2500-Year-Old Megalithic Site Found in Bhandara: भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील विरली खंदार येथील एका महापाषाणयुगीन (Megalithic) स्थळावर सुरू असलेल्या उत्खननातून दुर्मिळ पुरातन वस्तू आणि मातीच्या भांड्यांची अनोखी मांडणी समोर आली आहे. यामुळे विदर्भातील प्राचीन अंत्यविधी पद्धतींबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील या स्थळाची नोंद २००८ साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (RTMNU) संशोधकांनी पहिल्यांदा केली होती. सध्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाष शाहू यांच्या मार्गदर्शनाखाली इथे उत्खनन सुरू आहे.

या स्थळाची निवड का करण्यात आली?

प्राध्यापक शाहू यांनी सांगितले की, या स्थळाची निवड तीन प्रमुख कारणांसाठी करण्यात आली असून त्यापैकी एक म्हणजे येथील दफन करण्याची आगळीवेगळी पद्धत. ते सांगतात, “येथे दगडी वर्तुळे (Stone Circles) आहेत आणि त्यांच्या आत ‘मेन्हीर’ (उभे रोवलेले उंच दगड) आढळले आहेत. हे दोन प्रकारच्या दफन रचनांचे मिश्रण असलेले एक संमिश्र महापाषाणयुगीन स्वरूप आहे.”

विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे

या उत्खननाचा उद्देश विद्यार्थ्यांना क्षेत्र पुरातत्वशास्त्र (Field Archaeology), शोध, दस्तऐवजीकरण आणि उत्खननाचे प्रशिक्षण देणे हा देखील आहे. याव्यतिरिक्त, जवळच्या पिंपळगाव निपाणी आणि तिरोटा खेरी यांसारख्या ठिकाणी ‘डोल्मेन’ (दगडी छताची थडगी) प्रकारची दफन स्थळे आहेत, ज्यामुळे विरली खंदार हे ठिकाण त्यांच्या तुलनेत वैशिष्ट्यपूर्ण ठरते.

उत्खननात नेमकी कशाची नोंद करण्यात आली?

संशोधकांनी आतापर्यंत ड्रोन मॅपिंग आणि क्षेत्रीय सर्वेक्षणाच्या (Field Survey) माध्यमातून ६९ महापाषाणयुगीन दफन स्थळांची नोंद केली आहे. यांपैकी चार स्थळे उत्खननासाठी निवडण्यात आली आहेत. यामध्ये ‘मेन्हीर’ (उभे दगड) आणि मोठे शिलाखंड (Boulders) असलेली दोन दगडी वर्तुळे, तसेच फक्त शिलाखंडांची वर्तुळे असलेल्या दोन स्थळांचा समावेश आहे. मानवी सांगाड्यांचे अवशेष अद्याप निश्चितपणे सापडलेले नसले तरी उत्खननाचे काम सध्या सुरू आहे.

एका दफन स्थळातून अत्यंत महत्त्वाच्या वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. यामध्ये तांब्याचा हार, लोखंडी कुऱ्हाडी, छिन्नी, पळी आणि बाणांची टोके यांसारख्या अवजारांचा समावेश आहे. तसेच मौल्यवान खड्यांचे मणी. विशेषतः नक्षीकाम केलेले ‘कार्नेलियन’ मणी आणि सोन्याचे एक डूल (Earring) सापडले आहे. या वस्तूंसोबतच हाडांचे काही तुकडेही सापडले आहेत.

भांडी

या उत्खननातील सर्वात लक्षवेधक शोध म्हणजे येथे सापडलेली मातीच्या भांड्यांची विशेष मांडणी. अशा प्रकारची मांडणी विदर्भात यापूर्वी कधीही सापडलेली नाही. एका दफन स्थळामध्ये सुमारे ५० भांडी अत्यंत पद्धतशीरपणे मांडलेली आढळली असून, त्यामध्ये मोठ्या वाट्यांवर उलटी भांडी झाकलेली होती. एकाच गटात अशा प्रकारच्या किमान २३ जोड्या म्हणजेच एकूण ४६ भांडी नोंदवण्यात आली आहेत. यासोबतच तांबड्या आणि काळ्या-तांबड्या रंगाची इतर भांडी आणि लोखंडी वस्तूही सापडल्या आहेत.

सर्व भांडी उलट्या स्थितीत

डॉ. शाहू यांनी आणखी एका विलक्षण वैशिष्ट्याकडे लक्ष वेधले: येथील मोठी भांडी आणि इतर सर्व भांडी उलटी ठेवण्यात आली होती आणि एका भांड्यावर दुसरे भांडे पालथे घातले होते. ते म्हणाले, “एकही भांडे सरळ स्थितीत सापडलेले नाही. दफन विधीचा भाग म्हणून ही भांडी मुद्दामहून उलटी ठेवली असावीत असे वाटते.” ही विशिष्ट मांडणी नेमकी कोणत्या कारणासाठी केली होती, याचा शोध घेणे अद्याप बाकी असून त्यावर अधिक अभ्यास केला जाईल.

भांडी कशासाठी?

पुरातत्वशास्त्रज्ञांनी संगितले की, दफन विधीच्या वेळी अर्पण करण्यासाठी म्हणून या भांड्यांमध्ये अन्न, धान्य किंवा द्रव पदार्थ ठेवलेले असावेत. त्या भांड्यांमध्ये नक्की काय होते, हे तपासण्यासाठी त्यांचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी (Chemical Analysis) गोळा करण्यात आले आहेत. नैसर्गिक जांभ्या दगडाच्या (मुरुम) थरावर ‘काळी कसदार माती’ पसरून त्यावर ही भांडी अतिशय काळजीपूर्वक मांडण्यात आली होती. या मातीच्या चिकट स्वरूपामुळे भांड्यांना स्थिरता मिळाली, ज्यामुळे वरच्या मातीच्या वजनामुळे भांडी फुटली असली तरी ती बऱ्याच अंशी त्यांच्या मूळ जागीच टिकून राहिली.

दफन पद्धतींबद्दल डॉ. शाहू यांनी संगितले की, अशी संरचना खड्डे खोदून तयार केली जात असे. त्यामध्ये मृताचे अवशेष (असल्यास) आणि ‘ग्रेव्ह गुड्स’ (मृतासोबत पुरल्या जाणाऱ्या वस्तू) ठेवल्या जात असत. या वस्तू मृताशी संबंधित असायच्या, त्यावरून त्या काळातील लोकांचा ‘पुनर्जन्मावर’ असलेला विश्वास दिसून येतो. आणखी एक महत्त्वाचा शोध म्हणजे, या ठिकाणी कोळशाचे अवशेष सापडले आहेत. ‘एक्सिलरेटर मास स्पेक्ट्रोमेट्री’ (AMS) डेटिंगच्या माध्यमातून या स्थळाचा अचूक काळ ठरवण्यासाठी या कोळशाची मदत होईल. प्राथमिक निरीक्षणांनुसार, हे स्थळ किमान २,५०० वर्षे जुने असावे असा अंदाज आहे.

१० मार्च रोजी सुरू झालेले हे उत्खनन आता अंतिम टप्प्यात आहे, मात्र अजूनही नवनवीन पुरावे समोर येत आहेत. आगामी परीक्षांमुळे बहुतेक विद्यार्थी परतले असले तरी, तीन पीएचडी (PhD) संशोधक अजूनही तिथे असून ते दफन चर (trenches) आणि पुरातन वस्तू जतन करण्याचे काम करत आहेत. उत्खनन आणि दस्तऐवजीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर हे स्थळ बंद केले जाईल, असे डॉ. शाहू यांनी सांगितले. पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते, विरली खंदारयेथील हे निष्कर्ष या प्रदेशातील महापाषाणयुगीन संस्कृती आणि त्यांच्या व्यापक सांस्कृतिक परंपरा समजून घेण्याच्या दृष्टीने मोलाचे योगदान देऊ शकतात.