20 thousand Indian truckers in US sue government अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील हजारो स्थलांतरित ट्रक चालक आपल्या नोकऱ्या वाचवण्यासाठी लढा देत आहेत. कॅलिफोर्नियाने अचानक त्यांचे व्यावसायिक ड्रायव्हिंग लायसन्स (सीडीएल)रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने हे संकट ओढवले आहे. ‘लॉस एंजेलिस टाइम्स’च्या वृत्तानुसार, या चालकांनी आता कॅलिफोर्नियाच्या मोटार वाहन विभागाविरुद्ध (डीएमव्ही) न्यायालयात धाव घेतली आहे.
हा निर्णय आपल्या उदरनिर्वाहावर गदा आणणारा असून मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारा असल्याचे चालकांचे म्हणणे आहे. या प्रकरणातील तांत्रिक चूक स्वतः मोटार वाहन विभागाने केली असून त्याची किंमत मात्र चालकांना मोजावी लागत असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. ट्रक चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची कारणे काय? स्थलांतरितांचे आरोप काय? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…
प्रकरण काय?
६ नोव्हेंबर रोजी कॅलिफोर्निया मोटार वाहन विभागाने सुमारे १७,००० व्यावसायिक ट्रक चालकांना ६० दिवसांच्या आत परवाना रद्द करण्याच्या नोटिसा पाठवल्या. अमेरिकेत कायदेशीररित्या राहण्याच्या मुदतीपेक्षा तुमच्या परवान्याची मुदत जास्त असल्याने तुमचे लायसन्स रद्द करण्यात येत असल्याचे या पत्रात म्हटले होते. फेडरल ऑडिटमध्ये (केंद्रीय तपासणीत) या त्रुटी समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
तेव्हापासून परवाना रद्द होणाऱ्या चालकांची संख्या सतत वाढत आहे. नोव्हेंबरपर्यंत २०,००० पेक्षा जास्त चालकांना या नोटिसा मिळाल्या होत्या, तर ताज्या अहवालानुसार ही संख्या आता २१,००० च्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. चालकांच्या मते, हा सर्व प्रकार डीएमव्हीच्या कागदपत्रांमधील चुकांमुळे घडला आहे. कॅलिफोर्नियाच्या कायद्यानुसार, अशी चूक झाल्यास मोटार वाहन विभागाने स्वतःहून परवान्यावरील तारीख दुरुस्त करणे अपेक्षित आहे किंवा चालकांना पुन्हा अर्ज करण्याची संधी देणे गरजेचे आहे. मात्र, तसे न करता राज्याने थेट परवाने रद्द करण्याचा मार्ग निवडला आहे.
स्थलांतरित ट्रक चालकांची न्यायालयात धाव
हजारो चालकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ‘द शीख कोलिशन’ आणि ‘एशियन लॉ कॉकस’ या संघटनांनी पाच ट्रक चालकांच्या वतीने याचिका दाखल केली आहे. त्यांनी अलामेडा काउंटी सुपीरियर कोर्टाला या परवाना रद्द करण्याच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची विनंती केली आहे. शीख कोलिशनच्या कायदेशीर संचालक मनमीत कौर यांनी ‘असोसिएट प्रेस’ (एपी) या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, जर न्यायालयाने यात हस्तक्षेप केला नाही, तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. हजारो कुटुंबे आपले उत्पन्नाचे साधन गमावतील आणि देशातील पुरवठा साखळी विस्कळीत होईल, असा इशारा त्यांनी दिला.
कौर म्हणाल्या, “या चालकांनी या कामावरच आपले आयुष्य उभे केले आहे. स्वतःची कोणतीही चूक नसताना आज ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत.” शीख कोलिशनच्या मते, फेडरल सरकारच्या दबावाखाली येऊन मोटार वाहन विभागाने ही कारवाई केली आहे. ट्रम्प प्रशासनाने स्थलांतरितांना व्यावसायिक परवाने देणाऱ्या राज्यांवर कडक कारवाई सुरू केली असून कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, पेनसिल्व्हेनिया आणि मिनेसोटा सारख्या राज्यांचा केंद्रीय निधी रोखण्याचाही इशारा दिला आहे. कॅलिफोर्निया मोटार वाहन विभागाने आता अनिवासी लोकांना व्यावसायिक परवाने देणे किंवा त्यांचे नूतनीकरण करणे बंद केले आहे. मात्र, त्यांचे परवाने रद्द होत आहेत, त्यांच्यासाठी कोणताही स्पष्ट तोडगा अद्याप देण्यात आलेला नाही.
अमेरिकेतील भारतीय स्थलांतरीत ट्रक चालक
पंजाबी शीख ट्रक चालक हे अमेरिकेच्या ‘ट्रकिंग इंडस्ट्री’ कणा ठरले आहेत. अनेकांनी अमेरिकेत आश्रय घेतला आणि नंतर स्थिर रोजगारासाठी ट्रकिंग व्यवसायात प्रवेश केला. अमेरिकेत अंदाजे ७,५०,००० पंजाबी शीख राहतात, ज्यांपैकी सुमारे १,५०,००० जण ट्रकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला फ्लोरिडामध्ये झालेल्या एका भीषण अपघातानंतर हे प्रकरण राजकीयदृष्ट्या तापले.
अमेरिकेत राहण्यासाठी अधिकृत परवानगी नसलेल्या एका पंजाबी शीख ट्रक चालकाने महामार्गावर बेकायदा ‘यू-टर्न’ घेतल्याने झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर लगेचच ट्रम्प प्रशासनाने राज्य परवाना नियमांचे पुनरावलोकन करण्याचे आदेश दिले. अधिकाऱ्यांनी कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन आणि टेक्साससह सात राज्यांच्या मानकांवर आक्षेप घेतला. ऑक्टोबरमध्ये कॅलिफोर्नियात झालेल्या आणखी एका भीषण ट्रक अपघातामुळे प्रशासनावरील दबाव अधिकच वाढला आहे.
३० भारतीय ट्रक चालकांना अटक
कॅलिफोर्नियातील ‘एल सेंट्रो’ भागात बेकायदा राहणाऱ्या आणि व्यावसायिक ट्रक चालक म्हणून काम करणाऱ्या ३० भारतीय नागरिकांना अमेरिकन सीमा सुरक्षा दलाने अटक केली आहे. अमेरिकेच्या वाहतूक क्षेत्रात विनापरवाना स्थलांतरितांच्या वाढत्या संख्येवर आता प्रशासनाने कडक पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे, हे या कारवाईतून स्पष्ट होत आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ‘यूएस कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन’ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नोव्हेंबरच्या अखेरीस आणि डिसेंबरच्या मध्यापर्यंत कॅलिफोर्नियामध्ये राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान या कारवाया करण्यात आल्या. अमेरिकेत अलीकडच्या काळात विनापरवाना ट्रक चालकांमुळे झालेल्या भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीवर, रस्ते सुरक्षा आणि इमिग्रेशन नियमांच्या अंमलबजावणीबाबत चिंता व्यक्त केली जात होती.
कॅलिफोर्नियाच्या ‘एल सेंट्रो’ सेक्टरमधील बॉर्डर पेट्रोल एजंट्सनी नियमित वाहन तपासणी आणि संयुक्त मोहिमेदरम्यान, व्यावसायिक ड्रायव्हिंग लायसन्स असलेल्या एकूण ४९ बेकायदा स्थलांतरितांना अटक केली. यापैकी ३० जण भारतीय नागरिक आहेत. उर्वरित नागरिक चीन, मेक्सिको, रशिया, तुर्की आणि युक्रेनसह इतर देशांतील असल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे.
