मराठीतले आद्य नाटक कोणी लिहिले? असा प्रश्न विचारला, तर नाट्यरसिक अगदी निःसंकोचपणे विष्णूदास भाव्यांच्या ‘संगीत सीता-स्वयंवरा’चे नाव सांगेल. भाव्यांनी हे नाटक १८४३ साली लिहिले. हे नाटक पहिले गद्य आणि पद्ययुक्त नाटक होते. पण पहिले गद्य नाटक कोणी लिहिले असे विचारले तर, सांगू शकाल? मराठीतील पहिले गद्य नाटक लिहिण्याचा मान जातो महात्मा जोतिराव फुले यांना. सत्यशोधक समाजाचे संस्थापक, समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांनी ‘तृतीय रत्न’ हे पहिले गद्य नाटक १८५३ साली लिहिले. आज आहे महात्मा फुले यांची १९९वी जयंती, त्या निमित्ताने जाणून घेऊयात फुले यांच्या नाटकाची गोष्ट.

दक्षिणा प्राईझ कमिटीने नाकारलेले नाटक

जोतिरावांनी हे एकमेव नाटक दक्षिणा प्राईझ कमिटीसाठी लिहिले होते, ते त्यांनी लिहिलेले एकमेव नाटक ठरले. दक्षिणा प्राईझ कमिटी ही संस्था ब्रिटिशांनी स्थानिक भाषेतील वाङ्मयाला चालना मिळावी म्हणून सुरू केली होती. पेशवाईत ब्राम्हणांना दिल्या जाणाऱ्या पारंपारिक देणग्या या ग्रंथनिर्मितीसाठी वापरल्या जाव्यात, आणि दरवर्षी दर्जेदार ग्रंथनिर्मिती करणाऱ्या व्यक्तीस काही निधी बक्षीस स्वरूपात देण्यात यावा, या उद्देशाने ही संस्था सुरू करण्यात आली.

१८५५ साली दक्षिणा प्राईझ कमिटीने हे नाटक ब्राह्मण समाजाविषयी द्वेष पसरवणारे नाटक म्हणून अस्वीकार केले. धनंजय कीर यांनी लिहिलेल्या फुले यांच्या चरित्रात याचा उल्लेख वाचायला मिळतो. हे नाटक त्यामुळे वादग्रस्त ठरले. फुले यांच्यामते, कमिटीवर प्रभाव असलेल्या ब्राम्हण सदस्यांचा या नाटकाला विरोध होता, त्यामुळे कमिटीने हे नाटक नाकारणे स्वाभाविक होते. पुढे बऱ्याच काळानंतर फुले यांनी स्वतःचे मत प्रगट केले की, ही कमिटी पुणे म्युनिसिपालिटीची धाकटी बहिण आहे.

‘तृतीय रत्न’चे कथानक व पात्र

एक ब्राह्मण भिक्षुक, एका गरीब कुणबी शेतकऱ्याच्या गरोदर पत्नीला सांगतो की, तिच्या उदरातील अर्भकापासून तिच्या नवऱ्याला धोका आहे. हे मूल जन्मल्यावर तिचा नवरा जिवंत राहणार नाही. हे टाळायचे असेल, तर तिला ब्राह्मणाने सांगितलेली पूजा करणं आवश्यक आहे. गरीबीने ग्रासलेल्या जोडप्याला कर्ज घेण्यासाठी भाग पाडले जाते. या पुजेसाठी ब्राम्हण विविधप्रकारचे खर्च करायला लावतो, स्वतःच्या घरी कुणब्याला राबवून घेतो आणि त्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतो. या नाटकात कुणबी जोडप्याचे हाल पाहून एक पादरी त्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचे आवाहन करतो. पूर्वीच्या नाटकांप्रमाणे एक सूत्रधार विदुषकाच्या रूपात या नाटकामध्येही आहे. या विदुषकाची भूमिका या नाटकात प्रबोधन करणारा समाजसुधारक म्हणून महत्त्वाची ठरते.

१२६ वर्षांची उपेक्षा

दक्षिणा प्राईझ कमिटीत सादर केल्यानंतर फुले यांनी हे नाटक प्रकाशित का केले नाही हा प्रश्न मात्र तसाच राहतो. सत्यशोधक समाजातील इतरही कुणा अनुयायांनी नाटकाच्या संहितेचे प्रकाशन केले नाही. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये १९६९मध्ये, प्रा. स. गं. मालशे व धनंजय कीर यांनी फुले यांचे सर्व वाङ्मय एकत्रित केले, तेव्हा त्यांनादेखील या संहितेची प्रत सापडली नाही. याचमुळे महात्मा फुले समग्र वाङ्मयाच्या पहिल्या आवृत्तीत, अखेरीस परिशिष्टामध्ये अप्रकाशित वाङ्मयाच्या नोंदींमध्ये याचा उल्लेख वाचायला मिळतो. १९७९ साली पहिल्यांदाच ‘पुरोगामी संशोधक’ नियतकालिकाच्या (एप्रिल/मे) अंकात हे नाटक पहिल्यांदाच प्रकाशित करण्यात आले. या संहितेची हस्तलिखित प्रत शोधण्याचे श्रेय सीताराम रायकरांना जाते. बुलढाण्यातील चिखली गावातील सत्यशोधक पंढरीनाथ पाटील यांच्याकडे या संहितेच्या हस्तलिखिताची प्रत मिळाली.

जे प्रकाशनाबाबत, तेच सादरीकरणाबाबतही

नाटक हा प्रयोगनिष्ठ कलाप्रकार आहे. कोणतेही नाटक रंगमंचावर सादर होत नाही तोवर ती केवळ नाट्य-संहिताच राहते. तृतीय रत्न या नाटकाचे प्रकाशन झाल्यानंतरही नाटक रंगभूमीवर येण्यासाठी आणखी दहा वर्षांचा कालावधी लागला. या नाटकाचा पहिला प्रयोग डॉ. रुस्तुम अचलखांब यांनी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या रंगमंचावर १९८९च्या २८ नोव्हेंबरला मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या उपस्थितीत सादर केला. हे नाटक अद्याप व्यावसायिक रंगभूमीवर सादर झालेले नाही.

पहिले सामाजिक तसेच दलित नाटक

या नाटकाचे संशोधक सीताराम रायकर प्रस्तावनेत म्हणतात, “तृतीय रत्न जरी नाटक म्हणून लिहिलेले असले तरी, नाटकाच्या रूपकात्मक कसोट्यांवर ते उतरू शकणार नाही…. मात्र पात्रांच्या वैचारिक देवाणघेवाणीतून नाट्यमयता निर्माण होते. संवादात अकृत्रिमपणा जिवंत आहे.” सोलापूर येथे १९९९ साली झालेल्या दलित नाट्यसंमेलनातात, अध्यक्ष गंगाधर पानतवणे म्हणाले होते, “आजच्या दलित रंगभूमीची बीजं मला तृतीय रत्नमध्ये आढळतात.” दलित साहित्याचे अभ्यासक दत्ता भगत म्हणतात, ‘हे नाटक कलात्मदृष्ट्या जरी अपयशी असलं तरी जीवनदर्शनाचे प्रभावी सूचन करणारे नाटक असल्यामुळे हे नाटक महत्त्वाचे वाटते.” म्हणूनच हे नाटक सामाजिक प्रबोधनपर लिहिलेले नाटक असून अंधश्रद्धा व तत्कालिन जातीव्यवस्थेचे दर्शन या नाटकाच्या माध्यमातून घडल्याशिवाय राहात नाही.

प्रबोधन व प्रचारकी बाज

हे नाटक केवळ समाजाचे चित्रण घडवत नाही, तर समाजाने काय केले पाहिजे, कसे वागले पाहिजे यावरही भाष्य करते. धर्माच्या नावाखाली होणारी गरीबांची, जातीय उतरंडीतील विषम जातींची पिळवणूक थांबण्यासाठी शिक्षणाचा मार्ग निवडला पाहिजे. शिक्षण कोणते तर इंग्रजी शिक्षण. त्यातूनच समानता स्थापन होईल असा आशावाद कुठेतरी नाटकातून व्यक्त होताना दिसतो. ज्योतिरावांचे मिशनरी शाळेत शिक्षण पूर्ण झालेले असल्यामुळे ख्रिस्ती धर्माप्रतिची त्यांची आंतरिक ओढ नाटकामधूनही प्रकर्षाने दिसून येते. नाटकाच्या शेवटी फुले यांनी त्यांच्या रात्रशाळांचादेखील प्रचार केलेला आहे. लोकांनी शिक्षणाकडे वळावे आणि या शोषणाविरूद्ध उभे राहावे असे प्रतिपादन वारंवार नाटकामधील विदुषकाचे पात्र करते.

ऐतिहासिक असूनही समकालीन

फुल्यांनी हे नाटक १९ व्या शतकात लिहिले होते, ज्यावेळी नुकताच पेशवाईचा अस्त झाला होता आणि भारतामध्ये प्रबोधनाची चळवळ सुरू झाली होती. आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्षं होऊन गेलीत तरी अजूनही अंधश्रद्धा मुळापासून संपवता आलेली नाही. फुले यांच्या नाटकात अविद्येमुळे अंधश्रद्धा बळावताना दिसते, आजच्या काळात शिकूनही अंधश्रद्धेचे उच्चाटन होत नाही. त्यामुळे काळ ऐतिहासिक असला तरी विषय मात्र आजही समकालीनच वाटतो.