2026 Economics Nobel Prize Robert Hall Michael Woodford analysis: अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा स्वेरिजेस रिक्सबँक पुरस्कार अर्थात अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा सोमवारी १२ ऑक्टोबर रोजी जाहीर झाला. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे रॉबर्ट ई. हॉल आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीचे मायकेल वुडफोर्ड यांना हा सन्मान मिळालाय. सूक्ष्म आर्थिक वर्तनाच्या आधारे समग्र अर्थव्यवस्थेची दिशा स्पष्ट करणाऱ्या त्यांच्या संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आला.

आर्थिक चढ-उतारांच्या काळात स्थिरीकरण धोरणं अर्थात स्थैर्य आणणारी धोरणं अधिक चांगल्या प्रकारे राबवण्यासाठी या दोघांनी नवी केन्झीयन मॉडेल्स (अर्थतज्ज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांच्या मांडणीवर आधारित मॉडेल्स) विकसित केली. ही मॉडेल्स सरकारची वित्तीय धोरणं आणि मध्यवर्ती बँकांची पतधोरणं ठरवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील, असं मत पुरस्कार प्रदान करणाऱ्या रॉयल स्वीडिश ॲकॅडमीने व्यक्त केलंय. या दोन्ही अर्थतज्ज्ञांनी विकसित केलेली नवी केन्झीयन मॉडेल्स आता जगभरातल्या मध्यवर्ती बँका आणि वित्त मंत्रालयं वापरतायत. आर्थिक स्थैर्यासाठी आखलेली धोरणं व्यापार आणि उद्योगांच्या चक्रावर नेमका कसा परिणाम करतात हे अचूकपणे समजून घेण्यासाठी या मॉडेल्सचा आधार घेतला जातो.

स्थिरीकरण धोरण म्हणजे नेमकं काय? नव्या केन्झीयन मॉडेल्ससाठी ते का गरजेचं आहे?

अर्थशास्त्रामध्ये आर्थिक चढ-उतार नियंत्रणात ठेवून देशाचा विकासदर स्थिर ठेवणं आणि बेरोजगारी शक्य तितकी कमी ठेवणं, यासाठी सरकार किंवा मध्यवर्ती बँका जी पावलं उचलतात, त्यांना स्थिरीकरण धोरणं म्हटलं जातं.

वित्तीय धोरणांतर्गत सरकार सार्वजनिक खर्च किंवा करांचं प्रमाण बदलून बाजारातल्या एकूण मागणीवर प्रभाव पाडतं. विशिष्ट कालावधीत आणि विशिष्ट किमतींनुसार, अर्थव्यवस्थेतल्या वस्तू तसंच सेवांवर होणाऱ्या एकूण खर्चाला एकूण मागणी म्हणतात. याउलट, पतधोरणांतर्गत मध्यवर्ती बँका व्याजदरांमध्ये बदल करणं, राखीव निधीचं प्रमाण ठरवणं आणि खुल्या बाजारात सरकारी रोख्यांची खरेदी-विक्री करणं यांसारखे निर्णय घेतात. मार्ग कोणताही असला, तरी बेरोजगारी आणि विकासदरातली अस्थिरता कमी करणं हाच या दोन्ही उपायांचा मुख्य हेतू असतो, ज्यामुळे अर्थव्यवस्था प्रचंड बेरोजगारी किंवा नियंत्रणाबाहेर गेलेली महागाई अशा भीषण संकटात अडकणार नाही.

आर्थिक स्थैर्याची ही मूळ संकल्पना अर्थतज्ज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांनी १९२९ ते १९३९ या काळातल्या जागतिक महामंदीच्या दरम्यान मांडली होती. हा काळ आधुनिक इतिहासातला सर्वांत भीषण मंदीचा काळ मानला जातो; ज्यामध्ये प्रचंड बेरोजगारी, गरिबी आणि जगभरातल्या बँका तसेच उद्योगधंदे बुडाल्याचं पाहायला मिळालं. त्या काळात मुक्त बाजारपेठ स्वतःच सर्व समस्या आपोआप सोडवते, हा जुन्या अर्थशास्त्राचा मुख्य नियम मानला जायचा. केन्स यांनी सरकार आणि बँकांच्या थेट हस्तक्षेपाची बाजू मांडून या जुन्या नियमाला जाहीर आव्हान दिलं.

केन्स यांचा असा युक्तिवाद होता की, सामान्य कुटुंबं आणि उद्योगांकडून येणारी वस्तूंची एकूण मागणी ही अर्थव्यवस्थेच्या उत्पादन क्षमतेशी नेहमी आपोआप जुळेलच असे नाही, म्हणूनच संकटाच्या काळात बाजारातली एकूण मागणी घटल्यास, सरकारने सार्वजनिक खर्च वाढवून किंवा बँकांनी व्याजदर कमी करून मंदीचा फटका सौम्य केला पाहिजे.

स्थिरीकरण धोरणावर झालेली टीका

महागाई, खर्च, बेरोजगारी आणि उत्पादन यांसारख्या मोठ्या आर्थिक घटकांमधले सांख्यिकी संबंध नेहमी स्थिर राहतात, या गृहीतकावर जुनी केन्झीयन मॉडेल्स आधारलेली होती. मात्र, १९७० च्या दशकातल्या खनिज तेल संकटामुळे या गृहीतकाला मोठा धक्का बसला. त्या काळात स्टॅगफ्लेशनची स्थिती निर्माण झाली. याचाच अर्थ, त्या काळात आर्थिक विकासदर ठप्प किंवा उणे झाला होता, बेरोजगारी गगनाला भिडली होती आणि महागाई मात्र सतत वाढत होती.

पुढे १९७६ मध्ये अर्थतज्ज्ञ रॉबर्ट ल्युकास यांनी जुन्या केन्झीयन मॉडेल्समधली सगळ्यात मोठी आणि साधी त्रुटी समोर आणली. ल्युकास यांना १९९५ मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला होता. वेगवेगळ्या आर्थिक घटकांमधले परस्परसंबंध नेहमी स्थिर आणि प्रमाणबद्ध राहतील, हे जुन्या केन्झीयन मॉडेल्सचं गृहीतकच चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं. माणसाच्या वर्तनाला एका ठरलेल्या किंवा बंदिस्त नियमात बांधता येत नाही, असा त्यांचा मुख्य युक्तिवाद होता.

हायवेवर स्पीड कॅमेरे बसवण्याच्या उदाहरणावरून हे समजून घेता येईल. गाड्यांचा सरासरी वेग गृहीत धरून ताशी ८० किलोमीटर अशी वेगमर्यादा ठरवली, तर अपघातांचं प्रमाण विशिष्ट टक्क्यांनी कमी होईल अशी अपेक्षा ठेवली जाते. पण, प्रत्यक्षात वाहनचालक स्पीड कॅमेरा जवळ आल्यावर गाडीचा वेग कमी करतात आणि कॅमेरा ओलांडताच पुन्हा एक्सलेटर दाबतात. ल्युकास यांचा आक्षेप नेमका याच मानवी स्वभावावर आधारलेला होता. जुन्या आकडेवारीच्या आधारे मध्यवर्ती बँकांनी बाजाराला दिशा देण्याचा प्रयत्न केला, तर ग्राहक आणि व्यावसायिक आपले वर्तन बदलू शकतात, त्यामुळे ज्या संबंधांवर आधारित धोरणे आखली गेली होती तेच संबंध बदलून जातात आणि धोरणाचा अपेक्षित प्रभाव कमी पडू शकतो, त्यामुळेच जीडीपी आणि बेरोजगारीसारख्या मोठ्या आर्थिक घडामोडी समजून घ्यायच्या असतील तर आधी प्रत्येक व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करणं आणि त्यांच्या वैयक्तिक निर्णयांचा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो हे तपासणं गरजेचं ठरतं.

रॉबर्ट हॉल यांचं क्रांतिकारी संशोधन

आजचा घरगुती खर्च हा लोकांना भविष्यात मिळणाऱ्या एकूण संपत्तीबद्दल काय अपेक्षा आहेत, यावर ठरतो, ही रॉबर्ट हॉल यांची मुख्य संकल्पना होती. भविष्याबद्दल मिळालेल्या एखाद्या नव्या आणि महत्त्वाच्या माहितीमुळे जेव्हा लोकांचा अंदाज बदलतो, तेव्हाच ते स्वतःचा खर्च बदलतात असं त्यांनी मांडलं. भविष्यातल्या उत्पन्नाबद्दल खात्री वाटत असेल तरच लोक जास्त खर्च करतात, आणि नकारात्मक चित्र दिसत असेल तर हात आखडता घेतात. घरगुती खर्चाचा अंदाज लावण्यासाठी जुनी आर्थिक आकडेवारी हा भरवशाचा निकष असू शकत नाही, हे हॉल यांनी सिद्ध केलं. त्यांच्या या मांडणीला रँडम वॉक हायपोथेसिस म्हटलं जातं. या सिद्धांतानुसार, अनपेक्षित माहिती समोर आल्यावरच लोकांच्या खर्चात बदल होतो, ज्यामुळे खर्चातले बदल हे रँडम वॉकप्रमाणे अनिश्चितपणे घडतात, त्यामुळे जुन्या आकडेवारीवरून भविष्यातल्या खर्चाचा अचूक अंदाज बांधणं अशक्य होतं.

याशिवाय, रोजगार मिळवण्याच्या प्रक्रियेत सर्च फ्रिक्शन्स असतात, म्हणजेच योग्य उमेदवाराला योग्य काम मिळण्यात वेळ आणि अडथळे येतात, हेही त्यांनी दाखवून दिलं. यामुळेच अर्थव्यवस्थेत सुधारणा सुरू झाल्यानंतरही बेरोजगारीची समस्या बऱ्याच काळापर्यंत का कायम राहते याचं उत्तर मिळतं.

राहुल नावाच्या एका १२ वर्षांच्या मुलाचं उदाहरण घ्या. त्याला दरमहा ५०० रुपयांचा पॉकेटमनी मिळतो. महिन्याच्या १ तारखेला ही रक्कम मिळाल्यावर तो नेहमीच्या ठरलेल्या सवयींनुसारच खर्च करतो. आता समजा, पुढच्या महिन्याच्या १ तारखेला अचानक त्याची आजी घरी येते आणि त्याला बक्षीस म्हणून ५ हजार रुपये देते. ५०० रुपयांशिवाय हातात जास्तीचे ५ हजार रुपये आले म्हणून राहुल ते सगळे पैसे लगेच उधळून टाकत नाही. पण, तो आपल्या खर्चाच्या पद्धतीत नक्कीच बदल करतो. आधी २५ रुपयांचं चॉकलेट घेणारा राहुल आता ५० रुपयांचं चॉकलेट घेतो आणि इतर गोष्टींच्या बाबतीतही त्याच्या खर्चाचं प्रमाण अशाच प्रकारे वाढतं.

मायकेल वुडफोर्ड यांची महत्त्वाची भूमिका

वुडफोर्ड यांनी सूक्ष्म आर्थिक वर्तनावर आधारित समग्र अर्थव्यवस्थेचं एक मॉडेल तयार केलं. पुढे जाऊन हेच मॉडेल न्यू केन्झीयन मॉडेल्ससाठी मुख्य पाया बनलं. ‘घरगुती खर्च हा भविष्याबद्दलच्या अपेक्षांवर अवलंबून असतो’, या हॉल यांच्या शोधाची सांगड वुडफोर्ड यांनी स्वीडिश अर्थतज्ज्ञ नट विकसेल यांच्या ‘न्यूट्रल इंटरेस्ट रेट्स’च्या संकल्पनेशी घातली. यामुळे मध्यवर्ती बँकिंग क्षेत्रात मोठी क्रांती झाली. विकसेल यांच्या मते, न्यूट्रल रेट किंवा नॅचरल रेट म्हणजे असा आदर्श व्याजदर, ज्यामुळे देशात पूर्ण रोजगार टिकून राहतो आणि वस्तू-सेवांच्या किमतीही नियंत्रणात राहतात.

मध्यवर्ती बँका केवळ प्रत्यक्ष नोटांचा पुरवठा न बदलता, या नॅचरल रेटचा आधार घेऊन आपले पॉलिसी रेट्स बदलतात आणि अर्थव्यवस्थेला दिशा देतात. किमतींचं लेबल बदलणं कंपन्यांसाठी खर्चिक असल्याने वस्तूंचे भाव लगेच न बदलता तसेच राहतात, त्यामुळे उद्योगांना भविष्यातले खर्च आणि व्याजदरांचा अंदाज घेऊनच आज वस्तूंचे भाव ठरवावे लागतात. यातूनच मध्यवर्ती बँकांच्या ‘फॉरवर्ड गायडन्स’ या संकल्पनेचा जन्म झाला, ज्यामध्ये लोकांशी सुस्पष्टपणे संवाद साधून त्यांच्या अपेक्षांना दिशा दिली जाते. मध्यवर्ती बँकेने ‘आम्ही पुढची दोन वर्ष व्याजदर कमीच ठेवणार आहोत’ अशी उघड घोषणा केली, तर कर्जाचा दीर्घकालीन खर्च लगेच खाली येतो. परिणामी, बँकेला प्रत्यक्ष व्याजदर अधिक कमी न करताही सद्यपरिस्थितीत गुंतवणुकीला चालना देता येते. बाजारपेठेत पुरवठ्याचं संकट आलं तरी व्याजदरांच्या आधारे मागणी आणि महागाई कशी आटोक्यात आणायची हे वुडफोर्ड यांच्या मॉडेलने सिद्ध केलं. १९७० च्या स्टॅगफ्लेशनच्या काळाशी तुलना करता, जागतिक आर्थिक संकटं हाताळण्यासाठी आधुनिक मध्यवर्ती बँका ज्या पद्धती वापरतात त्यात हे अत्यंत महत्त्वाचं योगदान ठरलं.

एका आईस्क्रीमच्या दुकानाचं उदाहरण पाहू. दुकानाच्या मालकिणीने महागडे मेनू कार्ड छापलेले असतात आणि ते वारंवार बदलणं परवडत नसल्याने आईस्क्रीमचे दर कित्येक महिने तसेच स्थिर राहतात. आता दुकान वाढवण्यासाठी कर्ज घ्यायचं की नाही हे ठरवताना ती मध्यवर्ती बँकेच्या भूमिकेकडे लक्ष ठेवते. मध्यवर्ती बँकेने ‘फॉरवर्ड गायडन्स’ देत पुढची दोन वर्ष व्याजदर कमीच राहतील असं स्पष्ट केलं, तर ती दोन वर्ष वाट पाहत बसत नाही. भविष्यात कर्जाचा खर्च कमीच राहील हे माहीत असल्यामुळे ती आजच कर्ज काढून दुकानाचा विस्तार करते.

नोबेल पुरस्कारासाठी हेच संशोधन का निवडलं?

हॉल आणि वुडफोर्ड यांच्या संशोधनाने मध्यवर्ती बँकांचं आर्थिक चढ-उतार समजून घेण्याचं आणि ते हाताळण्याचं स्वरूप पूर्णपणे बदलून टाकलं. सर्वसामान्य कुटुंबं आणि व्यापारी वर्ग भविष्याविषयी काय अपेक्षा ठेवतात आणि धोरणांना कसा प्रतिसाद देतात हे गृहीत धरल्यामुळे, व्याजदरातल्या बदलांचे काय परिणाम होतील याचा आधीच अंदाज बांधणं धोरणकर्त्यांना शक्य झालं. यामुळे धोरणांचं उद्दिष्ट स्पष्टपणे सांगणं आणि अर्थव्यवस्थेत स्थैर्य राखणं सुलभ झालं. नोबेल समितीच्या मते, याच पद्धतीमुळे मध्यवर्ती बँकांना संकटांचा मुकाबला करणं सोपं झालं असून महागाईचा काळ दीर्घकाळ लांबण्याचं प्रमाणही कमी झालंय.