Poompuhar Underwater Excavation Chola Port History: प्राचीन कालखंडात भारतीय किनारपट्टीवरून विदेशासोबतच्या सागरी व्यापाराला अधिक मजबूत करणारे नवे पुरावे संशोधकांच्या हाती लागले आहेत. तामिळनाडूमधील प्राचीन चोलकालीन पूम्पुहार बंदराच्या समुद्रकिनाऱ्यालगत पाण्याखाली करण्यात आलेल्या ताज्या उत्खननातून पश्चिम आशियाशी असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापारसंबंधांची नवी माहिती समोर आली आहे.
प्राचीन कालखंडात भारतीय किनारपट्टीवरून विदेशाशी व्यापार होत असे, याच इतिहासाला बळ देणारा पुरावा सापडला आहे. तामिळनाडूमधील प्राचीन चोलकालीन बंदर असलेल्या पूम्पुहारच्या समुद्रकिनाऱ्यालगत पाण्याखाली करण्यात आलेल्या नव्या पुरातत्त्वीय उत्खननातून या शहराच्या सागरी व्यापारसंबंधांविषयी नवे पुरावे समोर आले आहेत. तामिळनाडू राज्य पुरातत्त्व विभाग (TNSDA) आणि इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने १८ दिवस ही मोहीम राबवण्यात आली होती. या संशोधनात पश्चिम आशियाशी संबंधित ‘टॉर्पेडो जार’चा एक तुकडा, भाजलेल्या मातीपासून तयार केलेल्या चार रिंग-वेल्स (वर्तुळाकार विहिरी) तसेच मातीच्या भांड्यांचे २५० हून अधिक तुकडे सापडले आहेत. याशिवाय इतरही काही पुरातत्त्वीय अवशेष हाती लागले आहेत.
पूम्पुहारचा प्राचीन उल्लेख
आजच्या मयिलादुथुराई जिल्ह्यात असलेल्या पूम्पुहार शहराचा उल्लेख संगम आणि संगमोत्तर साहित्यात आढळतो. गेल्या अनेक दशकांमध्ये इथे झालेल्या पुरातत्त्वीय संशोधनातून या प्राचीन बंदराचे हिंदी महासागरातील मोठ्या व्यापारी जाळ्याशी संबंध असल्याचे पुरावे समोर आले आहेत. प्राचीन पूम्पुहार वस्तीचा मोठा भाग आता समुद्राखाली गेल्याचेही मानले जाते. संगमकालीन पहिल्या शतकातील पट्टिनप्पालाईमध्ये या शहराचे गजबजलेले व्यापारी बंदर म्हणून सविस्तर वर्णन आहे.
घोडे, काळी मिरी, सोने आणि रत्ने
समुद्रमार्गे आणलेले घोडे, काळी मिरी, सोने आणि रत्ने, गंगा खोऱ्यातील वस्तू तसेच ईलम अर्थात श्रीलंकेतून आलेल्या खाद्यपदार्थांचा व्यापार इथे होत असल्याचे त्यात म्हटले आहे. पुरनानूरूमध्येही परदेशातून मौल्यवान माल घेऊन मोठी जहाजे पूम्पुहार बंदरात येत असल्याचे वर्णन आढळते. पुरनानूरू हे प्राचीन तमिळ संगम् साहित्यातील ‘अट्टुत्तोहै’ (आठ काव्यांचे संग्रह) या मालिकेतील एक अत्यंत महत्त्वाचे काव्य आहे. यामध्ये प्राचीन राजांची वीरता, युद्धे, संस्कृती आणि सामाजिक जीवनाचे वर्णन आढळते.
संगमोत्तर साहित्यात तपशीलवार वर्णन
संगमोत्तर सिलप्पदिकारममध्ये पूम्पुहारच्या नगररचनेचे अधिक तपशीलवार चित्र दिसते. समुद्रकिनाऱ्यालगत बंदर आणि गोदामांचा मरुवूरपक्कम भाग, त्याच्या आतील बाजूस पट्टिनपक्कम आणि दोन्हींच्या मधील बाजारपेठांचा परिसर अशा शहराच्या वेगवेगळ्या भागांचे वर्णन या महाकाव्यात आहे. तर मणीमेखलईमध्ये इंद्र उत्सव साजरा न केल्यामुळे समुद्राने पूम्पुहार गिळल्याची आख्यायिका सांगितली आहे. मणीमेखलई हे प्राचीन तमिळ संगम् साहित्यातील पाच मोठ्या महाकाव्यांपैकी एक आहे. हे महाकाव्य ‘सिलप्पधिकिारम्’चा पुढील भाग मानले जाते. यांचे लेखन कवी सीत्तलै सात्तणार यांनी केले होते. यामध्ये कोवलन आणि माधवी यांची मुलगी मणीमेखलई हिच्या बौद्ध धर्माच्या प्रवासाची आणि त्या काळातील सामाजिक परिस्थितीची कथा यात आहे.
पूम्पुहारचे महत्त्व काय? उत्खननातून आतापर्यंत काय सापडले?
सुमारे ८०० किलोमीटर लांबीची कावेरी नदी बंगालच्या उपसागराला जिथे मिळते, त्या नदीमुखाशी पूम्पुहार हे प्राचीन शहर वसलेले आहे. कावेरीपूम्पट्टिनम या नावानेही ओळखले जाणारे हे शहर सुरुवातीच्या चोल राजांची राजधानी असल्याचे मानले जाते.
आर. पूनकुंद्रन, के. श्रीधरन आणि इतर संशोधकांनी २०११ मध्ये प्रसिद्ध केलेल्या पुरातत्त्वीय अहवालानुसार, पूम्पुहारचा इतिहास इ.स.पू. पाचव्या-चौथ्या शतकापर्यंत मागे जातो. येथे सापडलेल्या लाकडाच्या एका ओंडक्याच्या कार्बन डेटिंगवरून त्या काळात हे शहर अस्तित्वात होते, असे संशोधकांनी नमूद केले आहे.
प्राचीन पूम्पुहार शहराची विभागणी मुख्यतः मरुवूरपक्कम (Maruvurppakkam), पट्टिनपक्कम (Pattinappakkam) आणि नालंगाडी (Nalangadi) या तीन भागांत झालेली होती. मरुवूरपक्कम हा भाग समुद्रकिनाऱ्यालगत होता, तर पट्टिनपक्कम त्याच्या पश्चिमेला वसलेले होते. या दोन्ही भागांच्या मधल्या परिसराला नालंगाडी म्हटले जात असे.
चोल काळातील गजबजलेले व्यापारी बंदर
चोल काळात पूम्पुहार हे अत्यंत गजबजलेले व्यापारी बंदर होते. या शहरातून निर्यात होणाऱ्या मालावर वाघाचे चिन्ह उमटवले जात असे. हा माल चोल प्रदेशातून आला आहे, याची ती खूण होती. भारताच्या विविध भागांसह आग्नेय आशियातील व्यापारी आपल्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी मोठ्या संख्येने पूम्पुहारमध्ये येत असत. पूनकुंद्रन आणि श्रीधरन यांच्या मते, गंगेच्या खोऱ्यातील विविध वस्तू, सिलोनमधील खाद्यपदार्थ आणि जावा येथील मसाल्यांची पूम्पुहारमध्ये आयात होत असे (R. Poonkundran et al., Archaeological Excavations of Tamilnadu, Vol. II: Kodumanal, Karur, Poompuhar, Department of Archaeology, Government of Tamil Nadu, Publication No. 240, 2011).
पश्चिम आशिया आणि भूमध्यसागरीय व्यापाराशीही संबंध
अलीकडेच झालेल्या पुरातत्त्वीय संशोधनातून या व्यापारी संबंधांना आणखी पुष्टी मिळाली आहे. संशोधकांना सापडलेल्या महत्त्वाच्या अवशेषांमध्ये पश्चिम आशियातील उत्कृष्ट दर्जाच्या मृद्भांडाचा अर्थात ‘टॉर्पेडो जार’चा एक तुकडा आहे. संपूर्ण भांड्याचा व्यास अंदाजे ३० ते ३५ सेंटीमीटर असावा, असा संशोधकांचा अंदाज आहे. अशा प्रकारच्या टॉर्पेडो जारचा वापर प्राचीन काळात सागरी व्यापारी मार्गांवरून वाईन आणि ऑलिव्ह तेलासारखे द्रव पदार्थ वाहून नेण्यासाठी केला जात असे. त्यामुळे पूम्पुहारमध्ये या भांड्याचा तुकडा सापडणे महत्त्वाचे मानले जात आहे. पूम्पुहारचे व्यापारी संबंध केवळ भारत किंवा आग्नेय आशियापुरते मर्यादित नव्हते, तर पश्चिम आशिया आणि भूमध्यसागरीय व्यापारी जगाशीही त्याचा संबंध होता, याचा हा एक महत्त्वाचा पुरावा आहे.
ताम्रलिप्ती आणि ओडिशातील पालूर येथून निघणारी जहाजे
मात्र पूम्पुहारच्या दूरवर पसरलेल्या सागरी व्यापाराची माहिती पूर्णपणे नवी नाही. सिला त्रिपाठी, ए. एस. गौर आणि इतर संशोधकांनी १९९६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘Marine Archaeology Explorations in the Kaveripoompattinam Region’ या शोधनिबंधात याचा उल्लेख केला होता. पश्चिम बंगालमधील ताम्रलिप्ती आणि ओडिशातील पालूर येथून निघणारी जहाजे पूम्पुहारमध्ये येत असत. येथून पुढे समुद्रमार्गे जाणारी जहाजे आग्नेय आशियाई देश, अरबस्तान आणि रोमच्या दिशेने प्रवास करत असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.
रोम, इजिप्त, चीन आणि अरबस्तानातून जहाजांची ये-जा
श्रीलता मेनन यांनी आपल्या ‘In Search of Lost Cities (२०२५)’ या पुस्तकातही पूम्पुहारच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे वर्णन केले आहे. त्या लिहितात, रोम, इजिप्त, चीन आणि अरबस्तानातून आलेल्या जहाजांची पूम्पुहार बंदरात चोवीस तास ये-जा सुरू असे. घोड्यांसह विविध प्रकारचा माल येथे उतरवला आणि जहाजांवर चढवला जात असे. मालाची तपासणी केल्यानंतर त्यावर चोल राजसत्तेच्या सीमा शुल्क विभागाची खूण म्हणून वाघाचे चिन्ह उमटवले जात असे.
पूम्पुहारमध्ये आणखी काय सापडले?
पूम्पुहारमधील पुरातत्त्वीय संशोधनात विटांनी बांधलेल्या वास्तूंचे अवशेष, भाजलेल्या मातीच्या वर्तुळाकार विहिरी (terracotta ring wells), धान्य किंवा इतर वस्तू साठवण्यासाठी वापरली जाणारी मोठी मातीची भांडी आणि मातीचे थर सापडले आहेत. हे अवशेष संगम काळातील असावेत, असे मानले जाते. त्रिपाठी आणि गौर यांच्या मते, येथे सापडलेल्या बांधकामांचे अवशेष तत्कालीन सार्वजनिक इमारत, बंदराचा धक्का किंवा जलाशयाचे असण्याची शक्यता आहे. समुद्रातील परिसरात महापाषाणकालीन मृद्भांडी आणि त्याच्याशी संबंधित इतर अवशेषही सापडले आहेत. या पुराव्यांवरून प्राचीन पूम्पुहारची वस्ती आजच्या समुद्रकिनाऱ्याच्या पलीकडेही विस्तारलेली होती, असे दिसून येते.
विहिरी समुद्राच्या तळाशी कशा पोहोचल्या?
अलीकडेच झालेल्या संशोधनातील एक विशेष बाब म्हणजे समुद्राच्या तळाशी सापडलेल्या रिंग-वेल्स. अशा वर्तुळाकार विहिरी सामान्यतः जमिनीवर गोडे पाणी मिळवण्यासाठी बांधल्या जात असत. त्यामुळे आज त्या समुद्राच्या तळाशी सापडणे महत्त्वाचे आहे. संशोधकांच्या मते, या विहिरींच्या परिसरात जमिनीखाली गाडला गेलेला एखादा प्राचीन नदीप्रवाह (palaeochannel) असण्याची शक्यता आहे. किनाऱ्याची दीर्घकाळ झालेली धूप आणि समुद्राच्या पातळीत झालेली वाढ यांमुळे कालांतराने हा भूभाग समुद्राखाली गेला असावा. त्यामुळे आज समुद्राच्या तळाशी दिसणारे हे अवशेष एकेकाळी जमिनीवर अस्तित्वात असलेल्या पूम्पुहारच्या वस्तीचे पुरावे असू शकतात (संदर्भ: Sila Tripati, A. S. Gaur, Sundaresh & P. Gudigar, “Marine Archaeological Explorations in the Kaveripoompattinam Region: Fresh Light on the Structural Remains”, Man and Environment, Vol. XXI(1), 1996).
समुद्रात बुडालेले शहर
पूम्पुहारचा मोठा भाग इसवी सनाच्या चौथ्या किंवा पाचव्या शतकाच्या आसपास आलेल्या विनाशकारी पुरामुळे समुद्रात बुडाला असावा, असे मानले जाते.
पूम्पुहारच्या देवतेने शहर बुडवले
श्रीलता मेनन यांनी यासंदर्भातील आणखी एका प्राचीन आख्यायिकेचा उल्लेख केला आहे. या कथेनुसार, पूम्पुहारच्या राजाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. पुत्रशोकात बुडालेल्या राजाने त्या वर्षी पारंपरिक ‘इंद्र विझा’ (Indra Vizha) उत्सव साजरा केला नाही. चांगले पीक मिळावे यासाठी शेतकरी पाऊस, मेघगर्जना आणि विजेचा अधिपती मानल्या जाणाऱ्या इंद्राची म्हणजेच ‘वेंधन’ याची या उत्सवात पूजा करत असत. मात्र राजाने हा उत्सव साजरा न केल्याने पूम्पुहारची देवता संतप्त झाली आणि तिने संपूर्ण शहर समुद्रात बुडवले, अशी ही आख्यायिका सांगते.
त्सुनामीमुळे पूम्पुहार पाण्याखाली?
या आख्यायिकेपलीकडे पूम्पुहार समुद्रात जाण्यामागे एखादी मोठी नैसर्गिक आपत्ती असण्याची शक्यताही पुरातत्त्वीय संशोधनातून मांडण्यात आली आहे. काही अभ्यासांनुसार, इसवी सनाच्या तिसऱ्या शतकाच्या आसपास पूम्पुहारच्या किनाऱ्याला मोठी त्सुनामी धडकली असावी आणि शहराचा काही भाग समुद्राखाली जाण्यामागे तिचाही हात असू शकतो.
पूम्पुहार नेमके कसे बुडाले?
मात्र पूम्पुहार नेमके कसे बुडाले, याबाबत अभ्यासकांमध्ये एकमत नाही. यासंदर्भात प्रामुख्याने दोन शक्यता मांडल्या जातात. पहिल्या मतानुसार, संपूर्ण शहर समुद्रात बुडाले आणि नंतर समुद्र मागे हटल्यावर ते पुन्हा वसवण्यात आले. दुसऱ्या मतानुसार, शहराचा केवळ काही भाग समुद्राने गिळंकृत केला. पूनकुंद्रन आणि श्रीधरन यांच्या मते, यापैकी दुसरी शक्यता अधिक विश्वासार्ह वाटते.
