मध्ये जम्मू-काश्मीर संस्थानाची स्थापना झाली. त्यावेळी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने अमृतसरच्या तहानुसार काश्मीर खोऱ्यासह काही प्रदेश जम्मूचे डोग्रा शासक गुलाबसिंह यांच्याकडे हस्तांतरित केले.
विसाव्या शतकात डोग्रा राजवटीविरोधात जनआंदोलने उभी राहिली. या राजवटीतील कठोर प्रशासनामुळे लोकांमध्ये असंतोष वाढत होता. इतिहासाचे अभ्यासक आणि लेखक आशिक अहमद इक्बाल यांनी आपल्या ‘The Aeroplane and the Making of Modern India’ (२०२२) या पुस्तकात या परिस्थितीचे सविस्तर विश्लेषण केले आहे.
ते म्हणतात, डोग्रा राजवटीला होणाऱ्या विरोधामागे एक ऐतिहासिक धारणाही काम करत होती. मुघलांच्या काळापासून काश्मीरवर बाहेरून आलेल्या सत्तांनी राज्य केले होते आणि डोग्रा हे अशा परकीय सत्ताधीशांच्या मालिकेतील सर्वांत अलीकडचे राज्यकर्ते आहेत, असा एक मतप्रवाह विरोधकांमध्ये होता. १९४७ साली ब्रिटिश राजवट संपुष्टात येत असताना जम्मू-काश्मीर संस्थानाने आपल्या देशात सामील व्हावे, अशी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांची इच्छा होती. भारताला काश्मीरचे सामरिक व भौगोलिक महत्त्व पूर्णपणे ठाऊक होते. दुसरीकडे, काश्मीरमधील बहुसंख्य मुस्लिम लोकसंख्या आणि संस्थानाची पंजाबला लागून असलेली सीमा यांमुळे ते पाकिस्तानातच विलीन होईल, असा पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा कयास होता.
मात्र, भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र झाले, तेव्हा जम्मू-काश्मीर संस्थानाने कोणत्याही एका देशात विलीन न होता स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाकिस्तानने काश्मीर संस्थानाशी ‘जैसे थे करार’ (Standstill Agreement) केला. या करारानुसार विद्यमान प्रशासकीय व्यवस्था आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पूर्ववत ठेवण्याचे ठरले. परंतु, अल्पावधीतच पाकिस्तान आणि जम्मू-काश्मीर सरकारमधील संबंध बिघडले. पाकिस्तानने जीवनावश्यक वस्तूंची रसद तोडून काश्मीरवर आपल्यात विलीन होण्यासाठी अनुचित दबाव आणल्याचा आरोप जम्मू-काश्मीर सरकारने केला.
काश्मीरवरील आक्रमणाची सुरुवात कशी झाली?
जम्मू-काश्मीर संस्थान अखेर भारतात विलीन होईल या शक्यतेने पाकिस्तानमधील सत्ताधारी अस्वस्थ झाले. या पार्श्वभूमीवर तेथील सत्ताधाऱ्यांनी ‘ऑपरेशन गुलमर्ग’ या सांकेतिक नावाने एक गुप्त लष्करी कट रचला. टोळीवाल्यांच्या (कबायली) आडून जम्मू-काश्मीरवर लष्करी बळाने ताबा मिळवणे, हा या मोहिमेचा मूळ उद्देश होता.
२२ ऑक्टोबर १९४७ रोजी काश्मीरवरील प्रत्यक्ष आक्रमणाला सुरुवात झाली.
आशिक अहमद इक्बाल यांनी या आक्रमणाचे सविस्तर वर्णन केले आहे. त्यांच्या नोंदींनुसार, पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतातून (North-West Frontier Province – NWFP) आणि त्यापलीकडील प्रदेशांतून आलेल्या टोळीवाल्यांनी पश्चिम पंजाबमार्गे काश्मीर खोऱ्यात घुसखोरी केली. हे आक्रमक अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज होते. देशात पेट्रोलचे रेशनिंग सुरू असतानाही ते ट्रकमधून वेगाने प्रवास करत होते.
विशेष म्हणजे, वायव्य सरहद्द प्रांत आणि पश्चिम पंजाबचा मोठा पल्ला गाठून काश्मीरच्या वेशीपर्यंत पोहोचेपर्यंत त्यांना कुठेही अडवण्यात आले नाही. इक्बाल यांनी म्हटले आहे की, मे १९४८ पर्यंत पाकिस्तान सरकारने या आक्रमणात आपला हात असल्याचा इन्कार केला होता. मात्र, प्रत्यक्षात या आक्रमणाचे संपूर्ण नियोजन वायव्य सरहद्द प्रांताच्या सरकारने केले होते आणि त्याला बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांची मूकसंमती होती.
आक्रमकांना श्रीनगरवर ताबा का मिळवायचा होता?
टोळीवाल्यांचे मुख्य आणि तातडीचे उद्दिष्ट श्रीनगर शहर काबीज करणे हेच होते. श्रीनगर हे जम्मू-काश्मीरची उन्हाळी राजधानी असल्याने, या शहराचा ताबा मिळताच महाराज हरिसिंह यांचे सरकार निष्प्रभ झाले असते आणि संपूर्ण संस्थान पाकिस्तानच्या घशात घालणे सोपे गेले असते. मात्र, श्रीनगरचे महत्त्व केवळ राजधानीपुरते मर्यादित नव्हते; त्या काळात संपूर्ण काश्मीर खोऱ्यातील एकमेव पक्की धावपट्टी श्रीनगरमध्येच होती. त्या काळी उर्वरित भारताशी काश्मीरला जोडणारे रस्ते अत्यंत बिकट, कच्चे आणि मर्यादित होते. त्यामुळे शत्रूची आगेकूच रोखण्यासाठी भारतीय सैनिक आणि युद्धाचे साहित्य अवघ्या काही तासांत तिथे पोहोचवण्याचा श्रीनगर विमानतळ हाच एकमेव पर्याय होता. म्हणूनच श्रीनगर विमानतळ शत्रूच्या हाती पडू न देणे ही भारतासाठी अस्तित्वाची लढाई होती.
महाराज हरिसिंह यांचा भारतात विलीनीकरणाचा निर्णय
आक्रमक श्रीनगरच्या अगदी जवळ पोहोचल्याचे पाहून भारत सरकारने वेगाने हालचाली सुरू केल्या. २५ ऑक्टोबर १९४७ रोजी संस्थान मंत्रालयाचे सचिव व्ही. पी. मेनन तातडीने श्रीनगरला रवाना झाले. त्या वेळी महाराज हरिसिंह यांच्या संस्थानावर अस्तित्त्वाचे मोठे संकट उभे राहिले होते. प्रशासकीय आणि अंतर्गत सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे कोलमडण्याच्या उंबरठ्यावर होती.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून २६ ऑक्टोबर १९४७ रोजी महाराज हरिसिंह यांनी कायदेशीर विलीनीकरणाच्या करारावर (Instrument of Accession) स्वाक्षरी केली. या ऐतिहासिक करारामुळे भारताला जम्मू-काश्मीरमध्ये कायदेशीररीत्या सैन्य धाडण्याचा मार्ग मोकळा झाला. सैनिकांना थेट विमानाने श्रीनगरला पोहोचवण्याच्या आपत्कालीन मोहिमेची पूर्वतयारी दिल्लीत आधीपासूनच युद्धपातळीवर सुरू होती.
भारतीय सैन्याला हवाई मार्गाने उतरवण्याची योजना
काश्मीरमधील आणीबाणी लक्षात घेऊन भारत सरकारने लष्कराला हवाई मार्गाने उतरवण्याचा (एअरलिफ्ट) धाडसी निर्णय घेतला. यासाठी तातडीने ‘आर्मी एअरलिफ्ट कमिटी’ स्थापन करण्यात आली.
दिल्लीमध्ये विमानांची जमवाजमव, सैनिकांची ने-आण आणि रसद पुरवठ्याचे नियोजन वेगाने करण्यात आले. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील नागरी विमान कंपन्यांना राष्ट्रहितासाठी आपली विमाने दिल्लीत पाठवण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून तत्काळ सुमारे २५ विमाने उपलब्ध झाली; यात प्रामुख्याने प्रसिद्ध ‘डकोटा’ मालवाहू विमानांचा समावेश होता. ही मोहीम कमालीची जोखमीची होती. भारतीय सशस्त्र दलांचे तत्कालीन ब्रिटिश कमांडर आणि गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांनी सुरुवातीला या हवाई मोहिमेला विरोध दर्शवला होता. त्यामागे काही कारणेही सांगितली होती:
- विमानांना उंच, दुर्गम व प्रतिकूल पर्वतरांगांमधून उड्डाण करावे लागणार होते.
- श्रीनगरची धावपट्टी वैमानिकांसाठी अपरिचित होती.
- आक्रमक वेगाने पुढे सरकत असल्याने प्रत्यक्ष विमान उतरताना धावपट्टीवरच हल्ला होण्याची दाट शक्यता होती.
- श्रीनगर विमानतळावर अत्याधुनिक संपर्कयंत्रणा, दुरुस्तीची साधने अथवा इंधन भरण्याची कोणतीही पुरेशी सुविधा उपलब्ध नव्हती.
या सर्व मर्यादा आणि धोके झुगारून भारत सरकारने राष्ट्रहितासाठी ही मोहीम राबवण्याचा ठाम निर्णय घेतला.
२७ ऑक्टोबर १९४७ : भारतीय जवान श्रीनगरच्या भूमीवर
२७ ऑक्टोबर १९४७ च्या पहाटे भारतीय लष्कराचे शूर जवान डकोटा विमानांतून श्रीनगरच्या धावपट्टीवर उतरू लागले. पहिल्या तुकडीने धावपट्टीचा ताबा घेत तात्काळ संरक्षणात्मक तटबंदी उभारली. विमानांतून सैनिकांबरोबरच दारूगोळा आणि रसद अविरत पोहोचवण्यात आली. पुढील तीन आठवड्यांत या मोहिमेला अभूतपूर्व वेग आला. ६ नोव्हेंबरपर्यंत भारताने श्रीनगरमध्ये सुमारे ३,५०० प्रशिक्षित जवान आणि आवश्यक युद्धसामग्री यशस्वीपणे तैनात केली.
भारतीय लष्कराने मैदानात उतरताच जोरदार प्रतिआक्रमण सुरू केले. एका महत्त्वाच्या लढाईत अवघ्या १२ तासांत भारतीय जवानांनी शत्रूचा धुव्वा उडवला. या लढाईत सुमारे ५०० आक्रमक मारले गेले, तर भारताचे केवळ तीन जवान हुतात्मा झाले. पुढील अवघ्या तीन दिवसांत भारतीय सैन्याने आक्रमकांना पिटाळून लावत उरीपर्यंत मागे ढकलले आणि काश्मीर खोऱ्यावरील परकीय आक्रमणाचे सावट कायमचे दूर केले.
ब्रिटिश नागरिकांची सुरक्षित सुटका
भारतीय लष्कराच्या या धाडसी मोहिमेचा आणखी एक महत्त्वाचा मानवी पैलू समोर आला. त्या वेळी श्रीनगरमध्ये सुमारे ४०० ब्रिटिश नागरिक आणि पर्यटक वास्तव्यास होते; ज्यात प्रामुख्याने निवृत्त अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश होता. लष्कराच्या परतीच्या विमानांमधून या सर्व परदेशी नागरिकांना सुरक्षितपणे दिल्लीत हलवण्यात आले.
पाकिस्तानला बसलेला धक्का आणि मोहिमेचे सामरिक महत्त्व
भारतीय लष्कराने राबवलेल्या मोहिमेची गती आणि अभूतपूर्व यश पाहून भारताने याचे नियोजन आधीपासूनच केले असावे, असा संशय पाकिस्तानातील सत्ताधाऱ्यांना आला. आशिक अहमद इक्बाल नमूद करतात की, ही मोहीम इतकी अचूक आणि वेगवान होती की तत्कालीन पाकिस्तानी निरीक्षकांचा असा समज झाला की भारताची ही पूर्वतयारी होती. मात्र, प्रत्यक्षात, भारतीय लष्कराचे हे अद्वितीय धाडस, सरदार पटेलांचे कणखर नेतृत्व आणि भारतीय वैमानिकांच्या अतुलनीय कौशल्याचे फलित होते. डोंगर-दऱ्यांच्या अत्यंत आव्हानात्मक युद्धभूमीत हवाई वाहतूक किती निर्णायक ठरू शकते, हे या मोहिमेने जागतिक लष्करी इतिहासाला दाखवून दिले. त्यामुळेच परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी थेट हस्तक्षेप करणे या एकाच निर्णयामुळे भारताला शक्य झाले. १९४७ ची श्रीनगर एअरलिफ्ट मोहीम भारतीय सैन्याच्या इतिहासातील सर्वात गौरवशाली आणि निर्णायक घटना ठरली. प्रतिकूल हवामान, अपुऱ्या सुविधा आणि शत्रू अगदी उंबरठ्यावर असताना सैनिकांनी दाखवलेल्या अफाट धैर्यामुळे केवळ श्रीनगर विमानतळच वाचला नाही, तर संपूर्ण जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग म्हणून सुरक्षित राहिले.
